08 March, 2025
शाहीर, गायिकांच्या गायनाने लोकसंगीत महोत्सवाचा समारोप
हिंगोली ( जिमाका), दि. ०८ : सुप्रसिद्ध गायक विष्णु शिंदे, गायिका स्वरलक्ष्मी लहाने व शाहीर दिनकर लोणकर यांनी गायिलेल्या भीम गीते, शेतकरी गीते व प्रबोधन गीतांनी लोकसंगीत महोत्सवात गहिरे रंग भरले.
दिनकर लोणकर यांनी सादर केलेल्या दर्शन दे रे, दे रे भगवंता या भक्ती गीताने या कार्यक्रमास प्रारंभ झाला. त्यानंतर त्यांनी कुणी नाही केलं भलं ओ माय l भीमानी केलय भलं ही गाणी सादर केली.
त्यानंतर गायिका स्वरलक्षमी लहाने यांनी भीमरावांची महती सांगणारे एक भीमराव होऊन गेला हे गीत सादर केले. त्यानंतर महाकवी वामनदादा कर्डक यांनी खास महिलांसाठी लिहिलेले पंख पाखरा देरे मला l माहेराला जाया आणि फुले शाहू आंबेडकरांची महती सांगणारे बुद्ध, कबीर, भीमराव, फुले या भूमीवर जन्मले त्यांनी जनजीवन फुलविले गं l शेजारीन सखे बाई l ही ठेका धरायला लावणारी गाणी सादर केली.
शाहीर विष्णू शिंदे आणि सहकाऱ्यांनी छत्रपती घटनापती उभा l कीर्तीचा सरताज हा l हे छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गुणगान गाणारे गीत सादर केले. त्यानंतर करू पेरणीचं काम l गाळू शेतामध्ये घाम l बळीराजाचं नाव हाय टिकवायचं l मातीत सोनं पिकवायचं हाय l हे शेतकरी गीत सादर केले. त्यानंतर हे विश्व उजळले तू ज्ञानाच्या प्रकाशाने l ती तुझी गरुड झेप पाहिली आकाशाने l म्हणतात कोटी जन हे तू गेल्यावर l तुझ्या उपकाराचे ओझे जाणवते प्रकर्षाने l ताटात सोनियाचा घास l छातीत विश्वासाचा श्वास l वर मोकळे आकाश l खाली ज्ञानाचा प्रकाश l ही गाणी सादर केली. त्यानंतर नव्या पिढीतील मुलींचे प्रबोधन करणारे विद्या शिकून पोरी होशील जरी तू शिक्षित l रमाईचे गुण असू दे हृदयात तुझ्या आरक्षित l , सांभाळून चाल पोरी धर कुणाचा तरी धाक l त्या रमाई सारखी वाग पोरी रमाई सारखी वाग l ही गाणी सादर केली. नव्या पिढीला उपदेश करणारी आपल्या आई-वडिलांना विसरू नका असे आवाहन करणारे विसरू नको रे आई बापाला l झिजवली त्यांनी काया l काया झिजून तुझ्या शिरावर धरली त्यांनी छाया l मिळणार नाही पुन्हा आई-बापाची छाया l अशी बहारदार गाणी सादर केली. अरे दिल्लीला जाऊन लाल किल्ल्यावरून जय भीम त्याने म्हणावं l जय भीम त्याने मनाव l असं भिमाच्या पाठी भीमाचं लेकरू प्रधानमंत्री बनावं या गीताने या लोकसंगीत महोत्सवाचा समारोप झाला.
शाहीर विष्णू शिंदे, गायिका स्वरलक्ष्मी लहाने व दिनकर लोणकर आणि सहकाऱ्यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. लोकसंगीत महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी रसिक प्रेक्षकांनी लोकसंगीत ऐकण्यासाठी शिवाजीराव देशमुख सभागृहात गर्दी केली होती.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment