08 January, 2019

ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी -जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी




ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी
-जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

हिंगोली, दि.8: शासनाच्या विविध विभागाद्वारे अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनेच्या माध्यमातून ग्राम परिवर्तन घडविण्यासाठी सर्व विभागांनी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत जिल्ह्यातील निवड झालेल्या गावांच्या विकास कामाबाबत आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी जयवंशी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एच.पी. तुम्मोड, अप्पर जिल्हाधिकरी जगदिश मिणीयार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, निवासी उप जिल्हाधिकारी खुदाबक्श तडवी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी रणवीरकर यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. जयवंशी पुढे म्हणाले की, ग्रामीण भागात मूलभूत सोयी सुविधांच्या उपलब्धतेसह आर्थिक, सामाजिक शाश्वत विकास साध्य करण्यासाठी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान राबविण्यात येत आहे. शासनाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत गावांमध्ये शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून गावांचा कायापालट करण्याचे उद्दिष्ट या अभियानाद्वारे साध्य करावयाचे आहे. 
ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत जिल्ह्यातील निवड झालेल्या गोंडाळा, जामदया, लिंगदरी आणि खिल्लार या गावात कृषि विभागाने शेतकरी गट स्थापन करुन त्यांचे उत्पादन कंपन्यांमध्ये रुपांतर करण्याच्या दृष्टीने आणि बाजाराभिमुख उत्पादन घेण्यासाठी या शेतकऱ्यांच्या कंपन्यांना उपयुक्त व सक्षम करण्याच्या दृष्टीने काम करावे.तसेच केंद्र व राज्य शासनाच्या कृषि संबंधीत योजनाचा लाभ शेतकऱ्यांना द्यावा. शेतकऱ्यांच्या अर्थिक उन्नतीसाठी रेशीम उद्योग हा उपयोगी ठरु शकतो, याकरीता या गावात रेशीम उद्योगाशी संबंधीत योजनाचा लाभ द्यावा. सदर गावातील शाळेत वीज जोडणी, स्वच्छता गृह, आदीची सुविधा नसल्यास सदर सुविधा तात्काळ उपलब्ध करुन द्याव्यात. तसेच सदर गावांमध्ये सुधारणांची आवश्यकता आहे का ? याची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी ग्राम भेटीद्वारे या गावातील ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणुन घेत त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे ही जिल्हाधिकारी जयवंशी यावेळी म्हणाले.
या अभियानांतर्गत ग्राम विकास, सहकारी, तलाठी, सरपंच, ग्रामसेवक तसेच सर्व संबंधीत विभागांच्या विभाग प्रमुखानी समन्वय ठेवून काम करावे. तसेच या गावांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यामध्ये ग्राम विकास सहकाऱ्यांची भूमिका महत्वाची असून, त्यांनी या गावातील सर्वांगिण विकास करण्यासाठी प्रयत्न करा,वा असे ही जिल्हाधिकारी जयवंशी म्हणाले.
यावेळी बैठकीस सर्व विभागाचे विभाग प्रमुख, संबंधीत गावचे सरपंच, ग्रामसेवक यांची उपस्थिती होती. 
****
    

No comments: