03 November, 2025

आधारभूत दरानुसार मूग, उडीद, सोयाबीन खरेदी सुरु

• जिल्ह्यात सात खरेदी केंद्र निश्चित • मूग, उडीद व सोयाबीन खरेदीसाठी दर निश्चित हिंगोली (जिमाका), दि. 03 : महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ व एनसीसीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार एनसीसीएफ मार्फत जिल्ह्यात हंगाम 2025-26 मध्ये मूग, उडीद, सोयाबीन खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्र निश्चित करण्यात आले असून, या खरेदी केंद्रावर खरेदीसाठी दि. 30 ऑक्टोबरपासून नोंदणी सुरु झाली आहे. तसेच याच खरेदी केंद्रावर दि. 15 नोव्हेंबर, 2025 पासून प्रत्यक्षात खरेदी प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. हिंगोली जिल्ह्यात केंद्र शासनाने मूग प्रती क्विंटल 8 हजार 768, उडीद प्रती क्विंटल 7 हजार 800 आणि सोयाबीन प्रती क्विंटल 5 हजार 328 रुपये याप्रमाणे खरेदीसाठी दर निश्चित केले आहेत. हिंगोली जिल्ह्यात एनसीसीएफने नियुक्त केलेल्या सात खरेदी केंद्रावर मूग, उडीद, सोयाबीन खरेदी करण्यासाठी नोंदणी होणार आहे. खरेदी केंद्राचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. हजरत नासरगंज बाबा स्वयंसेवी सेवा सहकारी संस्था म. हिंगोली या संस्थेचे खरेदी केंद्र येहळेगाव ता. औंढा नागनाथ येथे आहे. या केंद्रावर केंद्र चालक म्हणून शेख गफार शेख अली हे असून त्यांचा संपर्क क्रमांक 9881501040 असा आहे. प्रगती स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था, हिंगोली या संस्थेचे खरेदी केंद्र हिंगोली येथे आहे. या संस्थेवर केंद्रचालक म्हणून नारायणराव भिसे हे कामकाज पाहणार असून, 9850792784 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. औंढा नागनाथ तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्या. औंढा (ना) या संस्थेचे खरेदी केंद्र जवळा बाजार ता. औंढा नागनाथ येथे आहे. या संस्थेवर केंद्र चालक म्हणून कबीर बशीर कुरेशी हे असून, त्यांचा संपर्क क्रमांक 9767680780 असा आहे. श्री संत नामदेव स्वयंरोजगार सहकारी संस्था म. चोरजवळा या संस्थेचे खरेदी केंद्र कन्हेरगाव ता. जि. हिंगोली येथे आहे. या संस्थेवर केंद्रचालक म्हणून अमोल काकडे हे कामकाज पाहणार असून त्यांचा संपर्क क्र. 8007386143 आहे. विजयलक्ष्मी बेरोजगार सहकारी संस्था म. कोळसा ता. सेनगाव या संस्थेचे खरेदी केंद्र साखरा ता. सेनगाव येथे आहे. केंद्र चालक उमाशंकर माळोदे हे काम पाहणार आहेत. त्यांना 9403651743 क्रमांकावर संपर्क साधावा. श्री संत भगवानबाबा स्वयंरोजगार सेवा संस्था कोथळज या संस्थेचे खरेदी केंद्र सेनगाव येथे आहे. केंद्र चालक निलेश पाटील हे असून त्यांचा संपर्क क्रमांक 9881162222 असा आहे. वसमत तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित, वसमत या संस्थेचे खरेदी केंद्र वसमत येथे आहे. केंद्र चालक सोपा बोकारे हे काम पाहणार आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक 9834851485 असा आहे. केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार मूग, उडीद व सोयाबीन खरेदी योजनेचा शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा म्हणून ही योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी मूग, उडीद व सोयाबीन विक्रीसाठी आपल्या गावाजवळील नाफेडच्या नजीकच्या खरेदी केंद्रावर जाऊन सातबारा उतारा, आधार कार्ड व बँकेचे पासबूक घेऊन प्रथम आपल्या पिकाची नोंदणी करुन घ्यावी. ही नोंदणी ऑनलाईन पध्दतीने पॉस मशीनद्वारे करण्यात येणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी आधारकार्ड, बँक पासबूक, चालू वर्षाचा सातबारा उतारा, पिकपेरा इत्यादी कागदपत्रासह नोंदणीसाठी प्रत्यक्ष खरेदी केंद्रावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. खरेदीसाठी आपणास एसएमएस प्राप्त झाल्यानंतर शेतमाल विक्रीसाठी खरेदी केंद्रावर घेऊन यावा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे, उपाध्यक्ष रोहित निकम, व्यवस्थापकीय संचालक श्रीधर बी. डुबे-पाटील व संचालक मंडळ यांनी केले आहे. ******