04 November, 2025
जिल्हा वार्षिक योजना निधी वितरणासाठी दायित्वाचे प्रस्ताव तात्काळ अपलोड करावेत -जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
• जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी घेतला आढावा
हिंगोली (जिमाका), दि. 04 : स्थानिक स्वराज्य संस्थांनी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 अंतर्गत दायित्वाचे व निधी मागणीचे परिपूर्ण प्रस्ताव आयपासवर तात्काळ अपलोड करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आढावा बैठकीत दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी गं. गो. चितळे, प्रदीप नळगीरकर यांच्यासह सर्व विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 अंतर्गत विविध विकास योजनांचे निधी वितरणासाठी दायित्वाचे प्रस्ताव गुरुवारपर्यंत आयपासवर अपलोड करावेत. प्रस्ताव आयपास अपलोड केल्यानंतरच निधी वितरीत करण्यात येणार आहे. आयपासवर अपलोड केलेल्या यंत्रणेचे 30 टक्के निधी वितरण तात्काळ करावेत, असे सांगून दायित्वाचे प्राप्त प्रस्ताव, आयपासवर अपलोड केलेले प्रस्ताव तसेच अप्राप्त प्रस्तावाचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी आढावा घेतला.
यावेळी मृद व जलसंधारण, दुग्धशाळा विकास, महावितरण, पोलीस, जिल्हा परिषद, पशुसंवर्धन विभाग, मत्स्यव्यवसाय, क्रीडा विभाग, कौशल्य विकास योजना, पाणीपुरवठा व स्वच्छता, कृषि विभाग, जिल्हा आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण, महिला व बालविकास विभाग, वन विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरविकास, पाटबंधारे, शिक्षण, परिवहन विभाग यासह विविध विभागांच्या प्रस्तावाबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांसाठी महाराष्ट्रा असेट रजिस्ट्रेशन सिस्टीम पोर्टलवरुन युनिक आयडी घेण्याच्या कार्यवाहीचाही आढावा जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी घेतला.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment