08 November, 2025

नामनिर्देशनपत्र दाखल करताना उमेदवाराने नियमांचे पालन करावे - जिल्हा दंडाधिकारी

हिंगोली (जिमाका), दि.08 : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी कार्यक्रम घोषित केला असून दि. 4 नोव्हेंबर, 2025 पासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. हिंगोली जिल्ह्यातील नगर परिषदांची निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणार पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस ताफ्यामध्ये तीनपेक्षा जास्त मोटारगाड्या, वाहने यांचा समावेश नसावा. तसेच नामनिर्देशन दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात पाच व्यक्ती उपस्थित राहतील. या व्यतिरिक्त कोणालाही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात प्रवेश दिला जाणार नाही. निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळेस कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक, सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास जिल्हा दंडाधिकारी राहुल गुप्ता यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्रतिबंध करण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश दि. 3 डिसेंबर, 2025 पर्यंत लागू राहणार आहेत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. *******

No comments: