12 March, 2025
कळमनुरी येथील रोजगार मेळाव्यात 189 उमेदवारांची प्राथमिक निवड
हिंगोली (जिमाका), दि. 12 : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर हिंगोली व स्व.देवरावजी कल्याणकर उच्च माध्यमिक विद्यालय, कळमनुरी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच कळमनुरी येथे "पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा तथा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना भरती मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा व पदवी तसेच पदवीधारक या पात्रतेच्या 342 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 189 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.
या रोजगार मेळाव्यात महाराष्ट्रातील विविध नामांकीत कंपनीचे उद्योजक उपस्थित होते. तसेच जिल्ह्यात विविध महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यासाठी विविध महामंडळाचे स्टॉल लावण्यात आले होते.
या मेळाव्यात मार्गदर्शन करताना कळमनुरीचे तहसीलदार जीवककुमार कांबळे यांनी उपस्थित युवक-युवतींना प्रत्यक्ष संवाद साधून शासनाच्या विविध योजनाचा लाभ घ्यावा, असे सांगून शासकीय नोकरीमध्ये सहभागी होता न आल्यामुळे खचून न जाता स्वत:चा उद्योग उभारावा किंवा स्वयंरोजगाराकडे वळले पाहिजे, असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष देवरावजी कल्याणकर उच्च माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष डॉ. संतोष कल्याणकर यांनीही उमेदवारांना मार्गदर्शन केले. सहायक आयुक्त डॉ. रा.प्र.कोल्हे यांनी रोजगार मेळाव्याचा हेतू विशद करताना म्हणाले, युवकांनी मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवून रोजगार प्राप्त करुन घ्यावा, असे आवाहन केले. तसेच त्यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, सुशिक्षित बेरोजगार उमेदवारासाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण याची माहिती देत करिअर कसे निवडावे याच्या मार्गदर्शनासाठी मॉडेल करिअर सेंटरची स्थापना जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली या कार्यालयात करण्यात आली असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा पतंगे यांनी केले तर नवनाथ टोनपे यांनी आभार मानले. या कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता हिंगोली या कार्यालयाचे नवनाथ टोनपे, म. ना. राऊत, ना. ज. निरदुडे, र. ला. जाधव, अमोल आडे, अभिजीत अलोने, नवनाथ पतंगे आणि देवरावजी कल्याणकर उच्च माध्यमिक विद्यालय व केंब्रीज स्कूल ऑफ स्कॉलर्स या संस्थेचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment