29 January, 2019

ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाची योग्य अंमलबजावणी करावी -रत्नाकर गायकवाड



ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाची योग्य अंमलबजावणी करावी
-रत्नाकर गायकवाड
हिंगोली,दि.29: ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातंर्गत  गावांचा विकास करतांना गाव निहाय विकास आरखडा तयार करण्यात आला असून त्यानुसारच या अभियानात समाविष्ट गावांचा विकास करण्यासाठी या अभियानाची योग्य अंमलबजावणी करण्याचे निर्देश ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे व्यवस्थापकीय संचालक रत्नाकर गायकवाड यांनी दिले.
सोमवार (दि.28) रोजी जिल्हाधिकारी नांदेड येथील डी.पी.सी. सभागृहात आयोजित नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत आढावा बैठकीत श्री. गायकवाड बोलत होते. यावेळी ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे कार्यकारी संचालक उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, नांदेड जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी तुम्मोड,  नांदेड जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, धनजंय माळी, दिलीप बायस, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश‍ मिणियार यांची उपस्थिती होती.
यावेळी श्री. गायकवाड म्हणाले की,  महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात काम करतांना दिलेल्या उद्दिष्टांप्रमाणे काम करणे आवश्यक आहे. या अभियानात समाविष्ट गावातील प्रत्येक मुल शाळेत, प्रत्येक मुल शिकलेले  आणि प्रत्येक शाळा सुंदर असायला पाहिजे. या गावातील शेतकऱ्यांना गट शेती मध्ये समाविष्ट करुन सर्वाना पीक कर्ज मिळाले पाहिजे. तसेच ज्या गावांचा वॉटर बजेट झाला नसले त्या गावांचा 15 दिवसात वॉटर बजेट तयार करुन सादर करावा. तसेच या गावातील मंजूर घरुकुलांसाठी लागणारी पाच ब्रास वाळू झीरो रॉयल्टीवर उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी ही तहसीलदार आणि गट विकास अधिकारी यांची आहे. गावातील व्यसनमुक्ती आणि कुटुंब नियोजन यासारख्या सामाजिक निदेर्शांचेही पालन करावे. तसेच या अभियानात समाविष्ट सर्व गावांना प्रत्येकी 10 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून, या निधीद्वारे विकास कामे करावीत. गावातील रोजगारक्षम व्यक्तींना रोजगारासाठी आवश्यक कौशल्यांचा विकास करण्यासाठी प्रशिक्षण देवून प्रत्येक कुटुंबाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. समाविष्ट गावांनी  गाव रस्त्याच्या दोन्ही बाजूस  वृक्षारोपण करावे असे ही श्री. गायकवाड यावेळी म्हणाले.
जिल्हा पातळीवरील यंत्रणा, गाव पातळीवरील यंत्रणा आणि ग्रामप्रवर्तक यांच्या समन्वयातून समाविष्ट गावात गाव मुक्काम करुन या गावातील ग्रामस्थांकडून समस्या जाणुन घेत त्या सोडविल्यास गावांचा विकास साधणे सहज शक्य असल्याचे अभियानाचे कार्यकारी संचालक उमाकांत दांगट यावेळी म्हणाले.
यावेळी श्री. गायकवाड यांनी नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याचा आढावा घेत या अभियानात समाविष्ट गावातील सरपंच आणि ग्रामप्रवर्तक यांच्या संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या           
यावेळी आढावा बैठकीस संबंधीत विभागाचे अधिकारी, ग्रामप्रवर्तक आणि सरपंच यांची उपस्थिती होती.
****


No comments: