24 January, 2019

मतदार जागृतीकरीता : राष्ट्रीय मतदार दिवस



मतदार जागृतीकरीता : राष्ट्रीय मतदार दिवस 
            भारत निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी झाली असून स्थापनेचा 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश मतदार असल्याचा अभिमान मतदारास असावा आणि त्यातून बळकट लोकशाहीतील मोठा सहभाग  नोंदवता यावा हा आहे.
            भारतीय लोकशाही गणराज्यात प्रत्येक भारतीय नागरिकाला सार्वत्रिक तथा पोट निवडणुकीत मतदानाचा मुलभूत हक्क बहाल करण्यात आलेला आहे. त्यामुळे मतदार यादीत नांव नोंदवून मतदान करण्याचे कर्तव्य पार पाडून लोकशाही बळकट करण्याचा वाटा उचलण्याची संधी प्रत्येक भरतीय नागरिकाला आहे.
            भारतातील युवा मतदाराना सक्रीय राजनीती मध्ये भाग घेण्यास प्रोत्साहीत करण्याकरिता सन 2011 पासून भारत निवडणूक आयोगाने 25 जानेवारी हा दिवस 'राष्ट्रीय मतदार दिवस' म्हणून दरवर्षी साजरा करण्यात यावा, असे निर्देश दिलेले आहेत. 
            देशातील प्रत्येक नागरिकास आपण या देशाचे सुजाण नागरिक असून मतदान करणे हा आपला मुलभूत हक्क असल्याची जाणीव होण्याकरीता या राष्ट्रीय मतदार दिवसाचे महत्व आहे. या 'राष्ट्रीय मतदार दिवस' निमित्त् 18 वर्ष पूर्ण होत असलेल्या दिनांक 1 जानेवारी, 2019 च्या अर्हता दिनाकांवर 18 वर्ष पूर्ण झालेल्या नवयुवक युवतींना मतदारांना तसेच ज्या नागरिकांनी अद्यापही यादीत नांव नोंदविले नाही अशा नागरिकांना मतदार यादीत आपले नांव नोंदवून ओळख पत्र भारत निवडणूक आयोगामार्फत देण्यात येते.
            दिनांक: 01 जानेवारी, 2019 या अर्हता दिनांकावर अधारीत दि. 1 सप्टेंबर 2018 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या मतदार यादीनुसार हिंगोली जिल्ह्यात तीन  मतदार संघामध्ये एकूण 08 लाख 74 हजार 314 मतदार आहेत. त्यापैकी स्त्री मतदार 4 लाख 15 हजार 463 तर पुरुष मतदार 4 लाख 58 हजार 850आहेत. या राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त स्त्री मतदारांची संख्या पुरुष मतदारांच्या बरोबर आणण्याचा प्रयत्न आहे. कारण जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या कमी असून ज्या महिलांनी मतदार यादीत नांव नोंदविले नाही त्यांनी आता या कार्यक्रमानिमित्त महिला मतदारांनी नावे नोंदविली पाहिजेत.
            हिंगोली जिल्ह्यात 01 जानेवारी, 2019 या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2018 अंतर्गत दिनांक 03 ऑक्टोबर 2017 ते 1 सप्‍टेंबर, 2018 या कालावधीत दावे हरकती स्वीकारण्यात आल्या. पुनरिक्षण कार्यक्रमाचा तपशील पुढीरलप्रमाणे आहे. एकूण 57 हजार 4 दावे हरकती प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी 56 हजार 441 निकाली काढण्यात आले आहेत.  नव्याने नोंदणी झालेल्या 25 हजार 402 तसेच नोंदीतील दुरूस्ती केलेल्या 12 हजार 924 अशा एकूण 38 हजार 326 मतदारांना राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारी 2019 रोजीच्या भारत निवडणूक आयोगाने नव्यानेच जारी केलेले स्मार्टसाइज प्लॅस्टीक मतदार ओळखपत्राचे (PVC-EPIC) वाटप त्या-त्या मतदान केंद्राचे ठिकाणी संबंधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचे मार्फत करण्यात येणार आहेत. सदर विशेष संक्षिप्त पुरनरिक्षण कार्यक्रमांत 16 हजार 550 मतदारांची वगळणी करण्यात आली आहे. मतदार यादीमध्ये 8 हजार 852 मतदारांची निव्वळ वाढ झाली आहे. त्यामुळे आता एकूण मतदारांची संख्या 8 लाख 74 हजार 314 एवढी झाली आहे. समाविष्ट करण्यात आलेल्या मतदारांची टक्केवारी 1.01 इतकी आहे.  
            हिंगोली जिल्ह्याची सन-2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 11 लाख 77 हजार 345 इतकी असून ऑक्टोबर, 2017 ची अनुमानित (Projected) लोकसंख्या 12 लाख 44 हजार 379 इतकी आहे.  त्यामध्ये एकूण मतदार 8 लाख 78 हजार 129 मतदार आहेत. लोकसंख्येशी मतदाराचे प्रमाण 70.56 टक्के आहे. मतदारांनी आपले नाव अंतिमरित्या प्रसिध्द करण्यात आलेल्या मतदार यादीत असल्याबाबत खात्री करावी.
            वयाची 18 वर्ष पुर्ण झालेल्या अधिकाधिक तरूणांनी छायाचित्र मतदार याद्यांचा सततचा पुनरिक्षण कार्यक्रम- 2018 च्या कालावधीत आपली नावे मतदार यादीत नोंदविण्यासाठी, तसेच मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी, मतदार यादीत दुबार नावे असलेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी संबधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO)/ संबंधीत तहसिलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी/ संबंधीत उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडे विहीत नमुन्यातील अर्ज सादर करावेत किंवा http://www.nvsp.in/ या संकेतस्थळावरून ऑनलाईन सादर करावेत. अधिक माहितीसाठी https://ceo.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. या मतदार दिवसाच्या कार्यक्रमानिमित्त नवीन मतदारांना निमंत्रित करण्यात येईल. त्यांना या कार्यक्रमात मतदार ओळखपत्र, बिल्ले, प्रदान करुन प्रतिज्ञा दिली जाणार आहे. निबंध स्पर्धा, सायकल रॅली, पथनाट्य जागृती अभियान, लोककला लोकनृत्य, प्रदर्शन, फलक, घोषवाक्य, सामान्यज्ञान स्पर्धा छायाचित्र स्पर्धा, सांस्कृतिक मंडळे, भजन मंडळे, महिला युवा मंडळे, महिला क्रीडा मंडळे, बचत गट, या संस्थांच्या मदतीने, जिल्ह्यात राष्ट्रीय मतदार दिवसाबाबत जनजागृती करण्यात येणार
            येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत आपण आपल्या लोक प्रतिनीधीस मतदान करण्याची संधी गमावणे म्हणजे आपण आपला भारतीय नागरिक असल्याचा हक्क गमावल्यासारखे आहे ! तर चला ! आपण सर्व भारतीय नागरिक या राष्ट्रीय मतदार दिवसानिमत्त आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करुन आपला मतदानाचा हक्क बजावण्यास सज्ज होऊ या !
                                                                        -- अरुण सूर्यवंशी
                                                                                                                जिल्हा माहिती अधिकारी,
    हिंगोली

*****


No comments: