28 March, 2025

दैनंदिन जीवनात पौष्टिक तृणधान्याचा खाद्य पदार्थांमध्ये वापर करावा - जिल्हाधिकारी अभिनव गोयल

हिंगोली (जिमाका), दि. 28 : पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्व लक्षात घेता सर्वांनी आपल्या दैनंदिन जीवनात पौष्टिक तृणधान्याचा खाद्यपदार्थात वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी यावेळी केले. हिंगोली, सेनगाव व कळमनुरी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी येथील महावीर भवनामध्ये नुकतेच ‘जिल्हास्तरीय पौष्टिक तृणधान्य महोत्सव-2025’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तोंडापूर कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख समन्वयक पी. पी. शेळके हे होते. जिल्हाधिकारी श्री. गोयल म्हणाले, पौष्ट‍िक तृणधान्य अंगणवाडीतील मुलांच्या आहारात समाविष्ट करता येईल. कृषी सहाय्यकांच्या माध्यमातून पौष्टिक तृणधान्यांच्या विविध पाककृती अंगणवाडीतील मुलांच्या दैनंदिन आहारामध्ये पोहोचविण्याबाबत तसेच पौष्टिक तृणधान्यांचे महत्त्व शेतकरी व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक प्रमाणावर प्रसिद्धी करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी कृषि विभागाला केले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम यांनी पौष्टीक तृणधान्य लागवड पध्दतीबाबत व पीक फेरपालट करुन जमिनीचे पोत सुधारण्याबाबत मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञ रोहिणी शिंदे यांनी आहारातील पौष्टिक तृणधान्यांचे महत्त्व आणि विविध पाककृतींची माहिती दिली. फिटनेस आणि न्यूट्रिशन प्रशिक्षक प्रणिता कौलवार यांनी पौष्टीक तृणधान्ये आणि पचनक्रिया याविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी पौष्टीक तृणधान्याचे महत्त्व सांगणारी सुरेख पुस्तिका व घडीपत्रिकेचे विमोचन जिल्हाधिकारी श्री. गोयल यांच्या हस्ते करण्यात आले व सर्व उपस्थितांना त्याचे वाटप करण्यात आले. या महोत्सवाला शेतकरी आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. या महोत्सवात शेतकरी आणि महिला बचत गटांनी 22 दालने लावली होती. या ठिकाणी पौष्टिक तृणधान्यांपासून बनवलेल्या विविध पदार्थांची विक्री करण्यात आली, ज्यातून 1 लाख 46 हजार 812 रुपयांची उलाढाल झाली. या कार्यक्रमाला संजय येवले, ‘उगम’चे अध्यक्ष जयाजी पाईकराव, कृषी विकास अधिकारी अतुल वायसे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, कृषी उपसंचालक प्रसाद हजारे, तंत्र अधिकारी सुनिल गोडगे, तंत्र अधिकारी अनिता रहाणे, तालुका कृषि अधिकारी शिवसंदीप रणखांब, महादेव कुंभार, संदीप वळकुंडे आदी मान्यवर उपस्थित होते. ***

No comments: