19 November, 2025

जिल्ह्यातील कृषि सिंचन योजनांचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून आढावा

*कृषि सिंचन विभागाची कामे ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे निर्देश* • जलयुक्त शिवार अभियान 2.0 • प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना • गाळमुक्त धरण–गाळयुक्त शिवार योजनांचा आढावा • जिल्हाधिकाऱ्यांकडून कृषि विभागास तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना हिंगोली, दि.१९ (जिमाका): जिल्ह्यातील जास्तीत जास्त कृषिक्षेत्र सिंचनाखाली आणून शेतक-यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने कृषि विभागाने तातडीने सुधारणा करून ३१ मार्चपर्यंत कामे पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या. जिल्हा जलसंधारण अधिकारी अनिल कांबळे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम, उपविभागीय कृषि अधिकारी पी. एस. कच्छवे, विकास याचावाड, व्ही. एन. निर्वळ यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जलयुक्त शिवार अभियान 2.0, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना 2.0 व गाळमुक्त धरण–गाळयुक्त शिवार योजनेच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आढावा बैठक पार पडली. या बैठकीत विविध विभागांच्या कामाचा सविस्तर आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी केल्या. प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना 2.0 अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील 39 गावांची निवड करण्यात आली असून या प्रकल्पांतर्गत 3 प्रकल्प मंजूर आहेत. त्यात प्रकल्प क्रमांक 1 व 2 (तालुका कळमनुरी) येथील मृद व जलसंधारण कामांच्या प्रगतीवरून जिल्हाधिकारी गुप्ता यांनी नाराजी व्यक्त केली. ही कामे गतीने पूर्ण करण्यासाठी तातडीने सुधारणा करून प्रगती करण्याच्या सूचना कृषि विभागाला देण्यात आल्या. तसेच या दोन्ही प्रकल्पांना स्वतः जिल्हाधिकारी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. प्रकल्प क्रमांक 3 (तालुका सेनगाव) येथील कामांबाबत समाधान व्यक्त करून उर्वरित कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच कळमनुरी तालुक्यानेही प्रकल्प क्र. 3 च्या धर्तीवर येथील कामे पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. या संपूर्ण प्रकल्पासाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदत देण्यात आली असून प्रस्तावित आराखड्यानुसार नियोजनबद्धपणे सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले. *शेतकरी लाभार्थ्यांसाठी विशेष मोहीम* उत्पादन पद्धतीतील वैयक्तिक शेतकरी लाभार्थ्यांनी कृषि साहित्य खरेदी करून अनुदानाचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे आदेश सहाय्यक कृषि अधिकाऱ्यांना देण्यात आले. यासाठी विशेष मोहीम राबवून प्रगती वाढवावी, असे सांगण्यात आले. जलयुक्त शिवार अभियान 2.0 — बहुतेक विभागांची समाधानकारक प्रगती असून, कृषि विभागाच्या अभियानांतर्गत 73 गावांची निवड करण्यात आली असून जलसंधारण विभाग, लघुसिंचन, वन विभाग, सामाजिक वनीकरण, पुर्णा पाटबंधारे व भूजल सर्वेक्षण या विभागांनी मिळून 90 टक्के कामे पूर्ण केल्याचे बैठकीत सांगण्यात आले. याउलट कृषि विभागाची प्रगती अत्यंत कमी असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करून तातडीने सुधारणा करण्याचे आदेश दिले. ग्राउंड ट्रुथिंगमध्ये 50 टक्के पेक्षा जास्त काम पूर्ण — कृषि विभाग मागे जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत हिंगोली जिल्ह्याला 19,858 स्थळ पडताळणीचे लक्ष्य दिले होते. त्यापैकी 9,877 स्थळ पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे. जलसंधारण व इतर विभागांनी लक्ष्याप्रमाणे कामे पूर्ण करून अतिरिक्त 4,744 पडताळणीही केली आहे. परंतु कृषि विभागाने तात्काळ स्थळ पडताळणी करून तातडीने कामाची गती वाढवावी, असे स्पष्ट निर्देश दिले गेले. बैठकीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी कामाचे सादरीकरण केले. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व प्रकल्प आणि अभियानांची कामे निर्धारित मुदतीत आणि नियमानुसार पूर्ण करण्यासाठी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले. *****

No comments: