29 March, 2025
धान्य वाटपात दिरंगाई करणाऱ्या माझोड येथील रास्त भाव दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द
* जिल्हाधिकारी यांच्या पथकांची अचानक भेट देऊन कारवाई
हिंगोली (जिमाका), दि. २९ : जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या नेतृत्वात पुरवठा विभागातील रास्तभाव दुकानदारांची धान्य वाटप कामकाजातील उदासिनता दूर करुन पात्र लाभार्थ्यांना विहीत वेळेत धान्य पुरवठा करण्यासाठी तसेच दिरंगाईखोर रास्तभाव दुकानदारांवर प्रशासनाचा वचक बसविण्याकरीता दिनांक २८ मार्च, २०२५ रोजी सेनगाव तालुक्यातील माझोड येथील अत्यंत कमी धान्य वाटप करणाऱ्या रास्त भाव दुकानाला जिल्हाधिकारी यांच्या पथकाने अचानक भेट देवून तपासणी केली. या तपासणीत आढळून आलेल्या त्रुटींमुळे तात्काळ प्रभावाने निळोबा पांडुरंग मुळे यांच्या नावे असलेला मौ. माझोड येथील रास्त भाव दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला.
या कारवाईच्या वेळी जिल्हाधिकारी यांच्या पथकातील जिल्हा पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील, निरीक्षण अधिकारी विशाल लोहटे, महसूल सहाय्यक पी.व्ही. काळबांडे तसेच ग्रा.म.अ. एन.जी.ढोले हे उपस्थित होते.
तसेच जिल्ह्यातील इतर तालुक्यात सुद्धा अशाच प्रकारच्या कुचकामी रास्तभाव दुकानदारांवर अचानक भेटी देवून कारवाई करण्याच्या सक्त सूचना जिल्हाधिकारी यांनी सर्व तहसिलदारांना दिल्या आहेत.
******
28 March, 2025
दैनंदिन जीवनात पौष्टिक तृणधान्याचा खाद्य पदार्थांमध्ये वापर करावा - जिल्हाधिकारी अभिनव गोयल
हिंगोली (जिमाका), दि. 28 : पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्व लक्षात घेता सर्वांनी आपल्या दैनंदिन जीवनात पौष्टिक तृणधान्याचा खाद्यपदार्थात वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी यावेळी केले.
हिंगोली, सेनगाव व कळमनुरी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी येथील महावीर भवनामध्ये नुकतेच ‘जिल्हास्तरीय पौष्टिक तृणधान्य महोत्सव-2025’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तोंडापूर कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख समन्वयक पी. पी. शेळके हे होते.
जिल्हाधिकारी श्री. गोयल म्हणाले, पौष्टिक तृणधान्य अंगणवाडीतील मुलांच्या आहारात समाविष्ट करता येईल. कृषी सहाय्यकांच्या माध्यमातून पौष्टिक तृणधान्यांच्या विविध पाककृती अंगणवाडीतील मुलांच्या दैनंदिन आहारामध्ये पोहोचविण्याबाबत तसेच पौष्टिक तृणधान्यांचे महत्त्व शेतकरी व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक प्रमाणावर प्रसिद्धी करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी कृषि विभागाला केले.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम यांनी पौष्टीक तृणधान्य लागवड पध्दतीबाबत व पीक फेरपालट करुन जमिनीचे पोत सुधारण्याबाबत मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञ रोहिणी शिंदे यांनी आहारातील पौष्टिक तृणधान्यांचे महत्त्व आणि विविध पाककृतींची माहिती दिली. फिटनेस आणि न्यूट्रिशन प्रशिक्षक प्रणिता कौलवार यांनी पौष्टीक तृणधान्ये आणि पचनक्रिया याविषयी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी पौष्टीक तृणधान्याचे महत्त्व सांगणारी सुरेख पुस्तिका व घडीपत्रिकेचे विमोचन जिल्हाधिकारी श्री. गोयल यांच्या हस्ते करण्यात आले व सर्व उपस्थितांना त्याचे वाटप करण्यात आले. या महोत्सवाला शेतकरी आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. या महोत्सवात शेतकरी आणि महिला बचत गटांनी 22 दालने लावली होती. या ठिकाणी पौष्टिक तृणधान्यांपासून बनवलेल्या विविध पदार्थांची विक्री करण्यात आली, ज्यातून 1 लाख 46 हजार 812 रुपयांची उलाढाल झाली.
या कार्यक्रमाला संजय येवले, ‘उगम’चे अध्यक्ष जयाजी पाईकराव, कृषी विकास अधिकारी अतुल वायसे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, कृषी उपसंचालक प्रसाद हजारे, तंत्र अधिकारी सुनिल गोडगे, तंत्र अधिकारी अनिता रहाणे, तालुका कृषि अधिकारी शिवसंदीप रणखांब, महादेव कुंभार, संदीप वळकुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
***
शाळांना दर्जावाढ मान्यतेसाठी ऑनलाईन प्रस्ताव दाखल करणे बंधनकारक
हिंगोली (जिमाका), दि. 28 : महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) 2012 व महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) 2020 अंतर्गत स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर नवीन, दर्जावाढ शाळांना मान्यता मिळण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात येतात. फक्त दर्जावाढ शाळा मान्यता प्रस्ताव सादर करण्यासाठी इच्छुक संस्थांनी www.mahasfx.org या संकेतस्थळाचा वापर करावा.
ज्या संस्थांना सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात दर्जावाढीने शाळा सुरु करण्याच्या विचाराधीन आहेत, अशा संस्थांनी आपल्या शाळेचे दर्जावाढ प्रस्ताव संकेतस्थळावर दिनांक 30 जून 2025 पूर्वी ऑनालाईन सादर करावेत. त्यानंतर सादर होणाऱ्या प्रस्तावावर कार्यवाही करण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी. नवीन शाळांना इरादा पत्र मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येत नाहीत याची जाणीव आपणास करुन देण्यात येत आहे. ज्या शाळांना दर्जावाढ अथवा नवीन शाळा मान्यता ऑफलाईन इरादा पत्र प्राप्त आहे. अशा शाळांनी देखील इरादा पत्रातील अटीं शर्तीनुसार ऑनलाईन प्रस्ताव दाखल करावेत. इरादा पत्र ऑनलाईन असले तरी अंतिम मान्यता प्रस्ताव ऑनलाईन सादर करावा, असे निर्देश सदस्य सचिव, राज्यस्तरीय प्राधिकरण तथा सहसंचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दि. 21 मार्च, 2025 रोजीच्या बैठकीत सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना दिले असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
******
कै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील बुधवारी हिंगोली दौऱ्यावर
हिंगोली (जिमाका), दि. 28 : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील हे बुधवार, दि. 2 एप्रिल, 2025 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार, दि. 2 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता अमरावती येथून हिंगोलीकडे प्रयाण. दुपारी 3 वाजता शासकीय विश्रामभवन हिंगोली येथे आगमन. 3.30 वाजता पिंपळखुटा ता.जि.हिंगोली येथे मृतक राजू साहेब गतांडे यांचे शेतकरी आत्महत्या प्रकरणात कुटुंबियास भेट. 4.30 वाजता तहसीलदार कळमनुरी यांनी निश्चित केलेल्या शेतकरी आत्महत्या प्रकरणात कुटुंबियास भेट आणि सायंकाळी 6 वाजता नांदेडकडे प्रयाण करतील.
*****
27 March, 2025
पीसीपीएनडी कायद्याबाबत कार्यशाळेत मार्गदर्शन
हिंगोली (जिमाका), दि. 27 : जिल्ह्यात पीसीपीएनडीटी कायद्याची प्रखरतेने अंमलबजावणी, कायद्याची माहिती व जनजागृती होण्याच्या दृष्टीने येथील जिल्हा रुग्णालयाच्या प्रशिक्षण केंद्रात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली आज प्राधिका-यांची कार्यशाळा घेण्यात आली.
कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. तडस आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपक मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा कुप्पास्वामी, वैद्यकीय अधिकारी डॉ. नामदेव पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. गंगाधर काळे, डॉ. नरवाडे, डॉ. सुनतकरी, डॉ. गणेश बन्ड्रेवार, जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या राज्य प्रशिक्षक अनिता चव्हाण, सल्लागार समिती सदस्य अलका रणवीर, डापकूचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक ज्ञानेश्वर चौधरी, प्रशांत गिरी, राजेंद्र खंदारे, इत्यादी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपक मोरे यांनी पीसीपीएनडीटी कायद्याबाबत सखोल मार्गदर्शन केले. तसेच एसएनसीयूचे डिईओ सुरेश शेवाळे यांनी सादरीकरणाद्वारे सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ॲड. सुकेशिनी ढवळे यांनी केले, तर सुरेश शेवाळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनिल जाधव, अर्चना पवार, मदन पथरोड व नर्सिंग वसतीगृहातील विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले.
******
कुरुंदा पोलीस स्टेशन येथील बेवारस वाहनांची बुधवारी होणार लिलावाद्वारे विक्री
हिंगोली (जिमाका), दि. 27 : कुरुंदा पोलीस स्टेशन येथे अभिलेखावर नसलेल्या परंतु पोलीस स्टेशन परिसरात पडून असलेल्या बेवारस वाहनांची उपप्रादेशिक परिवहन कार्यालय हिंगोली यांच्यामार्फत तपासणी केली असता सदरची वाहने खूप वर्षापासून पोलीस स्टेशनमध्ये पडून असल्याने त्यांचे नंबर प्लेट, चेसीस क्रमांक, इंजिन क्रमांक स्पष्ट दिसत नाही व खोडलेले असल्याने त्याचा मूळ मालक कोण आहे हे कळू शकले नाही. त्यामुळे पोलीस स्टेशन परिसरात एकूण 30 दूचाकी वाहने पडून आहेत.
वरील वाहनांबाबत आजपर्यंत कोणीही मालकी हक्क किंवा त्यासंबंधी दस्तावेज सादर करुन मागणी केलेली नाही. वरील 30 दुचाकी वाहने कुरुंदा पोलीस स्टेशन आवारात खुल्या जागेत पाहण्यासाठी व्यवस्थित लावून ठेवलेल्या आहेत. या वाहनाची पोलीस ठाणे कुरुंदा येथे बुधवार, दि. 2 एप्रिल, 2025 रोजी सकाळी 11 वाजता लिलावाद्वारे विक्री केली जाणार आहे. लिलावामध्ये भाग घेणाऱ्या इच्छुकांनी लिलावासंदर्भात लागणारी कागदपत्रे घेऊन हजर राहावेत, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक , पोलीस ठाणे, कुरुंदा ता. वसमत यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
******
विशेष वृत्त - मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राला 7 कोटी 84 लाखाचा निधी वितरणास मान्यता
• निधी वितरीत केल्याने जिल्ह्यातील हळद संशोधनाला गती प्राप्त होणार
हिंगोली (जिमाका), दि. 27 : वसमत येथील मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या अंमलबजावणीसाठी सन 2024-25 करिता आज 7 कोटी 84 लक्ष 80 हजार रुपयांचा निधी आज वितरीत करण्यास मान्यता दिल्याने जिल्ह्यातील हळद संशोधनाला गती प्राप्त होणार आहे. परिणामी येथील हळद उत्पादक शेतक-यांना याचा मोठा लाभ होणार आहे.
जिल्ह्यामध्ये 'मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र' कंपनी कायद्याच्या कलम ८ नुसार ना-नफा तत्त्वावर एक स्वायत्त संस्था म्हणून स्थापन करण्यास दि. 14 सप्टेंबर, 2022 रोजीच्या शासन निणर्यान्वये मंजुरी देण्यात आली आहे. या केंद्रामध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन अदा करण्यासाठी दि. 30 जुलै, 2024 व 9 ऑगस्ट, 2024 रोजीच्या शासन निणर्यान्वये निधी वितरीत करण्यात आला आहे. तसेच, दि. 16 सप्टेंबर, 20024 व दि. 23 जानेवारी, 2025 रोजीच्या शासन निर्णयांन्वये योजनेसाठी सन 2024-25 करीता निधी वितरीत करण्यात आला आहे.
तसेच आता या योजनेकरिता आज गुरुवार, दि. 27 मार्च, 2025 च्या शासन निर्णयानुसार शासनाने मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राकरीता सन 2024-25 मध्ये 24014446 या लेखाशीर्षाखाली 31-सहाय्यक अनुदाने (वेतनेत्तर) उद्दिष्टांखाली रु. 184.20 लाख व 35-भांडवली मत्तेच्या निर्मितीकरिता अनुदान या उद्दिष्टांखाली रु. 600.60 लाख असा एकूण रु. 784.80 लाख (रुपये सात कोटी चौऱ्याऐंशी लाख ऐंशी हजार फक्त) निधी आयुक्त (कृषि), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे.
हा निधी पीक संवर्धन, फलोत्पादन व भाजीपाला पिके, मसाला पिके, मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद), संशोधन व प्रशिक्षण, कार्यक्रम लेखाशीर्षांतर्गत चालू वर्षी अर्थसंकल्पित केलेल्या तरतूदीतून खर्च करण्यात येणार आहे.
या शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात आलेल्या रक्कमेचे कोषागारातून आहरण व वितरण करण्याकरिता कृषि आयुक्तालय स्तरावर सहायक संचालक (लेखा-१), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असून आयुक्त (कृषि), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. तसेच जिल्हा स्तरावर लेखाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालय, हिंगोली यांना आहरण व संवितरण अधिकारी तर जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, हिंगोली यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
ही योजना राबविताना शासन निर्णयातील तरतुदींनुसार कार्यवाही करावी. वितरीत निधी खर्च करताना नियंत्रक अधिकारी यांनी विहित पद्धतीने काटकसरीच्या उपाययोजना करुन खर्च करावा. तसेच सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरुन मंजूर आराखड्यानुसार याच वर्षात खर्च करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
निधी खर्च करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका व वित्तीय अधिकार नियम पुस्तीकेमध्ये उल्लेख केलेल्या तसेच नियोजन व वित्त विभागाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना व प्रचलित अटी व शर्तीचे व वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचनाही शासन निर्णयात दिल्या आहेत.
*******
विशेष लेख - मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या आखणीत कार्यालये टाकताहेत कात !
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य शासन लोकाभिमुख विविध उपक्रम राबवित असताना आता क्षेत्रीय कार्यालयांसाठी 100 दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रम सुरु आहे. या कृती आराखड्यानुसार जवळपास सर्वच शासकीय कार्यालये बदलताना दिसून येत आहेत. शासकीय कार्यालय परिसरात गेल्यानंतर त्यांचे रुपडे बदलत असल्याचे चित्र कमी-अधिक प्रमाणात इथे येणाऱ्या अभ्यागतांच्या नजरेत भरत आहे. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या पुढाकारातून जानेवारीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जमा झालेला कचरा उचलून नष्ट करण्यात आला. तसेच परिसर स्वच्छतेची मोहीम हाती घेत त्यांनी सर्वांना सहभागी करून घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 7 जानेवारी 2025 रोजी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, परिक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना दृक परिषदेद्वारे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्रिमंडळाच्या उपस्थितीत संबोधित केले होते. त्याचा थेट परिणाम क्षेत्रीय कार्यालय परिसर स्वच्छतेवर दिसून येत आहे.
राज्य शासनाच्या प्रशासनिक विभागांसाठी 100 दिवसांचा कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयांकरिता आगामी 100 दिवसांमध्ये 1) अद्ययावत माहिती असलेली संकेतस्थळे, 2) सुकर जीवनमान, 3) स्वच्छता, 4) जनतेच्या तक्रारींचे निवारण, 5) कार्यालयातील सोयी व सुविधा, 6) गुंतवणूक प्रसार, 7) क्षेत्रीय कार्यालयांना भेटी देणे या मुद्यांवर प्रभावी कार्यवाही करण्यात येत आहे.
हिंगोली जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसर स्वच्छ करण्यात आला असून, इमारतीमधील पहिल्या माळ्यावर असलेले निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड यांचे कार्यालय, उद्योजकता, कौशल्य विकास कार्यालय तसेच सांख्यिकी विभागाच्या उपसंचालक कार्यालय ही कार्यालये नाविन्यपूर्ण उपक्रमातून अद्ययावत करण्यात आली आहेत. या कार्यालयांमध्ये आधुनिक साधनसामुग्रीच्या माध्यमातून ही कार्यालये जिल्ह्यातील प्रत्येक घटकातील नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यतत्पर आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आल्यानंतर अभ्यागतांना शुद्ध पिण्याचे पाणी, त्यांना बसण्यासाठी पुरेशी आसनव्यवस्था करून देण्यात आली आहे.
राज्यातील सर्व क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालये ही कृती आराखड्यानुसार कार्यवाही करत आहेत. या आराखड्यानुसार कार्यवाही होत असल्याची मुख्य सचिव सुजाता सौनिक वेळोवेळी दूरदृष्यप्रणालीद्वारे आढावा घेत आहेत. त्यामुळे हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल हे याबाबत क्षेत्रीय स्तरावर वारंवार भेटी देऊन यंत्रणेचा आढावा घेत आहेत. त्यामुळे 7 कलमी कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी जिल्हाधिकारी श्री. गोयल हे करत असल्याचे दिसून येत आहेत.
1. संकेतस्थळ:- जिल्ह्यातील विविध विभागांच्या कार्यालयांची असलेली संकेतस्थळे अद्ययावत करण्यात येत आहेत. या संकेतस्थळावरील माहिती अद्ययावत व हाताळण्यास सुलभ करण्यात येत आहे. संकेतस्थळावर माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 मधील तरतुदींनुसार शीर्षकाखाली जास्तीत जास्त माहितीचे स्वयंप्रकटीकरण करण्यात येत असून, नागरिकांना सहज, विनासायास सेवा उपलब्ध होतील, यादृष्टीने सुरक्षेबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत आहे. संकेतस्थळ अद्ययावत ठेवतानाच संकेतस्थळाच्या सुरक्षेबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत असून, राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे सर्व माहिती अद्ययावत करण्याचे सातत्याने प्रयत्न करत आहे. तसेच विभागांची लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 मधील तरतुदींनुसार सर्व विभागाच्या सेवांबाबतची माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्याचे काम सुरु आहे.
2. सुकर जीवनमान : नागरिकांना मिळणाऱ्या सेवा जास्तीत जास्त सुलभ करण्याच्या दृष्टीने प्रचलित कामकाजाच्या पद्धतींचे पुनर्विलोकन करुन प्रशासकीय कार्यपद्धतीमध्ये किमान दोन सेवा अतिशय सुलभ पध्दतीने देण्यासाठी, त्यांचे दैनंदिन जीवन सुकर होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत.
3. स्वच्छता :- प्रचलित नियम, कार्यपद्धतीप्रमाणे शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये निंदणीकरण, नष्टीकरण व निर्लेखनाची प्रक्रिया प्राधान्याने व निरंतरपणे राबविण्यात येत असून, अभिलेख निंदणीकरण करून, वर्गीकरण व तपासाअंती आवश्यक नसल्यास त्यांचे नष्टीकरण करण्यात येत आहे. कार्यालयांमधील जुन्या व निरुपयोगी जडवस्तूंची विहित कार्यपद्धतीने विल्हेवाट लावण्यात येत असून, कार्यालयांच्या आवारात असणारी जुनी व वापरात नसलेली वाहने यांचे विहित पद्धतीने निर्लेखित करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
4. जनतेच्या तक्रारींचे निवारण :- आपले सरकार आणि पीजी पोर्टलवर नागरिकांकडून प्राप्त सर्व तक्रारींचे त्वरेने निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी वारंवार आढावा घेत आहेत. अभ्यागतांच्या भेटीसाठी आठवड्यातील दैनंदिन वेळ राखून ठेवण्यात येत असून, तसे फलक कार्यालयामध्ये दर्शनी भागात लावून, अधिकारी दौऱ्यावर असल्यास अभ्यागतांना भेटण्यासाठी अन्य अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येत आहे.
5. कार्यालयातील सोयी व सुविधा :- कार्यालयांमधील कर्मचारी वर्ग तसेच येणारे अभ्यागतांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची कायमस्वरुपी व्यवस्था, प्रसाधनगृहे, अभ्यागतांसाठी सुसज्ज प्रतिक्षालय, तसेच सुव्यवस्थित नाम व दिशादर्शक फलक लावण्यात येत आहेत. वातावरण प्रसन्न व आल्हाददायक राहील याकरिता विशेष प्रयत्न करून परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात येत आहे.
6. गुंतवणुकीस प्रोत्साहन :- हिंगोली जिल्ह्यात औद्योगिक वसाहत तुलनेने मोठी नसली तरीही येथील औद्योगिक वसाहतीमध्ये अधिकाधिक उद्योग उभारणीसाठी जिल्हाधिकारी अभिनव गोयल हे जिल्ह्यातील उद्योजक, व्यापाऱ्यांसोबत दर महिन्याला आढावा बैठका घेऊन त्यांना आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहेत. येथे गुंतवणूकदार, उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे व पोषक वातावरण निर्मिती आणि गुंतवणूक वृद्धीसाठी सामूहिक प्रयत्न करण्यात येत आहेत. व्यापारी वर्गाच्या संघटनांशी चर्चा करुन त्यांच्या अडचणी सोडविण्याचा जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरु आहेत.
7. क्षेत्रीय कार्यालयांना भेटी :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशाप्रमाणे जिल्हाधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह पोलीस अधीक्षक व इतर कार्यालय प्रमुख जिल्ह्यातील क्षेत्रीय कार्यालयांना भेटी देत आढावा घेत आहेत. आठवड्यातून किमान दोन दिवस अधिकारी अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयांना भेटी देत पाहणी करत आहेत. क्षेत्रीय भेटीदरम्यान महत्त्वाचे घटक असणाऱ्या ग्राम पंचायत, शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्र यांना भेटी देऊन त्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यात येत आहे. हा 100 दिवसांचा 7 कलमी कृती आराखडा दि.15 एप्रिलपर्यंत राबवून त्याचा अहवाल 20 एप्रिलपर्यंत वरिष्ठांना सादर करण्यात येणार आहे.
हिंगोली जिल्ह्यातील प्रशासनही जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांच्यासह सर्व शासकीय-निमशासकीय विभागांचे विभाग/कार्यालयप्रमुख, कर्मचारी या सप्तसूत्रीची प्रत्यक्षात अंमलबजावणी करत आहेत.
- चंद्रकांत कारभारी,
माहिती सहायक/उपसंपादक
जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली
*****
26 March, 2025
स्थानिक तक्रार निवारण समिती सदस्य पदासाठी 4 एप्रिलपर्यंत अर्ज करा
हिंगोली (जिमाका), दि. 26 : विशाखा जजमेंटमधील तरतुदीनुसार कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध,मनाई व निवारण) अधिनियम 2013 व नियम दि. 9 डिसेंबर, 2013 रोजी प्रसिध्द करण्यात आले आहेत. या अधिनियमातील कलम 6(1) नुसार जिल्हास्तरावर स्थानिक तक्रार समिती गठीत करण्याची तरतूद आहे. या अधिनियमानुसार स्थानिक तक्रार समिती गठीत करण्याचे पूर्ण अधिकार प्रत्येक जिल्ह्याचे नियुक्त जिल्हा अधिकारी या नात्याने उपजिल्हाधिकारी यांना आहेत.
या जिल्हा स्तरावरील स्थानिक तक्रार समितीची रचना - अध्यक्ष - सामाजिक कार्याचा 5 वर्षाचा अनुभव व महिलांच्या सोयीसाठी बांधील असलेल्या व्यक्तीची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात येते. जिल्ह्यातील गट, तालुका, तहसील, प्रभाग, नगरपालिका या कार्यालयामध्ये काम करणाऱ्या महिलामधून एका सदस्याची निवड करण्यात येते. महिलांच्या सोयीसाठी बांधील असलेल्या अशासकीय संघटना, संघ किंवा लैंगिक छळाच्या प्रश्नांशी परिचित असलेली व्यक्ती यांमधून दोन सदस्यांची निवड करण्यात येते. यापैकी किमान एक सदस्य महिला असावी. परंतु त्यापैकी किमान एका सदस्यांची पार्श्वभूमी प्राधान्याने कायद्याची असावी. तसेच त्यापैकी किमान एक सदस्य अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर मागासवर्ग किंवा अल्पसंख्यांक समाजातील महिला असावी. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी हे या समितीचे पदसिध्द सदस्य सचिव असतील.
स्थानिक तक्रार समितीमधील अध्यक्ष व सदस्य यांच्या नियुक्तीचा कालावधी तीन वर्षापेक्षा अधिक नसेल. स्थानिक तक्रार समितीचे अध्यक्ष किंवा कोणतेही सदस्य हे या अधिनियमाच्या कलम 16 मधील तरतुदीचे उल्लंघन करीत असतील किंवा त्या त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये त्यांच्याविरुद्ध अपराधाची चौकशी प्रलंबित असेल किंवा ते कोणत्याही शिस्तभंगाच्या कारवाईमध्ये दोषी असल्याचे आढळून आले असतील किंवा त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही प्रलंबित असेल, किंवा अशा रितीने त्याने पदावर राहून सार्वजनिक हितास बाधा पोहोचवून त्याच्या पदाचा दुरुपयोग केला असेल. अशा अध्यक्ष किंवा सदस्य यांना पदावरुन दूर करण्यात येईल आणि अशा रितीने रिक्त झालेले पद किंवा कोणत्याही नैमित्तिक कारणाने रिक्त झालेले पद या अधिनियमातील तरतूदीनुसार जिल्हा अधिकारी नव्याने नामनिर्देशन भरतील.
ही समिती गठीत करण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांच्याकडून जिल्ह्यातील पात्र व इच्छूक व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यांनी स्थानिक तक्रार समितीमध्ये काम करण्यास तयार असल्याबाबतचे संमतीपत्र देणे आवश्यक आहे. महिला व बालविकास विभागाला दि. 4 एप्रिल, 2025 रोजी सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या प्रस्तावांमधून नामनिर्देशनाने जिल्हा अधिकारी या नात्याने उपजिल्हाधिकारी, हिंगोली हे अध्यक्ष व सदस्यांची निवड करतील.
अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, कक्ष क्र. एस -7, हिंगोली 431513, ई-मेल पत्ता : dwandcdoh@gmail.com येथे संपर्क करावा, असे आवाहन राजाभाऊ मगर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
*******
माजी सैनिक महिलांनी भरतीचा लाभ घेण्याचे आवाहन
हिंगोली(जिमाका),दि.26: 136 इन्फट्री महार बटालियन टीए इको मध्ये माजी सैनिक तथा पर्यावरण मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्य वन विभागामधून स्वेच्छा सेवानिवृत्त घेतलेल्या महिलांसाठी दि. 21 एप्रिल ते 23 एप्रिल, 2025 या कालावधीत एसआरपीएफ कँप ग्राउंड धुळे सिटी, धुळे येथे भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
एमओईएफ आणि सीसी आणि राज्य वन विभागाचे सेवानिवृत्तांनी 136 इन्फंट्री बटालियन टीए इको, महार मध्ये सहभागी होण्यासाठी स्वयंसेवा करणारे सर्व पात्र उमेदवार दिलेल्या वेळापत्रकानुसार दि. 21 एप्रिल ते दि. 23 एप्रिल, 2025 रोजी सकाळी 5.30 वाजता एसआरपीएफ कँम्प ग्राउंड धुळे सिटी, धुळे येथे शारीरिक फिटनेस चाचणी सुरु होणार आहे.
शिपाई जनरल ड्यूटीचे 44 पदे केवळ महाराष्ट्रातल्या माजी सैनिक तथा माजी सैनिक महिलांमधून भरण्यात येणार आहेत. तर लिपिक-6, स्वयंपाकी-01, हेयर ड्रेसर-01, मेसकीपर-01, स्टेवर्ड-01 आणि ब्लॅकस्मिथ-01 ही पदे संपूर्ण भारतातील माजी सैनिक क्लार्क किंवा माजी सैनिक ट्रेड्समेनमधून भरण्यात येणार आहेत.
या भरतीसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त माजी सैनिकांनी अटी व पात्रता पाहून भरतीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास 9021208822 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
*****
विशेष लेख - नागरिकांना माहीत असावेत असे टोलफ्री क्रमांक
सर्वसामान्य नागरिकांना आपल्या दैनंदिन जीवनात ऐनवेळी अनेक समस्या आपल्यासमोर अकस्मात उभ्या राहतात. अशावेळी आपणांस मदतीची अत्यंत आवश्यकता असते. मात्र ही मदत कोणाकडून मिळेल, कुठे आणि कशी मिळेल, त्या मदतीसाठी कोणाकडे कशा पद्धतीने संपर्क साधता येईल, याबाबत सर्वसामान्य नागरिकांना माहिती व्हावी, यासाठी राज्य शासनाच्या विविध विभागांनी क्रमांक जाहीर केले आहेत. नागरिकांना अडचणीच्या वेळी तात्काळ कोणाकडे संपर्क साधावा, याबाबत काही सुचत नाही, त्यांना याची माहिती नसते. त्यामुळे राज्य शासनाच्या विभागांनी नागरिकांमध्ये या क्रमांकाची जनजागृती व्हावी. त्यांना अत्यावश्यक सेवेचे हे क्रमांक सहज उपलब्ध व्हावेत. त्यांच्या सहज नजरेस पडावेत. ‘गोल्डन अवर्स’मध्ये बचत होऊन रुग्ण, पीडित अथवा त्यांच्या नातेवाईंकांना रुग्णालयाशी, संकट काळात पोलीस यंत्रणेशी, अग्निशमन यंत्रणेशी तात्काळ संपर्क साधता यावा. अशा रुग्ण अथवा संकटात सापडलेल्या व्यक्तीला, पीडिताला तात्काळ मदत मिळून त्याचे प्राण वाचावेत, यासाठी राज्य शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग व हिंगोली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सार्वजनिक आरोग्य सेवा विभागाकडून ही जनजागृती करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकहो, आपल्यासाठी काही महत्त्वाचे क्रमांक अत्यंत उपयुक्त आहेत.
108 : हा आपत्कालीन सेवांसाठी एक नि:शुल्क कॉलिंग टेलिफोन नंबर आहे. संबंधित राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांद्वारे हा क्रमांक आपत्कालीन वैद्यकीय सेवा तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी वापरला जातो. मुख्यतः सार्वजनिक-खाजगी भागीदारी अंतर्गत आणि भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून हा क्रमांक सुरु करण्यात आला आहे.
104: या नि:शुल्क क्रमांकावरून रुग्णांना घरबसल्या आरोग्यविषयक सल्ला दिला जातो. या क्रमांकावर रुग्ण अथवा नातेवाईकांनी संपर्क साधल्यास रक्ताची उपलब्धता, तक्रारनिवारण आणि मानसिक आरोग्यविषयक सल्ला दिला जातो.
102 : नागरिकांना या क्रमांकांची सेवा ही जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमासाठी घेता येते. हा क्रमांक राज्यात मुंबई वगळता सर्व जिल्ह्यांसाठी कार्यान्वित आहे. या नि:शुल्क क्रमांकावरून रुग्णांना मोफत संदर्भ सेवा वाहतुकीसाठी मदत होते.
155388 आणि 18002332200: राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसाठी हे दोन्ही क्रमांक अत्यंत अपयुक्त आहेत. या क्रमांकावरून रुग्णांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या लाभासाठी नि:शुल्कपणे संपर्क साधून आरोग्य सेवेचा लाभ घेता येतो. त्यामुळे सर्वसाधारणपणे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हे नि:शुल्क क्रमांक सेव्ह असायलाच हवेत.
18002334475 : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (पीसीपीएनडीटी) वापरण्यासाठी हा क्रमांक जारी करण्यात आला आहे. या क्रमांकावरून गरोदर महिलांना गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान करून घेण्यासाठी मदत मिळते.
91-11-23978046 : हा सुद्धा नि:शुल्क क्रमांक असून, देशातील कोणत्याही नागरिकाला आरोग्यविषयक माहिती मिळवता येते. 91-11-23978046 या राष्ट्रीय कॉल सेंटरवर संपर्क साधून आरोग्याच्या तक्रारींबाबत घरबसल्या माहिती घेता येते. रुग्णांचे नातेवाईक किंवा स्वत: रुग्णही वरील क्रमांकावर संपर्क साधून योजनेचा लाभ घेऊ शकतो.
1075 व 911123978046 : या दोन्ही क्रमांकावर संपर्क साधून राष्ट्रीय कॉल सेंटरच्या माध्यमातून रुग्ण अथवा नातेवाईक आरोग्य विषयक तज्ज्ञांकडून मार्गदर्शन व लाभ घेऊ शकतात. देशातील ग्रामीण आणि दुर्गम भागात डॉक्टरांसह वैद्यकीय सेवांची उपलब्धता दुर्मिळ आहे. अशा परिस्थितीत, ग्रामीण आणि मागास/डोंगरी भागात राहणाऱ्या लोकांना सल्ला सेवा प्रदान करणारी व्यवस्था असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे येथेच ई-संजीवनी ओपीडी उपयुक्त ठरू शकते. साथीच्या काळात, रुग्णांनी आजारांसाठी डॉक्टरांशी सल्लामसलत करण्याचा मार्ग शोधणे महत्त्वाचे असते. त्यामुळे त्यांना रुग्णालये/ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जाण्यापासून रोखता येते आणि विशेषतः कोविड-19 संसर्गाचा धोका, प्रसार रोखण्यासाठी आणि त्याच वेळी गैर-कोविड आवश्यक आरोग्यसेवेसाठी तरतुदी सक्षम करण्यासाठी सेवा अत्यंत फायदेशीर ठरली आहे.
14416 व 18008914416 : सध्याच्या काळात मोबाईल आपल्या हाती आल्यामुळे माणूस माणसापासून दूर चालला आहे की काय, अशी शंका घेण्याइतपत परिस्थिती बदलत असल्याचे सार्वत्रिक चित्र निर्माण झाले आहे. एकमेकांसोबत, एका खोलीत बसूनही प्रत्येकजण समाजमाध्यमांतून जाळ्यात ओढला जातो आहे. अर्थात मोबाईलवर जास्त वेळ घालवल्यामुळे समोर बसलेल्या व्यक्तीपेक्षाही जास्त मोबाईलमधील समाज माध्यमांच्या आभासी जगात वावरत आहे. त्यामुळे अनेकजण याचा गैरफायदा घेत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी अनेकाचे मानसिक संतुलन बिघडत असून, त्यांच्या मानसिक आरोग्य पुनर्वसनासाठी या क्रमांकावर सल्ला घेता येणार आहे.
1800112356 : व्यसनाधीन तरुणांना किंवा व्यसन करणाऱ्यांना व्यसनमुक्त विषयक मार्गदर्शन करण्यासाठी आहे.
1800116666 : भारत क्षयरोग मुक्त करण्यासाठी केंद्र व राज्य शासन प्रयत्नरत असून, क्षयरोगावर नियमित उपचार केल्याने बरा होतो. क्षयरोगींना मार्गदर्शन करण्यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने 1800116666 हा नि:शुल्क क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.
022-24114000 : या क्रमांकाचा उपयोग कुष्ठरोगविषयक मार्गदर्शनासाठी करण्यात येतो.
8080809063 : महिला व बालविकास विषयक सेवांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी या क्रमांकाचा राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाने हा क्रमांक जारी केला आहे.
1077 : आपत्ती व्यवस्थापन विभागाने हा क्रमांक संकटात सापडलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी व त्यांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी जारी करण्यात आला आहे. वरील सर्व नि:शुल्क क्रमांकावर संपर्क साधून नागरिकांनी लाभ घ्यावा.
- प्रभाकर बारहाते,
जिल्हा माहिती अधिकारी,
हिंगोली
*****
25 March, 2025
गिग वर्कर, प्लॅटफॉर्म वर्कर व ॲग्रीगेटर यांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी
हिंगोली(जिमाका),दि.25: ई-श्रम पोर्टलवर केंद्र शासनाने गिग वर्कर, प्लॅटफॉर्म वर्कर व ॲग्रिगेटर यांची नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे. साधारणत: गिग व प्लॅटफॉर्म वर्कर यांनी ई -श्रम पोर्टलवर त्यांची नावनोंदणी करण्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी आवाहन केले आहे.
यामध्ये शेरींग वाहन कामगार, अन्न व किराणा पुरवठा करणारे कामगार, लॉजिस्टीक सेवा देणारे कामगार इत्यादी मार्केटमध्ये ऑनलाईन काम करणारे कामगार, प्रोफेशनल सर्विस देणारे कामगार, हेल्थ केअर सेवा देणारे कामगार, ट्रॅव्हल व आदरातिथ्य करणारे कामगार, मिडिया सर्विसेस इत्यादी सर्व प्लॅटफार्म गिग वर्करच्या व्याख्येत येतात. ॲमेझान, फ्लीपकार्ट, मित्रा, स्नॅपडिल, आजिओ, मिशो, स्वीगी, झोमॅटो अशा वेगवेगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर काम करणारे कामगार हे सर्व ई-श्रम www.eshram.gov.in वर नोंदीत होऊ शकतील. केंद्र सरकारकडे त्यांचा डेटा तयार होईल. त्यासाठी दि. 01 एप्रिल, 2025 पासून सर्व गिग कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी. तसेच डिजिटल मध्यस्थी म्हणून काम करणारे सर्व सेवा पुरवठादार यांनी ॲग्रिगेटर म्हणून नोंदीत होणे आवश्यक आहे.
सर्व ॲग्रिगेटर यांनी दि. 31 मार्च, 2025 पर्यंत www.register.eshram.gov.in/#user/platform-worker-registration या साईटवर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी केले आहे.
******
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाचे काम कौतुकास्पद - जिल्हाधिकारी अभिनव गोयल
* त्रैमासिक बैठकीत घेतला कामकाजाचा आढावा
हिंगोली (जिमाका), दि. 25 : जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाने एड्स आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून कौतुकास्पद कामगिरी केली असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी यावेळी केले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची त्रैमासिक आढावा बैठक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग फोपसे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर.आर. मगर, जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश कोठूळे, जिल्हा सरकारी कामगार विभागाचे श्री. ढगे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी, विहानच्या श्रीमती अलका रणवीर, सेतूचे इरफान कुरेशी, श्रीमती पुंडगे, श्रीमती पाईकराव, 'डापकू'चे संजय पवार, श्रीमती टिना कुंदनाणी, आशिष पाटील आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. गोयल म्हणाले, सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या विविध विभागामार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करुन पुरेसा रक्तसाठा तयार ठेवावा, यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी नियोजन करावे. सर्व गरोदर माताची नियमित एचआयव्ही व गुप्तरोग तपासणी करावी. तसेच हिपॅटायटीसचे लसीकरण सर्व अती जोखीम गटातील व्यक्तींना करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी पुरेसा लशींचा साठा व एचआयव्ही आणि एसटीआय किट उपलब्ध ठेवण्यास सांगितले. तसेच एआरटी सेंटर येथे शिबिराचे आयोजन करुन एचआयव्ही संसर्गित रुग्णांचे आयुष्यमान भारत कार्ड काढावेत, अशा सूचनाही श्री. गोयल यांनी यावेळी केल्या.
जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी यांनी जिल्ह्यातील एचआयव्ही, एड्स कार्यक्रमाच्या कामाचा अहवाल सादर करताना म्हणाले, हिंगोली जिल्ह्यात सन 2002 पासून आतापर्यंत एकूण 4228 सामान्य गटातील रुग्णांची व 280 गरोदर स्त्रियांची नोंद झाली असून, एकूण 3989 रुग्णांची एआरटी केंद्रात नोंदणी झाली आहे. त्यापैकी 1969 रुग्णांना औषधोपचार सुरु आहेत. तसेच एप्रिल ते डिसेंबर 2024 या कालावधीत एकूण 33 हजार 376 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 71 एचआयव्ही संसर्गित आढळून आले आहेत. तर 24 हजार 661 गरोदर महिलांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 नवीन व 9 यापूर्वीच एचआयव्ही संसर्गित रुग्ण असल्याचे आढळून आले आहेत. तसेच एचआयव्ही संसर्गित महिलांच्या 10 मुलांचे 18 महिन्यानंतरचे तपासणी अहवाल हे निगेटिव्ह आढळून आले आहेत, अशी माहिती दिली. तसेच त्यांनी एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या व्यक्ती व देहविक्रय करणाऱ्या महिलांना इतर सामाजिक लाभाच्या बाल संगोपन, संजय गांधी निराधार योजना, राशन कार्ड, बस पास, घरकुल योजना, मतदान कार्ड, इत्यादी योजनांचा लाभ देण्यात येत असल्याची माहितीही दिली.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर शेवटी श्री. चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
*****
अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे आज हिंगोली जिल्हा दौऱ्यावर
हिंगोली(जिमाका),दि.25: राज्याच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य (सचिव दर्जा) गोरक्ष लोखंडे हे दि. 25 व 26 मार्च, 2025 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
आज दि. 25 मार्च, 2025 रोजी रात्री सोयीनुसार जळकोट जि.लातूर येथून निघून शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम.
दि. 26 मार्च, 2025 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 12 पर्यंत मुख्याधिकारी हिंगोली नगरपालिका यांच्यासोबत अनुसूचित जाती जमातीच्या निधीबाबत आढावा व कामाची पाहणी. दुपारी 12.30 ते 1.30 पर्यंत मुख्याधिकारी वसमत नगरपालिका यांच्यासोबत अनुसूचित जाती जमातीच्या निधीबाबत आढावा व कामाची पाहणी, दुपारी 1.30 ते 2.30 पर्यंत मुख्याधिकारी कळमनुरी नगरपालिका यांच्यासोबत अनुसूचित जाती जमातीच्या निधीबाबत आढावा व कामाची पाहणी, दुपारी 2.30 ते 3 पर्यंत राखीव. दुपारी 3 ते 4 पर्यंत मुख्याधिकारी सेनगाव नगरपंचायत यांच्यासोबत अनुसूचित जाती जमातीच्या निधीबाबत आढावा व कामाची पाहणी, दुपारी 4 ते 5 पर्यंत मुख्याधिकारी औंढा नगरपंचायत यांच्यासोबत अनुसूचित जाती जमातीच्या निधीबाबत आढावा व कामाची पाहणी करतील. सोयीनुसार हिंगोली येथून कारने पुणेकडे प्रयाण करतील.
*******
24 March, 2025
पौष्टीक तृणधान्य जिल्हास्तरीय कृषि महोत्सवाचे आयोजन शेतकऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन
हिंगोली(जिमाका),दि.24: जिल्ह्यातील शेतकरी व जनतेस पौष्टीक तृणधान्य पिकांचे महत्व पटवून देण्यासाठी कृषि विद्यापीठातील तसेच कृषि विज्ञान केंद्र, तोंडापूर येथील तज्ञ, आहार तज्ञ, प्रगतशील शेतकरी व पौष्टीक तृणधान्य उत्पादक व त्याचे पदार्थ तयार करणारे बचत गट यांच्या समावेशाने येथील महावीर भवनामध्ये बुधवार, दि. 26 मार्च, 2025 रोजी सकाळी 11 ते सायं. 6 वाजेपर्यंत हिंगोली, सेनगाव व कळमनुरी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिवशीय जिल्हास्तरीय महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
तसेच वसमत व औंढा नागनाथ येथील शेतकऱ्यांसाठी वसमत येथील प्रसाद मंगल कार्यालयामध्ये गुरुवार, दि. 27 मार्च, 2025 रोजी सकाळी 11 ते सायं. 6 वाजेपर्यंत एक दिवशीय जिल्हास्तरीय महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे.
या महोत्सवामध्ये पौष्टीक तृणधान्य या विषयामध्ये काम केलेल्या तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. पौष्टीक तृणधान्याचे पदार्थ तयार केलेल्या बचत गटांचे आणि उत्पादक शेतकऱ्यांचे महोत्सव स्थळी स्टॉल लावण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील सर्व शेतकरी व जनतेने या महोत्सवात उपस्थित राहून पौष्टीक तृणधान्य पिकांचे महत्व समजावून घेण्याचे आवाहन राजेंद्र कदम, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
*******
हिंगोली जिल्हा क्षयरोगमुक्त करण्यासाठी सातत्य ठेवावे – मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले
• जिल्हाधिकारी कार्यालयात जागतिक क्षयरोग दिन साजरा
• राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत क्षयरोगमुक्त ग्राम पंचायती सन्मानित
हिंगोली, दि. 24 (जिमाका): जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायतींच्या प्रतिनिधींनी टीबीमुक्त ग्राम पंचायती ठेवत, जिल्हा क्षयरोगमुक्त करण्यासाठी प्रयत्नात सातत्य ठेवण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी उपस्थितांना केले. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांच्या हस्ते क्षयरोगमुक्त ग्राम पंचायत अभियानांतर्गत टीबीमुक्त ग्राम पंचायतींना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावेळी श्रीमती भोसले बोलत होत्या.
यावेळी अपर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग फोपसे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजीत बांगर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, डॉ. संदीप काळे, डॉ. गणेश जोगदंड, डॉ. गजानन चव्हाण, डॉ. राजेश्वर कत्रूवार, डॉ. गारोळे, डॉ बालाजी भाकरे, आयएमएचे सचिव डॉ. राम मुंढे उपस्थित होते.
आगामी काळात हिंगोली टीबीमुक्त जिल्हा म्हणून घोषित झाला पाहिजे, त्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न करुन जास्तीत जास्त संशयीत क्षयरुग्ण शोधून तपासणी करावी व या आजाराचे तात्काळ निदान करावे. त्यासाठी जिल्हा क्षयरोग केंद्रामार्फत मोफत धुंकी तपासणी तसेच एक्सरे तपासणी केली जाते याचा जास्तीत-जास्त नागरिकांना फायदा होईल. त्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल यांनी राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत क्षयरोग निर्मूलन करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे. तरच जिल्हा टीबीमुक्त होण्याकडे आपल्याला वाटचाल करता येईल, असे सांगितले. टीबीमुक्त ग्राम पंचायत प्रभावी करण्यासाठी गाव पातळीपर्यंत प्रशिक्षणाची आवश्यकता असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी विशद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये यांनी केले.
यावेळी रौप्य पदक प्राप्त औंढा तालुका 6, वसमत तालुका 9, हिंगोली तालुका 4, कळमनुरी तालुका 5, सेनगाव तालुका 10 अशा एकूण 34 ग्राम पंचायतींना रौप्य पदक व प्रमाणपत्र देऊन सरपंच, आशा, आरोग्य कर्मचारी, समुदाय आरोग्य अधिकारी यांना सन्मानीत करण्यात आले. याच कार्यक्रमात राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्य करणारी आरोग्य संस्था म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश जोगदंड व प्रा. आ. केंद्र आखाडा बाळापूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश कत्रूवार यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच उत्कृष्ट कार्य करणारे समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बालाजी उबाळे यांनी केले. शासकीय परिचर्या महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींनी स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमासाठी जिल्हा क्षयरोग केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमा अंतर्गत पोर्टेबल एक्सरे मशीनचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
*****
शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल राखीव, आक्षेपासाठी प्रत्यक्ष हजर राहण्याच्या सूचना
हिंगोली, दि.24 (जिमाका): महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेतील 786 उमेदवारांचा निकाल काही कारणास्तव राखीव ठेवण्यात आला असून, ही परीक्षा दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी झाली आहे.
या प्रकरणी सुनावणीसाठी संबंधित उमेदवारांना दि. 25 मार्च ते 4 एप्रिल 2025 पर्यंत सकाळी 11 वाजता उमेदवारनिहाय दिलेल्या नियोजनाप्रमाणे आपले म्हणणे मांडण्यासाठी प्रस्तुत कार्यालयात उपस्थित राहण्याबाबतचे पत्र संबंधित उमेदवारांच्या ई-मेल, एस.एम.एस. व परीक्षार्थ्यांच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी उमेदवारांनी कळविण्यात आलेल्या दिवशी सकाळी 11 वाजता स्वखर्चाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या ठिकाणी वेळेत उपस्थित रहावे. या दिवशी उमेदवार समक्ष हजर न राहिल्यास त्यांचे या प्रकरणी काही सांगावयाचे नाही, असे गृहीत धरून त्याबाबत उपलब्ध पुराव्याच्या आधारे निर्णय घेण्यात येईल व तो निर्णय बंधनकारक राहील याची नोंद घ्यावी.
सुनावणीच्या वेळी आपण आपले आधारकार्ड, शिक्षक पात्रता परीक्षा 2024 मधील उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी, परीक्षेचे प्रवेशपत्र, पुराव्यासाठी परीक्षेच्या संदर्भातील आवश्यक असलेले अनुषंगीक सर्व कागदपत्रे, संदर्भात गुणपत्रक प्रमाणपत्र तसेच फोटो ओळखपत्र (चालक परवाना / बँक पासबूक / निवडणूक ओळखपत्र / पासपोर्ट यापैकी कोणतेही एक) यासह स्वतः उपस्थित राहावे. सुनावणीच्या वेळी आपल्या वतीने अन्य कोणालाही उपस्थित राहता येणार नाही याची नोंद घ्यावी, असे आवाहन आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
******
कळमनुरी येथील वराहमिहिर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मार्गदर्शन शिबीर
हिंगोली, दि.24 (जिमाका): कळमनुरी येथील वराहमिहिर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थी, पालक व इतर अभ्यागतांसाठी समुपदेशन कक्षाची स्थापना करण्यात आली असून येथे आज सोमवारपासून विद्यार्थी पालक व इतर अभ्यागतांना संस्थेमध्ये प्रवेश घेताना येणाऱ्या समस्येचे निराकरण करण्यात येणार आहे. तसेच संस्थेतील प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे, संस्थेत चालू असलेल्या अभ्यासक्रमांची माहिती, व्यवसायाचा कालावधी व विद्यार्थ्यांना प्रवेशांमध्ये येणाऱ्या इतर अडचणींवर माहिती देण्यात येणार आहे.
तसेच आय.टी.आय मध्ये प्रशिक्षण घेताना शासनाकडून देण्यात येणारे विद्यावेतन व इतर फायदे व प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर अप्रेंटीशीपसंबंधित महाराष्ट्र शासनाच्या एमएपीएस व केंद्र शासनाच्या एनएपीएस योजनाबदल माहिती देण्यात येणार आहे. तसेच अप्रेंटीशीप पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध असलेल्या नोकरीच्या खासगी व शासकीय विभागातील संधी अशा प्रकारचे मार्गदर्शन येथे मिळणार आहे. तरी पात्र व गरजूंनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य एस. एल. कोंडावार यांनी केले आहे.
******
जिल्ह्यात जागतिक जल दिनानिमित्त जनजागृतीविषयक उपक्रमाचे नियोजन - मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले
हिंगोली, दि.24 (जिमाका) : जागतिक जल दिनानिमित्त जिल्ह्यात तालुका व ग्रामपंचायतीमध्ये पाण्याचे महत्व, वापर, हाताळणे याबाबत जनजागृती व्हावी याकरिता शालेय विद्यार्थ्यांची स्वच्छता फेरी, गावकरी सहभागी स्वच्छता दिंडी, पिण्याच्या पाण्याचा परिसर स्वच्छता करणे, स्त्रोतांची क्लोरीनेशन प्रात्यक्षिक करणे आदी उपक्रम राबविण्यात येत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले यांनी सांगितले.
शनिवारी (दि. 22) जागतिक जल दिनानिमित्त पाण्याचा काटकसरीने वापर करणे, जलसंवर्धन, पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच पिण्याच्या पाण्याची जागा, पाणीपुरवठा करणारी यंत्रणा यांची साफसफाई करणे, तसेच शाळा अंगणवाडी परिसर स्वच्छता करणे, पाऊस पाणी संकलनासाठी नियोजन करणे, पाण्याचा साठा वाढविण्यासाठी गाव परिसरात पावसाचे वाहते पाणी आढळून जमिनीत मुरवणे गरजेचे आहे. याबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करून जल प्रतिज्ञा घेण्यात येत आहे. गावामध्ये भविष्यात पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध राहील. तसेच गावातील प्रत्येक घरामध्ये नळाद्वारे प्रती व्यक्ती 55 लिटर पिण्याचे शुद्ध पाणी मिळेल. यासाठी ग्रामस्थांबरोबर नियोजन करावे, असे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) संजय कुलकर्णी यांनी केले आहे.
जागतिक जल दिनाच्या निमित्ताने ग्रामस्तरावर 100 टक्के गाव नळ जोडणी पूर्ण होऊन ‘हर घर जल’ ग्रामपंचायत घोषित करण्यासाठी सरपंच व ग्रामसेवक ग्रामपंचायत बैठक घेऊन मार्गदर्शन करावे. पाणी गुणवत्ता या मोहिमेअंतर्गत स्वच्छता सर्वेक्षणबाबत तपासणी मोहीम राबवविणे, शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत येथील टाक्या साफ करून घेणे. नळ जोडणी असल्याची खात्री करणे, ग्रामपंचायत स्तरावर पाणी व स्वच्छता समिती समवेत लोक वर्गणी व पाणीपट्टी गोळा करणे, वैयक्तिक नळ जोडणी नोंदीबाबत गावस्तरावर आधार कार्ड गोळा करून ऑनलाईन नोंदी करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी दिले.
*******
23 March, 2025
शहीद दिनानिमित्त भगतसिंग, सुखदेव व राजगुरु यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
हिंगोली (जिमाका), दि. 23 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शहीद दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरु यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी नायब तहसीलदार डी. एस. जोशी, मनकर्णा जाधव, कुसुम भिसे, रमेशचंद्र मुकाडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
*****
राष्ट्रीय लोकन्यायालयात 4 कोटी 37 लाखांची 144 प्रकरणे निकाली
• लोकन्यायालयामुळे मिळाला तात्काळ न्याय, पक्षकारास केला 44 लाखाचा धनादेश सुपूर्द
• न्यायालय परिसरातील वृक्षांना पाणी देऊन जागतिक जल दिन साजरा
हिंगोली (जिमाका), दि. 23 : येथील तालुका विधी सेवा समिती, सर्वोच्च न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालय व परभणी जिल्हा न्यायालय तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली न्यायालयात दि.22 मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकन्यायालयामध्ये प्रलंबित असलेली 429 प्रकरणे तसेच विद्युत महावितरण कंपनी व विविध बँका यांची वाद दाखलपूर्व 3 हजार 330 प्रकरणे तडजोडीसाठी लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. त्यापैकी 144 प्रकरणे निकाली काढण्यात आली. तडजोडी आधारे प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणात तब्बल 4 कोटी 37 लाख 92 हजार 708 रुपयांची प्रकरणे निकाली काढण्यात आली.
या लोकन्यायालयासाठी हिंगोली येथे न्यायिक अधिकारी तसेच विधीज्ञ समाविष्ट असलेले पाच पॅनल तयार करण्यात आले होते.
या लोकअदालतीमध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश टी.एस.अकाली यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायाधीश-1 आर. व्ही. लोखंडे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-1 पी. जी. देशमुख, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर श्रीमती व्ही. व्ही. सावरकर, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर डी. यु. राजपूत, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आय. जे. ठाकरे यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम केले. ही लोकअदालत यशस्वी करण्यासाठी जिल्हा न्यायाधीश-2 श्रीमती एस.ए.माने-गाडेकर, मुख्य न्याय दंडाधिकारी श्रीमती ए. बी. कुरणे, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर जी. के. नंदनवार, तिसरे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती पी. आर. पमनानी यांनी प्रयत्न केले. या लोकअदालतीला वकील संघाचे अध्यक्ष ॲड. एस. आर. भुक्तर, उपाध्यक्ष ॲड. ए. पी. बांगर, सचिव ॲड. अखील अहेमद, वकील संघाचे सर्व सभासद, न्यायालयीन व पोलीस कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.
लोकन्यायालयामुळे मिळाला तात्काळ न्याय
पक्षकारास केला 44 लाखाचा धनादेश सुपूर्द
या लोकअदालतीमध्ये ज्याेती शिवाजी भालेराव (41 वर्षे) हिचे पती शिवाजी भालेराव हे अपघातामध्ये दि. 3 एप्रिल, 2024 रोजी मयत झाल्याने विद्यमान न्यायालय, हिंगोली येथे नुकसान भरपाई मिळण्यासाठी दि. 8 मे, 2024 रोजी दावा दाखल केला होता. हे प्रकरण लोकन्यायालयामध्ये ठेवण्यात आले होते. या प्रकरणामध्ये दोन्ही पक्षकारामध्ये तडजोड होऊन तडजोडी अंती 44 लाख रुपये रक्कम ठरविण्यात आली. या प्रकरणामध्ये लोकअदालतीच्या दिवशीच तात्काळ रॉयल सुंदरम इंशुरन्स कंपनीतर्फे पक्षकारांना सदरील रकमेचा धनादेश प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.
लोकअदालतीचे कामकाज सुरु होण्यापूर्वी न्यायालयीन परिसरातील वृक्षांना मान्यवरांच्या हस्ते पाणी देऊन जागतिक जल दिन साजरा करण्यात आला.
पुढील लोकअदालतीमध्ये पक्षकारांनी आपली प्रकरणे ठेवून जलद न्याय मिळवून घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांनी केले आहे.
*****
21 March, 2025
कुरुंदा पोलीस स्टेशन येथील बेवारस वाहनांची बुधवारी होणार लिलावाद्वारे विक्री
हिंगोली (जिमाका), दि. 21 : कुरुंदा पोलीस स्टेशन येथे अभिलेखावर नसलेल्या परंतु पोलीस स्टेशन परिसरात पडून असलेल्या बेवारस वाहनांची उपप्रादेशिक परिवहन कार्यालय हिंगोली यांच्यामार्फत तपासणी केली असता सदरची वाहने खूप वर्षापासून पोलीस स्टेशनमध्ये पडून असल्याने त्यांचे नंबर प्लेट, चेसीस क्रमांक, इंजिन क्रमांक स्पष्ट दिसत नाही व खोडलेले असल्याने त्याचा मूळ मालक कोण आहे हे कळू शकले नाही. त्यामुळे पोलीस स्टेशन परिसरात एकूण 30 दूचाकी वाहने पडून आहेत.
वरील वाहनांबाबत आजपर्यंत कोणीही मालकी हक्क किंवा त्यासंबंधी दस्तावेज सादर करुन मागणी केलेली नाही. वरील 30 दुचाकी वाहने कुरुंदा पोलीस स्टेशन आवारात खुल्या जागेत पाहण्यासाठी व्यवस्थित लावून ठेवलेल्या आहेत. या वाहनाची पोलीस ठाणे कुरुंदा येथे बुधवार, दि. 26 मार्च, 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता लिलावाद्वारे विक्री केली जाणार आहे. लिलावामध्ये भाग घेणाऱ्या इच्छुकांनी लिलावासंदर्भात लागणारी कागदपत्रे घेऊन हजर राहावेत, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक , पोलीस ठाणे, कुरुंदा ता. वसमत यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
******
पारधी जमातीच्या लाभार्थ्यांनी वैयक्तीक लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 21 : पारधी विकास योजना सन 2024-25 अंतर्गत पारधी जमातीच्या आदिवासी शेतकऱ्यांना तीन चाकी, चार चाकी मालवाहू, प्रवासी ॲटो खरेदीसाठी अर्थसहाय करणे, पारधी जमातीच्या लाभार्थ्यांना शेळी गट पुरवठा करणे या वैयक्तीक लाभाच्या योजनेसाठी हिंगोली जिल्ह्यातील पारधी जमातीच्या युवक-युवती, महिला, पुरुष शेतकरी लाभार्थ्यांकडून मंजूर विविध योजनासाठी दि. 28 मार्च, 2025 पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत.
यासाठी लाभार्थ्यांनी वरील कालावधीमध्ये प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय. कळमनूरी जि. हिंगोली येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय. कळमनूरी जि. हिंगोली यांनी केले आहे.
योजनानिहाय नाव व त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, अटी, शर्ती यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
पारधी जमातीच्या आदिवासी शेतकऱ्यांना तीन चाकी, चार चाकी मालवाहू, प्रवासी ॲटो खरेदीसाठी अर्थसहाय करणे : अर्जदार हा हिंगोली जिल्ह्यातील व पारधी जमातीचा असावा. परिवहन अधिकारी यांचा वाहन चालविण्याचा परवाना, सक्षम अधिकाऱ्याचे सहीचे जात प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र, आधारकार्ड, राशनकार्ड, तहसिलदाराचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, नजिकच्या काळातील एक पासपोर्ट फोटो, लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
पारधी जमातीच्या लाभार्थ्यांना शेळी गट पुरवठा करणे : अर्जदार हा हिंगोली जिल्ह्यातील व पारधी जमातीचा असावा. सक्षम अधिकाऱ्याचे सहीचे जात प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र, आधारकार्ड, तहसीलदाराचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, राशन कार्ड, नजीकच्या काळातील एक पासपोर्ट फोटो, लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे .
वरील दोन्ही योजनेसाठी हिंगोली जिल्ह्यातील पारधी जमातीच्या लाभार्थ्यांनीच एका योजनेसाठी अर्ज करावेत. यापूर्वी कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी अर्ज करु नयेत. केल्यास रद्द करण्यात येईल. योजनेचे अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि.हिंगोली यांच्या कार्यालयामध्ये दि. 28 मार्च, 2025 पर्यंत नोंदणी करुन मिळतील. अर्जदाराने जातीचा पुरावा व आधार कार्ड देऊन अर्ज करावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि.हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
******
वसतीगृहामध्ये चाईल्ड हेल्पलाईनमार्फत जनजागृती
हिंगोली (जिमाका), दि. 21 : येथील जवाहरलाल नेहरु मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहामध्ये चाईल्ड हेल्पलाईन 1098 मार्फत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमांत बालकांना त्यांचे हक्क, अधिकार, चांगला स्पर्श, वाईट स्पर्श मार्गदर्शन केले. तसेच चाईल्ड हेल्पलाईन 1098 या टोल फ्री क्रमांकाची माहिती देण्यात आली. चाईल्ड हेल्पलाईन ही बालकांना तात्काळ मदत करणारी हेल्पलाईन आहे. या हेल्पलाईनवर मिळालेली माहिती गोपनीय ठेवण्यात येते, असे सांगून बालकाला मदतीची गरज भासल्यास 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी चाईल्ड हेल्पलाईनचे प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे, समुपदेशक अंकुर पाटोडे, पर्यवेक्षक विकास लोणकर, वसतिगृहाचे सचिव राहूल कांबळे, शिक्षक विशाल कांबळे, मधुकर उबाळे तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
*******
शिवाजी महाविद्यालयातील रोजगार मेळाव्यात 106 उमेदवारांची प्राथमिक निवड
हिंगोली (जिमाका), दि. 21 : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर हिंगोली व शिवाजी महाविद्यालय, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच येथील शिवाजी महाविद्यालयात "पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा व पदवी तसेच पदवीधारक या पात्रतेच्या 248 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 106 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.
या रोजगार मेळाव्यात महाराष्ट्रातील विविध नामांकीत कंपनीचे उद्योजक उपस्थित होते. तसेच जिल्ह्यात विविध महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यासाठी विविध महामंडळाचे स्टॉल लावण्यात आले होते.
या मेळाव्यात मार्गदर्शन करताना शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. क्षीरसागर यांनी चांगल्या ठिकाणी आत्मविश्वासाने मुलाखत द्यावी व आपल्यातल्या सूप्त गुणांना वाव द्यावा, असा संदेश दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सहायक आयुक्त डॉ. रा.प्र.कोल्हे यांनी रोजगार मेळाव्याचा हेतू विशद करताना म्हणाले, युवकांनी बेकार बसून दीड जीबीचा डाटा खर्च करण्यापेक्षा मिळेल ती कामे स्वीकारावीत. या संधीतून मिळालेल्या कामाचा अनुभव पुढील संधीसाठी उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे युवकांनी मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवून रोजगार प्राप्त करुन घ्यावा, असे आवाहन केले. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री. बोथीकर यांनी कंपनीमध्ये मिळणाऱ्या पगाराचा विचार न करता आपल्याला अनुभव कसा मिळेल यासाठी प्रयत्न करावा, असे सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. शिराळे यांनी केले. या कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता हिंगोली या कार्यालयाचे नवनाथ टोनपे, मनोज लोखंडे, महेश राऊत, राजाभाऊ कदम, नागेश निरदुडे, रमेश जाधव, पवन पांडे, अमोल आडे, अभिजीत अलोने आणि शिवाजी महाविद्यालयाचे प्राध्यापक व इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
******
विशेष लेख - उष्माघात टाळा , आरोग्य सांभाळा
सध्या उन्हाळा सुरु झाला असून दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. भारतात हवामान खाते व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या निकषानुसार मैदानी भागात 40 डिग्री अंश सेल्सीअस, डोंगराळ भागात 30 डिग्री अंश सेल्सीअसपेक्षा व समुद्र किनारी भागात 37 अंश डिग्रीपेक्षा जास्त तापमान जात असल्यास त्यास उष्मलाट प्रवण क्षेत्र मानले जाते. उष्मा-लहर ही वातावरणीय तापमानाची स्थिती आहे. ज्यामुळे शारीरिक ताण येतो, ज्यामुळे कधीकधी मानवी जीवनावर अतिशय विपरीत परिणाम होत असतो. कोणत्याही ठिकाणचे कमाल तापमान सलग दोन दिवस 45 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राहिल्यास त्याला उष्मा लहरी स्थिती म्हणतात.
वाढत्या तापमानामुळे उन्हात फिरणाऱ्या व्यक्तीला उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी घ्यावयाची काळजी, उपाययोजना याची माहिती या लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्यात येत आहे.
हिंगोली जिल्ह्यामध्ये सध्या तापमानाचा पारा 37 ते 39 अंशापर्यंत पोहोचला आहे. कडाक्याच्या उन्हाळ्यात तापमानाचा पारा पुढील तीन महिने 42 ते 45 अंशांच्या घरात राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या शेतीची कामे सुरू असून शेतमजूर आणि शेतकरी उन्हाची पर्वा न करता शेतात राबतात. त्यामुळे त्यांना उष्माघाताचा फटका बसण्याची सर्वाधिक शक्यता असते. त्यामुळे उष्माघाताचा लोकांना त्रास होऊ नये, यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालयात स्वतंत्र उष्माघात कक्ष सुरू केले आहेत. उष्माघात कक्षात रुग्णांसाठी बेड, कुलर, थंड पाण्याची व्यवस्था, फॅन यासह औषधोपचारासाठी आवश्यक असलेली सर्व सामुग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे.
उष्माघात होण्याची कारणे :
शारीरिक श्रमाची, अंग मेहनतीचे व कष्टाची कामे करणे, कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणे, काच कारखान्यात काम करणे, जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे, घट्ट कपड्यांचा वापर करणे अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संपर्क येण्याने उष्माघात होऊ शकतो.
लक्षणे :
मळमळ, उलटी, हात पायात गोळे येणे, थकवा येणे, 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त ताप येणे, त्वचा गरम होणे व कोरडी पडणे, क्वचित लाल होणे, घाम न येणे, डि-हायड्रेशन, चक्कर येणे, निरुत्साही वाटणे, डोके दुखणे, छातीत धडधड होणे, रक्तदाब वाढणे, मानसिक अस्वस्थ, बेशुद्धवस्था इत्यादी लक्षणे आहेत.
अति जोखमीच्या व्यक्ती
बालके, लहान मुले, खेळाडू, सतत उन्हात काम करणाऱ्या व्यक्ती, वयस्कर व्यक्ती ज्यांना हृदय रोग, फुप्फुसाचे विकार, मूत्रपिडाचे विकार अशा व्यक्तींना अति जोखीम आहे.
प्रतिबंधात्मक उपाय :
वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळणे व शक्य नसल्यास थोड्या वेळाने सावलीत विश्रांती घेऊन पुन्हा काम करावे. कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असताना करावीत. उष्णता शोषून घेणारे कपडे (काळ्या किंवा भडक रंगाचे) वापरू नयेत. सैल पांढरे किंवा फिक्कट रंगाचे सूती कपडे वापरावेत. तीव्र उन्हाच्या वेळेस बाहेर जाणे टाळावे. बाहेर प्रवासाला जाताना पाणी सोबत ठेवावे. पाणी भरपूर प्यावे. डि-हायड्रेशन होऊ देऊ नये, लिंबू सरबत, लस्सी, ताक, नारळ पाणी इत्यादी प्यावे. उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, छत्री इत्यादीचा वापर करावा. घरामध्ये कामाच्या ठिकाणी कुलर्स, एअर कंडिशनर्स, वाळ्याचे पडदे यांचा वापर करावा. पार्क केलेल्या वाहनांमध्ये मुले किंवा पाळीव प्राण्याना सोडू नका. उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा.
उपचार :
रुग्णास प्रथम सावलीत आणावे, रुग्णाचे तापमान कमी करण्यासाठी त्वरित उपचार सुरू करावेत, रुग्णाचे कपडे सैल करुन त्वरित अंग थंड पाण्याने शरीराचे तापमान कमी होईपर्यंत पुसत राहावे. रुग्णास हवेशीर व थंड खोलीत ठेवावे, खोलीतील पंखे, कुलर्स, एअर कंडिशनर्स त्वरित चालू करावेत. रुग्ण शुद्धीवर आसल्यास त्यास थंड पाणी, जल संजीवनी द्यावे व डि-हायड्रोशन टाळावे. चहा, कॉफी देवू नये. रुग्णाच्या काखेखाली आइस पॅक ठेवावेत, रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याचा पट्टया ठेवाव्यात. थर्मामीटरने रुग्णाचे तापमान बघत राहावे व 36.8 सेल्सिअस तापमान होईपर्यंत वरील उपचार चालू ठेवावेत. नजीकच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा. रुग्णास रुग्णालयात भरतीची गरज पडल्यास 108 ॲम्बुलन्ससाठी कॉल करावा.
उष्माघात ही गंभीर स्थिती असून वेळीच उपचार न केल्यास जीवघेणा ठरू शकतो. त्याची लक्षणे ओळखून तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. गरम वातावरणात स्वतःची काळजी घेणे आणि इतरांनाही सावध करणे गरजेचे आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांनी तीव्र उन्हात फिरु नये, आरोग्याची काळजी घ्यावी. उष्माघातापासून बचाव करण्यासाठी वरील सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी केले आहे.
संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली
*******
20 March, 2025
महिला व बाल विकास विभागाची मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजनाच नाही, नागरिकांनी फसव्या जाहिरातींना बळी न पडण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 20 : सध्या समाज माध्यमावर 'मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजने'च्या नावाने संदेश प्रसारित केले जात आहे. महिला व बाल विकास विभागाकडून मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना अस्तित्वात नाही. ही फसवी जाहिरात असून नागरिकांनी समाज माध्यमावर येणाऱ्या अशा फसव्या पोस्टवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
दि. 1 मार्च 2020 नंतर ज्यांचे दोन्ही पालक अथवा एक पालक मृत्यू झाला आहे आणि त्या बालकाचे वय 18 वर्षापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील दोन मुलांना बाल सेवा अंतर्गत दरमहा 4 हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेचे अर्ज तहसील कार्यालयामध्ये उपलब्ध करण्यात आल्याचे चुकीचे मेसेज व्हायरल होत आहे. अनाथ किंवा एकल पालक बालकांसाठी महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेबाबत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, कार्यालय एस. 7, दुसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, हिंगोली येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.
नागरिकांनी कोणत्याही फसव्या संदेशांना बळी पडू नये व आर्थिक व्यवहार करु नयेत. तसेच अनाथ किंवा एकल पालक बालकांसाठी महिला व बाल विकास विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनाकरीता कार्यालयांमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
*****
वसमत ग्रामीण पोलीस स्टेशन येथील बेवारस वाहनांची होणार लिलावाद्वारे विक्री
हिंगोली (जिमाका), दि. 20 : वसमत ग्रामीण पोलीस स्टेशन येथे अभिलेखावर नसलेल्या परंतु पोलीस स्टेशन परिसरात पडून असलेल्या बेवारस वाहनांची उपप्रादेशिक परिवहन कार्यालय हिंगोली यांच्यामार्फत तपासणी केली असता सदरची वाहने खूप वर्षापासून पोलीस स्टेशनमध्ये पडून असल्याने त्यांचे नंबर प्लेट, चेसीस क्रमांक, इंजिन क्रमांक स्पष्ट दिसत नाही व खोडलेले असल्याने त्याचा मूळ मालक कोण आहे हे कळू शकले नाही. त्यामुळे पोलीस स्टेशन परिसरात बजाज सीटी-100, बजाज डिस्कव्हर सीटी-100, हिरो स्पेलेंडर, डिस्कव्हर, हिरो होंडा, टीव्हीएस, हिरो होंडा सीडी-100 व हिरो स्पेलेंडर सीडी-100 अशी एकूण 08 दूचाकी वाहने पडून आहेत.
वरील वाहनांबाबत आजपर्यंत कोणीही मालकी हक्क किंवा त्यासंबंधी दस्तावेज सादर करुन मागणी केलेली नाही. त्यामुळे नजीकच्या काळात या बेवारस वाहनांची लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक , पोलीस स्टेशन वसमत ग्रामीण यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
******
मोटार सायकल संवर्गासाठी नवीन वाहन क्रमांक मालिका चालू
हिंगोली (जिमाका), दि. 20 : यापूर्वीची मोटार सायकल संवर्गासाठीची मालिका एमएच-38-एएच ही संपुष्टात आल्यामुळे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने नवीन मालिका एमएच-38-एआय0001 ते 9999 ही मालिका चालू करण्यात येत आहे.
ज्या वाहन मालकांना वाहनासाठी आकर्षक क्रमांक राखीव करावयाचा आहे. त्यांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधून किंवा ऑनलाईन पध्दतीने आपला आकर्षक क्रमांक विहित शासकीय शुल्क भरुन राखीव करावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आश्विनी स्वामी यांनी केले आहे.
******
ग्राहकांनी नेहमी सजग व जागरुक राहण्याची गरज - जिल्हाधिकारी अभिनव गोयल
हिंगोली (जिमाका), दि. 20 : प्रत्येक क्षेत्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये ग्राहक हा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे नागरिकांनी नेहमी सजग व जागरुक राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले.
येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जागतिक ग्राहक दिनाचे औचित्य साधून ग्राहकांमध्ये जागृती आणण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने जागतिक ग्राहक दिनाचे आज आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेंद्र अग्रवाल, ग्राहक तक्रार निवारण समितीचे सदस्य आर. व्ही. धबडे, मानवाधिकार संरक्षण समितीचे अध्यक्ष एम. एम. राऊत, सनदी लेखापाल महेश बियाणी, जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब पाटील, जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते, सहायक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. गोयल म्हणाले, ग्राहकांमध्ये जनजागृती होण्यासाठी दरवर्षी जागतिक ग्राहक दिन साजरा केला जातो. त्यामुळे नागरिकांनी प्रत्येक उत्पादनाची गुणवत्ता तपासून खरेदी करावी. सेवा पुरवणाऱ्या संस्थांकडून योग्य सेवा पुरवल्या जात नाहीत. नागरिकांनी वस्तू खरेदी केल्यानंतर पक्के बिल घ्यावे. तसे केल्यास शासनाकडे महसूल जमा होतो. त्यामुळे विविध सेवा, योजना पुरविताना शासनाकडून चांगल्या दर्जाच्या सोयीसुविधा पुरवल्या जाऊ शकतात. त्यासाठी दरमहा शाळेमध्ये सायबर सह विविध विषयावर कार्यशाळा घेण्यासाठी नियोजन करुन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी. नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी केंद्र शासनाने जनतेची गा-हाणी (पब्लिक ग्रिव्हान्सेस) पोर्टल आणि राज्य शासनाने आपले सरकार पोर्टलची निर्मिती केली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारची तक्रार असेल तर पोर्टलवर करावी. त्याचे वेळीच निराकरण करण्यात येईल, असे सांगितले.
सायबर सुरक्षा विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांनी ऑनलाईन खरेदी करताना, कर्ज घेतांना तसेच फेसबूक, इन्स्टाग्रामचा दुरुपयोग करुन फसवणूक होत आहेत. त्यामुळे समाज माध्यमाचा वापर काळजीपूर्वक करावा. सायबर फसवणुकीत होणारे धोके सद्यस्थितीत गुंतागुंतीचे आहेत. त्यामुळे सद्सदद्विवेकबुद्धीचा वापर करावा. आमिषांपासून दूर राहावे. पासवर्ड मजबूत ठेवावे. विनाकारण कोणत्याही साईट्स शोधू नये, अनोळखी कॉल्सपासून सावध राहावे. सायबर चोरांनी आर्थिक फसवणूक केल्यास १९३० वर संपर्क साधण्याचे आवाहन केले. तसेच सायबर फसवणूक होत असल्याचे आपल्या लक्षात येताच जवळच्या सायबर शाखेशी किंवा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे सांगितले.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे सदस्य श्री. आर. व्ही. धबडे यांनी बोलताना म्हणाले, शेवटच्या माणसाच्या कल्याणासाठी व ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी शासनाने प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग स्थापन केले आहे. दैनंदिन जीवनाशी हा कायदा सुसंगत असून याची जनजागृती होणे गरजेचे असल्याचे सांगून आपली फसवणूक झाल्यास, वस्तू व सेवा देण्यात त्रुटी आढळून आल्यास आपणाकडे असलेल्या पक्क्या बिलासह जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात तक्रार द्यावी, त्याचे वेळीच निराकरण करण्यात येईल, असे सांगितले.
सनदी लेखापाल महेश बियाणी यांनी शासनाने जुनी पेन्शन बंद करुन एनपीएस प्रणाली लागू केली. या एनपीएस प्रणालीबाबत सविस्तर माहिती दिली.
ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश अग्रवाल यांनी ग्राहकांची पिळवणूक थांबविण्यासाठी ग्राहक चळवळीचे प्रणेते बिंदू माधव जोशी यांच्या अथक प्रयत्नातून ग्राहक तक्रार निवारण कायदा अस्तित्वात आला आहे. त्या कायद्यामध्ये असलेल्या सहा अधिकार सांगून कायद्याचे महत्त्व विशद केले. तसेच ग्राहकांनी खरेदी करतांना उत्पादने गुणवत्तापूर्ण असल्याची खात्री करुनच खरेदी करावेत, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. विजय निलावार यांनी केले व शेवटी जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब पाटील सर्व उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन व ग्राहक चळवळीचे प्रणेते बिंदु माधव जोशी आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*******
18 March, 2025
हळद पिकासाठीचे प्रशिक्षण संपन्न
हिंगोली (जिमाका), दि. 18 : मसाला मंडळ, प्रादेशिक कार्यालय मुंबई आणि कृषि विज्ञान केंद्र तोंडापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हळद पिकासाठी 'उत्तम कृषि पद्धती आणि स्वच्छ हळद प्रक्रिया' या विषयावर एक दिवसीय शेतकरी क्षमता वृध्दी प्रशिक्षण कार्यक्रम कृषि विज्ञान केंद्र तोंडापूर येथे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.
यावेळी मुंबई मसाले बोर्डाचे विस्तार सहायक किशोर कुमार यांनी स्पाइसेस बोर्डाचे कार्य, उद्देश, 52 विविध स्पाइसेस बोर्डमध्ये समाविष्ट आहेत, तसेच 26 राज्यामध्ये हे बोर्ड कार्य करत आहे व स्पाइसेस पार्क, हळदीचे बॉयलर, पॉलिशर व त्याकरिता असलेल्या अनुदानाविषयी माहिती दिली.
मा. बाळासाहेब ठाकरे हळद (हरीद्रा) संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे तंत्र अधिकारी रमेश देशमुख यांनी भौगोलिक मानांकन असलेली वसमत हळद, त्यांची काही उदाहरणे, हळदीच्या विविध वाणाचे महत्त्व व त्याची लागवड करण्याची पध्दत, चांगल्या स्वच्छता पद्धतीने हळद प्रक्रिया ज्यामध्ये जागेची निवड, बियाणे आणि लागवड साहित्य, लागवडीसाठी पिक व्यवस्थापन व कीटकनाशक वापरताना घ्यावयाची काळजी या विषयावर सविस्तर माहिती दिली.
श्री दत्तगुरू शेतकरी उत्पादक कंपनी, कळमनुरीचे संचालक गंगाधर श्रृंगारे यांनी हळद उत्पादन कसे वाढवायचे, त्याकरिता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी करावा. दर दिवशी माणसाला 10 ग्राम प्रती दिवस प्रति व्यक्ती हळद लागते. हे प्रमाण आपण 20 ग्राम प्रती माणशीवर नेऊ शकल्यास जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब ठरेल. त्याकरिता आपण योग्य हळदीचे व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
उद्यानविद्या विषय विशेषज्ञ अनिल ओळंबे यांनी मार्गदर्शन करतांना हळदीचे प्रकार, महत्व, खाण्याची हळद, देशातील हळदीची लागवड आणि उत्पादन, हिंगोली जिल्ह्याचे वर्षनिहाय लागवड क्षेत्र, उत्पादकता वाढविण्याचे सूत्रे, हवामान सरासरी 25 ते 35 अंश सेल्सिअस तापमानामध्ये पिकाची वाढ चांगली होते, चुनखडीयुक्त जमीन लागवडीकरिता टाळावी, माती परीक्षण, पूर्व मशागत, सुधारित वाणाची निवड, योग्य बेण्याची निवड, बेणे प्रक्रिया, जमीन चुनखडीयुक्त जमीन टाळावी, पूर्व मशागत, सुधारित वाणाची निवड, लागवडीची वेळ, तण नाशकाचा वापर, एकात्मिक खत, कीड व रोग व्यवस्थापन तसेच मागील चार वर्षापासून हळदीच्या भावामध्ये चढउतार होत आहे. त्याकरिता शेतकऱ्यांनी चांगली प्रतीच्या हळदीचे उत्पादन घेणे गरजेचे असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अतुल मुराई व आभार प्रदर्शन अनिल ओळंबे यांनी केले. तालुका कृषि अधिकारी महादेव कुंभार, संजय शिंदे, मसाले विस्तार प्रशिक्षणार्थी सूरज गमरे तसेच हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावातील हळद लागवड शेतकरी व युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*******
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण कालावधी आता 11 महिन्याचा • प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना पुढील 5 महिन्यासाठी नियुक्ती देतांना निर्देशाचे पालन करावे
हिंगोली (जिमाका), दि. 18 : राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षणाचा कालावधी 11 महिने करण्यास दिनांक 10 मार्च, 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेत पुन्हा रुजू झाल्याच्या दिनांकापासून 5 महिन्याच्या कालावधीसाठी कार्य प्रशिक्षण अनुज्ञेय असेल. त्याअनुषंगाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पुढील 5 महिन्याकरिता नियुक्ती देतांना खालील बाबींची नोंद घ्यावी.
या योजनेअंतर्गत सद्यस्थितीत जे उमेदवार कार्यप्रशिक्षण घेत आहेत, त्यांचा कार्यप्रशिक्षण कालावधी ते रुजू झाल्याच्या दिनांकापासून 11 महिने असा असेल याची दक्षता आपल्या स्तरावरून घेण्यात यावी. तसेच ज्या प्रशिक्षणार्थीचा 6 महिन्याचा प्रशिक्षण कालावधी यापूर्वीच पूर्ण झाला आहे. अशा उमेदवारांना पुढील 5 महिन्याच्या प्रशिक्षणासाठी सबंधित आस्थापनेत रूजू होण्याकरिता उमेदवारांना दि. 30 एप्रिल 2025 पूर्वी रूजू करून घेवून आस्थापनेच्या लेटर हेडवर नियुक्ती आदेश हार्ड कॉपीसह जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालय हिंगोली येथे प्रत्यक्ष जमा करावे. या योजनेत यापूर्वी सहभागी असलेल्या खाजगी आस्थापनांनी सर्टीफिकेट ऑफ इनकार्पोरेशन (Certificate of incorporation), उद्यम आधार व ईपीएफ, ईएसआयसी, जीएसटी, डीपीआयटी यापैकी एक अशा प्रकारे किमान दोन प्रमाणपत्र विभागाच्या https://www.cmykpy.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर शासन निर्णयाच्या दिनांकापासून ३० दिवसाच्या आत सादर करावे.
उमेदवार रूजू होते वेळी तो संबंधित आस्थापनेत तसेच सदर आस्थापनेशी सबंधित इतर आस्थापना, कार्यालयात यापूर्वी कधीही कायम, तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत नसल्याबाबतचे तसेच, कुठलाही हितसबंध नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करणे अनिवार्य राहील. तसेच संबंधित आस्थापनेनेही कार्य प्रशिक्षणासाठी रूजू होणारा प्रशिक्षणार्थी यापूर्वी सदर आस्थापनेत अथवा सदर आस्थापनेशी संबंधित इतर आस्थापना, कार्यालयात कायम, तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आनिवार्य राहील.
वरील दोन्ही प्रमाणपत्र संबंधित आस्थापनेने उमेदवार रूजू झाल्याच्या दिनांकापासून 15 दिवसाच्या आत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, एस-3 दुसरा माळा, हिंगोली या कार्यालयास सादर करावे.
अधिक माहितीकरिता कार्यालयाच्या 02456-224574 या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे अवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर हिंगोली या विभागाचे सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांनी केले आहे.
******
17 March, 2025
जिल्हाधिकारी कार्यालयात आरटीएस दक्षता व सनियंत्रण कक्षाची स्थापना
• जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते आरटीएस दक्षता व सनियंत्रण कक्ष, निवासी उपजिल्हाधिकारी यांचे कक्ष व त्यांच्या नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचे उद्घाटन
हिंगोली (जिमाका), दि. 17 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आरटीएस दक्षता व सनियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. तसेच यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कक्षाचे व महसूल विभागाच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या कार्यालयाचे उद्घाटनही जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्हा नियोजन अधिकारी ग. गो. चितळे, तहसीलदार आश्विनकुमार माने यांच्यासह सर्व नायब तहसीलदार, सर्व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी आरटीएस दक्षता व सनियंत्रण कक्षामार्फत आपले सरकार सेवा केंद्र तसेच आरटीएसवर प्राप्त अर्जाचा नियमित आढावा घेऊन संबंधित विभागाकडून प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच त्यांनी तसेच त्यांनी आरटीएस दक्षता व सनियंत्रण कक्ष, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कक्ष व महसूल विभागाच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या कार्यालयाची पाहणी करुन योग्य त्या सूचना केल्या.
******
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 17 : देशातील युवकांना कंपनी, आस्थापनेमध्ये अनुभवाची संधी प्राप्त करून देण्यासाठी भारत सरकारने प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेची अर्ज प्रक्रिया सुरु केली आहे.
या योजनेंतर्गत विविध शासकीय मंत्रालये, विभाग व सार्वजनिक क्षेत्रातील उमक्रमामध्ये इंटर्नशिपासाठी अर्ज स्वीकारले जातात. इंटर्नशिप मोहिमेचा कालावधी साधारणपणे 12 महिन्यापर्यंत असतो. या कालावधीत इंटर्न्सना त्यांच्या कामाच्या क्षेत्राशी संबंधित विविध कार्ये पार पाडायला दिली जातात. यामुळे ते प्रत्यक्ष शासनाच्या कार्यपध्दती, धोरण आणि विकास योजनांबद्दल सखोल ज्ञान मिळवू शकतात.
यासाठी उमेदवार हा 21 ते 24 वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे. उमेदवारांने किमान दहावी, बारावी, आयटीआय, पदवी असणे आवश्यक आहे. कुंटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असावे. कुटुंबातील सदस्य शासकीय नोकरीत नसावा.
योजनेचे फायदे : विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाच्या अनुभवाची संधी मिळते. ज्यामुळे त्यांचे व्यावसायिक कौशल्य विकसित होतात. इंटर्नशिपद्वारे इंटर्न्सना सरकारच्या कामकाजाची सखोल माहिती मिळते. भविष्यात सरकारी क्षेत्रामध्ये करिअर करण्याच्या दृष्टीने उपयुक्त नेटवर्कींग साधता येते. इंटर्नशिप पूर्ण केल्यावर काही प्रमाणात मानधन देखील दिले जाते. त्यामुळे आर्थिक दृष्टीने ही योजना अधिक आकर्षक ठरते. इंटर्नशिपचे माध्यम विद्यार्थ्यांना शासकीय योजनांमध्ये नवीन आणि ताज्या विचारांची माहिती देते. यामुळे त्यांना सामाजिक कार्यासाठी प्रेरणा मिळते.
असा करा अर्ज ...
या योजनेसाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांनी http://pminternship.mca.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून प्रोफाईल तयार करावी. त्यानंतर विविध क्षेत्रातील इंटर्नशिपसाठी अर्ज करावा. प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना देशाच्या तरुणांना एक सुवर्णसंधी देऊन त्यांना शासनाच्या कार्यप्रणालीशी जोडते. त्यामुळे त्यांचा भविष्यकाळ उज्वल होणार आहे. या योजनेचा लाभ घेऊन भारताच्या आगामी पिढीला अधिक सक्षम बनविण्याचे उदि्दष्ट आहे.
या योजनेसाठी जास्तीत जास्त उमेदवारांनी दि. 31 मार्च, 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत. तसेच काही अडचण आल्यास 02456-224574 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांनी केले आहे.
*******
सुशिक्षित बेरोजगारांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाची सुवर्ण संधी • 20 मार्च रोजी भरती मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 17 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर हिंगोली आणि शिवाजी महाविद्यालय, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली जिल्ह्यातील नोकरी इच्छूक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शिवाजी महाविद्यालय, कोथळज रोड, हिंगोली येथे गुरुवार(दि. 20) रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा तथा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षण भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या रोजगार मेळाव्यात संत नामदेव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित हिंगोली, वैजनाथअप्पा सराफ मराठवाडा नागरी सहकारी बँक लि.हिंगोली, शिऊर साखर कारखाना वाकोडी, स्वतंत्र मायक्रो फायनान्स वाशिम, सिध्दनाथ नागनाथ ॲग्रोवेच फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि.हिंगोली, फूजन मायक्रो फायनान्स प्रा.लि.हिंगोली, भास्कर सर्व्हीस ॲन्ड सप्लायर प्रा.लि.पुणे, क्रेडिट एक्सेस ग्रामीण लि. हिंगोली, भारत फायनान्स लि.हिंगोली, सॉपिओ आनेलिटिक्स नोडल एजन्सी हिंगोली, भारतीय जीवन विमा निगम हिंगोली, एसबीआय लाईफ इन्शुरन्स हिंगोली इत्यादी कंपनी सहभागी होणार आहेत. तसेच हिंगोली जिल्ह्यातील शासनाच्या विविध महामंडळाचे स्टॉल या रोजगार मेळाव्यात लावण्यात येणार आहेत. दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर या शैक्षणिक अर्हतेनुसार 400 पेक्षा अधिक रिक्त पदे कौशल्य विकास विभागाच्या www.cmykpy.mahaswayam.gov.in, www.rojgar.mahaswayam.gov.in व www.ncs.gov.in या संकेतस्थळावर अधिसूचित केली आहेत.
आपल्या शैक्षणिक अर्हतेनुसार पदाची खात्री करुन खासगी क्षेत्रात नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज करावेत आणि स्वतः मूळ कागदपत्रांसह दिनांक 20 मार्च रोजी सकाळी 10 वाजता शिवाजी महाविद्यालय, कोथळज रोड, हिंगोली येथे स्वखर्चाने उपस्थित रहावे. या मेळाव्याच्या अधिक माहितीसाठी 02456-224574 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे अवाहन सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांनी केले आहे.
*****
13 March, 2025
उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने सर्वत्र उष्माघात कक्ष स्थापन करण्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचे निर्देश
• आरोग्य विभाग सतर्क : आला उन्हाळा, आरोग्य सांभाळा
हिंगोली (जिमाका), दि. 13 : सध्या उन्हाळा सुरु झाला असून दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. वाढत्या तापमानामुळे उन्हात फिरणाऱ्या व्यक्तीला उष्माघात होण्याची शक्यता असल्याने तीव्र उन्हात फिरु नये. तसेच नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी केले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालय येथे उष्माघात कक्षात रूग्णांना सेवा देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांनी दिल्या आहेत.
हिंगोली जिल्ह्यामध्ये सध्या तापमानाचा पारा 37 ते 39 अंशापर्यंत पोहोचला आहे. कडाक्याच्या उन्हाळ्यात तापमानाचा पारा पुढील तीन महिने 42 ते 45 अंशांच्या घरात राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या शेतीची कामे सुरू असून शेतमजूर आणि शेतकरी उन्हाची पर्वा न करता शेतात राबतात. त्यामुळे त्यांना उष्माघाताचा फटका बसण्याची सर्वाधिक शक्यता असते. त्यामुळे उष्माघाताचा लोकांना त्रास होऊ नये, यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालयात स्वतंत्र उष्माघात कक्ष सुरू केले आहेत.
उष्माघात कक्षात रुग्णांसाठी बेड, कुलर, थंड पाण्याची व्यवस्था, फॅन यासह औषधोपचारासाठी आवश्यक असलेली सर्व सामुग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच वाढत्या उष्णतेमुळे निर्माण होणाऱ्या आजारांसह होणारे दुष्परिणामाबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
उष्माघात होण्याची कारणे :
शारीरिक श्रमाची, अंग मेहनतीचे व कष्टाची कामे करणे, कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणे, काच कारखान्यात काम करणे, जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे, घट्ट कपड्यांचा वापर करणे अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संपर्क येण्याने उष्माघात होऊ शकतो.
लक्षणे :
मळमळ, उलटी, हात पायात गोळे येणे, थकवा येणे, 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त ताप येणे, त्वचा गरम होणे व कोरडी पडणे, क्वचित लाल होणे, घाम न येणे, डि-हायड्रेशन, चक्कर येणे, निरुत्साही वाटणे, डोके दुखणे, छातीत धडधड होणे, रक्तदाब वाढणे, मानसिक अस्वस्थ, बेशुद्धवस्था इत्यादी लक्षणे आहेत.
अति जोखमीच्या व्यक्ती
बालके, लहान मुले, खेळाडू, सतत उन्हात काम करणाऱ्या व्यक्ती, वयस्कर व्यक्ती ज्यांना हृदय रोग, फुप्फुसाचे विकार, मूत्रपिडाचे विकार अशा व्यक्तींना अति जोखीम आहे.
प्रतिबंधात्मक उपाय :
वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळणे व शक्य नसल्यास थोड्या वेळाने सावलीत विश्रांती घेऊन पुन्हा काम करावे. कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असताना करावीत. उष्णता शोषून घेणारे कपडे (काळ्या किंवा भडक रंगाचे) वापरू नयेत. सैल पांढरे किंवा फिक्कट रंगाचे सूती कपडे वापरावेत. तीव्र उन्हाच्या वेळेस बाहेर जाणे टाळावे. बाहेर प्रवासाला जाताना पाणी सोबत ठेवावे. पाणी भरपूर प्यावे. डि-हायड्रेशन होऊ देऊ नये, लिंबू सरबत, लस्सी, ताक, नारळ पाणी इत्यादी प्यावे. उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, छत्री इत्यादीचा वापर करावा. घरामध्ये कामाच्या ठिकाणी कुलर्स, एअर कंडिशनर्स, वाळ्याचे पडदे यांचा वापर करावा. पार्क केलेल्या वाहनांमध्ये मुले किंवा पाळीव प्राण्याना सोडू नका. उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा.
उपचार :
रुग्णास प्रथम सावलीत आणावे, रुग्णाचे तापमान कमी करण्यासाठी त्वरित उपचार सुरू करावेत, रुग्णाचे कपडे सैल करुन त्वरित अंग थंड पाण्याने शरीराचे तापमान कमी होईपर्यंत पुसत राहावे. रुग्णास हवेशीर व थंड खोलीत ठेवावे, खोलीतील पंखे, कुलर्स, एअर कंडिशनर्स त्वरित चालू करावेत. रुग्ण शुद्धीवर आसल्यास त्यास थंड पाणी, जल संजीवनी द्यावे व डि-हायड्रोशन टाळावे. चहा, कॉफी देवू नये. रुग्णाच्या काखेखाली आइस पॅक ठेवावेत, रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याचा पट्टया ठेवाव्यात. थर्मामीटरने रुग्णाचे तापमान बघत राहावे व 36.8 सेल्सिअस तापमान होईपर्यंत वरील उपचार चालू ठेवावेत. नजीकच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा. रुग्णास रुग्णालयात भरतीची गरज पडल्यास 108 ॲम्बुलन्ससाठी कॉल करावा, अशी माहिती सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग फोपसे यांनी दिली आहे.
***
महिला लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन
हिंगोली (जिमाका), दि. 13 : राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला समान हक्क व समान संधी असा मूलभूत हक्क दिलेला आहे. त्याअंतर्गत समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे. तसेच त्यांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी किंवा तिसऱ्या सोमवारी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन राबविण्यात येतो.
माहे मार्च, 2025 च्या महिला लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, (दि. 17 मार्च) रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे. समस्याग्रस्त व पीडित महिलांनी त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, कक्ष क्र. एस-7, हिंगोली यांच्या कार्यालयात सादर करावेत. यामध्ये न्याय प्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक ती कागदपत्रे न जोडलेले, सेवा, आस्थापनाविषयक बाबी, तक्रार निवेदन वैयक्तिक स्वरुपाची नसेल असे अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
समस्याग्रस्त व पीडित महिलांनी शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या व्यासपीठाचा उपयोग आपल्या अडचणी सोडविण्यासाठी करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
******
जिल्ह्यात दूध उत्पादन व संकलन वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज - अपर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड
हिंगोली (जिमाका), दि. 13 : जिल्ह्यात दूधाचे उत्पादन व संकलन वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांनी आढावा बैठकीत केले.
जिल्ह्यातील दूध संकलनाचे प्रमाण व वितरण वाढविण्यासाठी तसेच दुधातील भेसळ थांबविण्यासाठी प्रतिबंधकात्मक उपाययोजना करण्यासाठी अपर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, जिल्हा दूग्ध व्यवसाय विकास अधिकारी शिवाजी गिनगिने, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पुणे, सहायक आयुक्त डॉ. कल्यापूरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सखाराम खुणे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे श्री. चौधरी यांची उपस्थिती होती.
दूध उत्पादनात वाढ करणे, उत्पादित होणारे सर्व दूध संकलीत करणे. ज्या गावात दूध संकलन केंद्र नाहीत त्या गावामध्ये दूध संकलन केंद्र सुरु करावेत. दूध संकलन केंद्रामुळे त्या गावात उत्पादित होणाऱ्या दुधास बाजारपेठ उपलब्ध होईल आणि त्यातून शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होईल. शासनाच्या विविध योजनांची प्रचार व प्रसिध्दी करुन त्यांना योजनेतून दुधाळ जनावरे उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करावेत. शेतकऱ्यांकडे असलेल्या गायी-म्हशीचे दूध उत्पादन वाढविण्यासाठी त्यांना जंतनाशकाचे महत्व, चाऱ्याचे नियोजन व विनियोजनाबाबत मार्गदर्शन करावे. जनावरांना खुराक देण्याविषयी मार्गदर्शन करावे. दुधाळ जनावरांची संख्या वाढविण्यासाठी दुग्ध विकास विभाग व बँकेच्या समन्वयातून शेतकऱ्यांना दुधाळ जनावरांचे वाटप करावे. तसेच बचत गटांच्या महिलांनाही दुधाळ जनावराचे वाटप करावेत. दुधाळ जनावरांची संख्या वाढविण्यासाठी प्रत्येक गावात शिबिरे घेऊन प्रबोधन करावेत. दुधाळ जनावरांचे खाद्य, दूध उत्पादन आणि व्यवस्थापनावर विशेष लक्ष द्यावेत, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी श्री. माचेवाड यांनी यावेळी दिल्या.
तसेच दूध, पनीर किंवा इतर दुग्धजन्य पदार्थात होणारी भेसळ थांबविण्यासाठी अन्न व औषध प्रशासन, दुग्धविकास विभाग, पोलीस प्रशासन व पशुसंवर्धन विभागांनी समन्वयाने काम करावे. आगामी येणाऱ्या रमजान ईद सणानिमित्त मोठ्या प्रमाणावर दुधाची आवश्यकता भासते. याप्रसंगी दुधात कुठलीही भेसळ होणार नाही याची खबरदारी घ्यावी. दूध भेसळ थांबविण्यासाठी पथक नेमून धाडी टाकावेत. दुधाचे नमुने घ्यावेत. जे नमुने भेसळयुक्त आढळून येतील त्यांच्यावर कार्यवाही करावी, असेही त्यांनी यावेळी निर्देश दिले.
या बैठकीस खाजगी दूध संकलन केंद्र हेरिटेज डेअरी, साई डेअरी, विजापुरी दूध डेअरी यांचे संचालक, जिल्ह्यातील सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त डॉ. बुचाले, डॉ. निश्चल, डॉ. राठोड, डॉ. मुस्तरे, डॉ. ऊके तसेच पशुधन विकास अधिकारी विस्तार डॉ.इंगोले, डॉ. पारवेकर, डॉ. देवकर, डॉ.नरवाडे व डॉ. नाईक उपस्थित होते.
******
12 March, 2025
पाणलोट व वृक्ष लागवड चळवळ काळाची गरज- जिल्हाधिकारी अभिनव गोयल
हिंगोली, (जिमाका), दि.12: जिल्ह्यात उद्भवणाऱ्या संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ग्रामस्थांनी गावाच्या भौगोलिक परिस्थितीनुसार पाणलोट उपचार पध्दतीचा अवलंब करून पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीमध्ये मुरवला पाहिजे. यासाठी गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाणलोट क्षेत्राची कामे करावीत. तसेच गावांच्या लोकसंख्येनुसार ग्रामस्थांनी प्रती व्यक्ती दोन झाडे लावावीत. पाणलोट विकास चळवळ व वृक्ष लावगड करणे ही काळाची गरज बनली आहे. त्यासाठी ग्रामस्तरावर मोठ्या प्रमाणावर अभियान राबविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी यावेळी केले.
प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना-पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत पाणलोटविषयक कामाचे महत्त्व विशद करून या कामात लोकांचा सहभाग वाढावा यासाठी जनजागृती व प्रसिध्दी करण्यासाठी मंगळवारी सेनगाव तालुक्यातील डोंगरगाव येथे केंद्र शासनामार्फत वॉटरशेड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेला जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. त्यावेळी श्री. गोयल बोलत होते. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम, जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रफुल खिराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम म्हणाले की, भविष्यामध्ये केंद्र व राज्य शासनामार्फत शेतकऱ्यांना दिला जाणारा लाभ हा शेतकरी ओळखपत्र असल्याशिवाय मिळू शकणार नाही. यासाठी गावातील 100 टक्के शेतकऱ्यांनी आपले शेतकरी ओळखपत्र तयार करून घ्यावीत, असे आवाहन केले. कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. पी. पी. शेळके यांनी शेतकऱ्यांनी जमिनीची माती तपासणी करून घ्यावी. यामुळे जमिनीला कोणत्या घटकाची आवश्यकता आहे याची माहिती मिळू शकेल व त्यानुसार पीक पध्दतीमध्ये बदल करता येईल, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेनगावचे तालुका कृषी अधिकारी संदीप वळकुंडे यांनी केले.
या वॉटरशेड यात्रेच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व वॉटरशेड सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच गावामध्ये पाणलोट क्षेत्रात काम करणाऱ्या जलयोध्दा व धारिणीताई यांनाही जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणत्राचे वितरण करण्यात आले .
ग्रामस्थांना पाणलोट विषय कामाची माहिती मिळण्यासाठी केंद्र शासनाने पाठविलेल्या मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून पाणलोटविषयक चित्रफित दाखविण्यात आली तसेच ग्रामस्थांना मृद व जलसंवर्धनाची कामे करावी, यासाठी मृद व जलसंवर्धनाची शपथ दिली. ‘पाणी की पाठशाला’मध्ये पाणलोटावर शाहीर धम्मानंद इंगोले यांनी विविध गिते व पथनाट्य सादर केले. शाळेतील मुलांनी पाणलोटावर पथनाट्याचे सादरीकरणे केले. तसेच गावातील महिलांनी पारंपारिक वेषभूषेत गिताच्या माध्यमातून लोककलेचे सादरीकरण केले.
यावेळी मान्यवारांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले व कार्यक्रमाच्या औचित्याने पाणलोट क्षेत्राशी संबंधित काही नवीन कामाचे भूमीपूजन व पूर्ण झालेल्या कामाची पाहणी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार मुरलीधर राठोड यांनी मानले. कार्यक्रमाला महंत नेहरू महाराज (पोहरादेवी तीर्थक्षेत्र), सरपंच कविता चव्हाण, उपसरपंच विलास ससेदे, उपविभागीय कृषि अधिकारी प्रदीप कच्छवे, गट विकास अधिकारी सेनगाव, जलसंधारण अधिकारी विशाल चव्हाण, जलसंधारण अधिकारी विठ्ठल काळबांडे, जलसंधारण अधिकारी श्री. बारहत्ते कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, पाणलोट विकास पथक सदस्य व कृषि विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी, सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
******
Subscribe to:
Posts (Atom)