05 March, 2025

स्वाधार योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्यास 15 मार्चपर्यंत मुदतवाढ

• यापूर्वी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचे बँक तपशील भरण्यासाठी टॅब उपलब्ध हिंगोली (जिमाका), दि. 05 : शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या, प्रवेश न घेतलेल्या तसेच निवास, भोजन व अन्य सुविधांअभावी पुढील शिक्षण घेऊ शकत नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांपैकी 11 वी, 12 वी तसेच 12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये विविध स्तरावरील महाविद्यालयात, शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेत अर्ज करण्यासाठी 15 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शासकीय वसतिगृहातील मुलां-मुलीप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य व इतर आवश्यक सुविधा स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी स्वाधार योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://hmas.mahait.org/ या संकेतस्थळावर भरण्यासाठी शासनाकडून दिनांक 15 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच यापूर्वी स्वाधार योजनेचे ऑनलाईन अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या लॉगीन आयडीवर बँक खाते तपशील भरण्याकरीता टॅब उपलब्ध करून देण्यात आले आहे. पात्र विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेचे आपले ऑनलाईन अर्ज तात्काळ भरावेत, असे अवाहन यादव गायकवाड सहायक आयुक्त, समाजकल्याण हिंगोली यांनी केले आहे. *****

No comments: