29 January, 2019

बाल विवाह प्रतिबंधात्मक कायद्याची जनजागृती करावी


बाल विवाह प्रतिबंधात्मक कायद्याची जनजागृती करावी
         हिंगोली, दि.29:  राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने भारतातील  बाल विवाह घटना सदंर्भात प्रसिध्द केलेल्या अहवालानुसार बाल विवाहाच्या सर्वात जास्त घटना घडलेल्या भारतातील 70 जिल्ह्यांमध्ये तर महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांचा समावेश आढळुन येत आहे. या संदर्भात शासनाने राज्यातील बाल विवाहास प्रतिबंध करण्याकरिता ग्राम पातळीवर ग्राम सेवक यांना आणि शहर पातळीवर बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) यांना बाल विवाह प्रतिबंध अधिकारी म्हणुन घोषित करण्यात आले आहे. परंतू एकंदरीत राज्याची परिस्थितीचा  विचार करता बाल विवाह प्रतिबंधासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यानुसार दि.24 जानेवारी, 2019 रोजी बैठक अध्यक्ष बाल विवाह प्रतिबंध समिती तथा जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
            जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित या बैठकीस उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे,तहसिलदार गजानन शिंदे, बाल विकास प्रकल्प अधिकारी डॉ.मोहन आ.कौसडीकर, महिला सहाय्यक कक्ष उज्वला वगेवार सुनिता शिंदे, जि.प.शिक्षण विभाग मोहन जोशी, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयातील मुख्यसेवीका आर. पी.पडोळे, बाल कल्याण समिती सदस्य  जया दे.करडेकर,  प्रा.विक्रम जावळे, ॲड. संभाजी माने, प्रा.यु.एच.बलखंडे, मुलींचे निरीक्षणगृह अधिक्षक चंपती घ्यार आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी  व्हि जी.शिंदे यांची यावेळी उपस्थिती होती.
            यावेळी श्री. जयवंशी म्हणाले की, सर्व धर्मांच्या विवाह स्थळांच्या प्रमुखांनी  विवाहास जागा उपलब्ध करुन देण्यापुर्वी मुला-मुलींचे वयाचे दाखले पाहणे हे बाल विवाह प्रतिबंधसाठी आवश्यक आहेत अशा सुचना देण्यात आल्या. बाल विवाह रोखण्याकरीता मदत व्हावी यासाठी सर्व विभाग प्रमुखांना बाल विवाह प्रतिबंध बाबतचा शासन निर्णय पुरविण्यात यावा. तसेच सर्व कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या अधिनस्त कार्यालयीन बैठकीत शासन निर्णय / परिपत्रकाचे वाचन करणे.
           बाल विवाह प्रतिबंधासाठी पोलीस विभागाची भुमिका अत्यंत महत्वाची असून त्याकरीता पोलीस विभागातंर्गत या संदर्भात बैठकी होणे महत्वाचे आहे. तसेच ग्राम पातळीवर प्रत्येक ग्रामसभेच्या बैठकीमध्ये शासन परीपत्रक वाचन व शिक्षेचे स्वरुप याबाबत चर्चा होणे आवश्यक आहे. गावातील महत्वाचा घटक म्हणुन ग्रामसेवक व पोलीस पाटील यांनी गावात बाल विवाह होणार नाही याकरीता जातीने लक्ष देणे महत्वाचे आहे. तसेच बाल विवाह प्रतिबंध करण्याकरीता सार्वजनिक उपक्रमात याविषयाची प्रचार, प्रसिध्दी व जाणीव जागृती करण्यात यावी असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी  दिले.  बालविवाह प्रतिबंध होण्याच्या दृष्टीकोनातुन समितीतील सदस्यांची भुमिका अत्यंत महत्वाची आहे.तसेच जनतेने देखील बालविवाह प्रतिबंधाबाबत जागृत असणे महत्वाचे असल्याचे श्री जयवंशी यावेळी म्हणाले.

****

No comments: