29 January, 2019

गरजू रुग्णांवर महाआरोग्य शिबीराच्या माध्यमातून होणार अद्ययावत उपचार - जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी





गरजू रुग्णांवर महाआरोग्य शिबीराच्या माध्यमातून होणार अद्ययावत उपचार
- जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी

·   जिल्ह्यातील सर्व गरजू रुग्णांना महाआरोग्य शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन
·   अटल महाआरोग्य शिबीराचे 10 फेब्रूवारी रोजी हिंगोलीत आयोजन

हिंगोली, दि.29 :  येणाऱ्या 10 फेब्रूवारी रोजी हिंगोली शहरातील रेल्वे स्टेशनजवळ जिल्ह्यातील विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांवर विनामुल्य अद्ययावत उपचार करण्यासाठी महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील डी.पी.सी. सभागृहामध्ये श्री. जयवंशी यांनी महाआरोग्य शिबीराच्या आयोजना संदर्भात विविध यंत्रणांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार तान्हाजी मुटकूळे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार,  जिल्हा शल्य चिकित्सक श्रीवास, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. म्हस्के, गजानन घुगे, रामेश्वर नाईक, संदीप जाधव यांची उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकारी जयवंशी म्हणाले की, जिल्ह्यातील सर्वसामान्य गरजू रूग्णांना सर्व रोग निदान व उपचार एकाच ठिकाणी व मोफत उपलब्ध करून देऊन त्यांचे जीवन सुकर करण्यासाठी हे महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात येत आहे. या संधीचा लाभ आपल्या परिसरातील गरजू रूग्णांना चांगल्या व दर्जेदार आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी सर्व राजकीय पक्ष, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यर्त्यांनी प्रयत्न करावेत.

महाआरोग्य शिबीरापूर्वी जिल्ह्यातील प्रत्येक गावांत आणि शहराच्या प्रत्येक प्रभागात ज्या नागरिकांच्या आरोग्य विषयक समस्या आहेत अशा रुग्णांची आजपासून 2 फेब्रूवारी पर्यंत माहिती संकलीत करण्यात येणार आहे. तसेच सदर माहिती प्राप्त झाल्यानंतर 3 ते 9 फेब्रूवारी या कालावधीत अटल महाआरोग्य सप्ताह राबवून सर्व रुग्णांची त्यांच्या नजीकच्या आरोग्य केंद्रात पूर्व तपासणी करण्यात येणार आहे आणि 10 फेब्रूवारी रोजी हिंगोली येथील रेल्वे स्टेशन जवळ आयोजित करण्यात येणाऱ्या महाआरोग्य शिबीरात या रुग्णांवर नामांकित डॉक्टरामार्फत उपचार केले जाणार आहेत. या आरोग्य शिबीरात ज्यांच्यावर उपचार करणे शक्य नाही, अशा रुग्णांना नागपूर, नांदेड, औरंगाबाद, पुणे, मुंबई येथे नेवून त्यांच्यावर अत्याधूनिक  पध्दतीचे उपचार केले जाणार आहेत. महात्मा ज्योतीबा फुले आरोग्य योजना, मुख्यमंत्री सहाय्यता निधी तसेच समाजातील दानशूर व्यक्ती यांच्या माध्यमातून गरजू रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. त्यांच्यासह शहरातील इतर मोठी दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये, इंडियन मेडिकल असोसिएशन यांचे प्रतिनिधी, इतर पॅथींच्या संघटनांचे प्रतिनिधी यात सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील दूर्धर आजारांनी ग्रस्त आणि आदिवासी भागातील गरजू रुग्णांना खऱ्या अर्थाने चांगले उपचार मिळण्यासाठी या शिबिराचा लाभ होईल, असा विश्वास व्यक्त करुन सर्व यंत्रणांनी त्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या महाआरोग्य शिबिरासाठी राज्यातील नामवंत डॉक्टर्स उपस्थित राहून ते स्वत: याठिकाणी गरजू रुग्णांवर उपचार करणार आहेत.
गाव व तालुका पातळीवर आरोग्य यंत्रणांनी आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत नियोजन करुन रुग्णांची माहिती जिल्हा यंत्रणेकडे पाठवावी. नगरपालिका नगर पंचायत क्षेत्रातील विविध प्रभागातील अशा गरजू नागरिकांची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संकलीत करुन त्यांना या महाआरोग्य शिबीरात उपचार मिळतील यासाठी प्रयत्न करावे. तसेच शासन, प्रशासन, वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभाग तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटल्स, आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना, वैद्यकीय संघटना, सामाजिक संघटना आदींनी हे महाआरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी समन्वयाने सुयोग्य नियोजन करावे, असे आवाहन यावेळी श्री. जयवंशी यांनी केले.

प्रत्येक रूग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. गोरगरीब रूग्णांना आर्थिक परिस्थितीमुळे महागडे उपचार घेणे शक्य नसते. अशा सर्व रूग्णांना या शिबिरात विनामूल्य सर्व प्रकारचे उपचार व जगप्रसिद्ध नामवंत व तज्‍ज्ञ डॉक्टर्सकडून देण्यात येणार आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधी व सर्वसामान्य कायर्कर्ता म्हणून आपल्या परिसरातील एकही गरजू रूग्ण आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाही यासाठी प्रयत्न करावे असे संयोजक रामेश्वर नाईक म्हणाले.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात अधिकाधिक नागरिकांपर्यंत ही माहिती पोहोचविण्यासाठी नियोजन करण्यात आले असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. तुम्मोड यांनी यावेळी सांगितले. आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून नियोजन करण्यात येत असलेल्या नियोजनाची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीवास आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी दिली.
यावेळी आढावा बैठकीस जिल्ह्यातील सर्व विभागांचे विभाग प्रमुख यांची उपस्थिती होती.

****

No comments: