19 November, 2025
आंतरराष्ट्रीय दत्तक महिनानिमित्त माहितीपत्रकाचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते विमोचन
हिंगोली (जिमाका), दि.19 : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस.आर.दरपलवार यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय दत्तक महिना निमित्ताने विशेष गरजा असलेल्या मुलांचे (दिव्यांग मुले) यांचे संस्थाबाह्य पुनर्वसन या थिमसह हिंगोली जिल्ह्यात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची भेट घेऊन आंतरराष्ट्रीय दत्तक महिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय दत्तक महिना संदर्भातील माहितीपत्रकाचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व पोलीस उपअधीक्षक दत्ता केंद्रे यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. जिल्ह्यात खाजगी रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच हिंगोली शहर पोलीस स्टेशनमध्ये माहिती पत्रक लावून जनजागृती करण्यात येत आहे. यावेळी हिंगोली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप मोदे, पोलीस उपनिरीक्षक आनंद बनसोडे व इतर विभाग प्रमुख उपस्थित होते.
नोव्हेंबर महिना हा आंतरराष्ट्रीय दत्तक महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने जिल्हा बाल संरक्षण व चाईल्ड हेल्प लाईन 1098 कक्षाकडून बालकासंदर्भात आणि बालकाशी निगडीत विविध विषयावर कार्यक्रम घेण्यात येत आहेत. कोणतेही बालक परस्पर दत्तक घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. यासाठी कायदेशीर प्रक्रिया www.missionvatsalya.wcd.gov.in या संकेत स्थळावर नोंदणी करुन इच्छूक पालक बालकाला दत्तक घेऊ शकता अशी माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे अधिकारी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) जरीबखान पठाण यांनी दिली. याप्रसंगी बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) गणेश मोरे, कायदा तथा परिविक्षा अधिकारी ॲड.अनुराधा पंडित, प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे, समुपदेशक अंकुर पाटोडे, राजरत्न पाईकराव आदी उपस्थित होते. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे भेट देण्याचे आवाहन करण्यात आले.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment