26 January, 2019

हिंगोली जिल्ह्याची विकासाकडे यशस्वी वाटचाल -- पालकमंत्री दिलीप कांबळे





हिंगोली जिल्ह्याची विकासाकडे यशस्वी वाटचाल
                                                                                        -- पालकमंत्री दिलीप कांबळे

हिंगोली, दि.26: मागील चार वर्षांमध्ये राज्य शासनाने नागरिकांच्या हिताचे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक विषयक धोरणात्मक निर्णय घेतले असून, राज्याच्या सर्वांगीण विकासाकरीता विविध महत्वकांक्षी योजना राबविण्याचा निर्णय घेत अनेक योजने अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. हिंगोली जिल्ह्याची देखील यशस्वीरित्या विकासाकडे  वाटचाल सुरु असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय, मदत व पुनर्वसन, भुकंप पुनर्वसन, अल्पसंख्यांक विकास व वक्फ विभागाचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी केले.
            भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 69 व्या वर्धापन दिनी येथील संत नामदेव कवायत मैदानावर पालकमंत्री श्री. कांबळे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, खासदार राजीव सातव, आमदार तान्हाजी मुटकूळे, आमदार रामराव वडकुते, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, पोलिस अधिक्षक योगेश कुमार, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणीयार, निवासी उपजिल्हाधिकारी खुदाबक्क्ष तडवी, जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी.व्ही. बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे  यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 
यावेळी पालकमंत्री श्री. कांबळे पुढे म्हणाले की, विविध कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून राज्यात सामाजिक, आरोग्य, सहकार, शैक्षणिक, आर्थिक आदी क्षेत्रात अमुलाग्र बदल होत असून, महाराष्ट्र आर्थिक विकासाकडे झेपावत आहे. राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आदी समाजोपयोगी महत्वकांक्षी कल्याणकारी योजना जिल्ह्यात यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे. नूकतेच जिल्ह्यातील विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन झाले आहे. राज्याचे वित्त मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते जिल्हा कोषागार कार्यालयाचे उद्घाटन करुन लोकार्पण करण्यात आले आहे. तसेच वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत हिंगोली नगर परिषद प्रशासकीय इमारत, हिंदू स्मशान भूमीचा विकास, शिवाजीराव देशमुख सभागृह आणि नाट्यगृह या कामाचे राज्याचे वित्त मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते नूकतेच भूमिपूजन झाले असून या कामामुळे जिल्ह्याच्या विकासात भर पडली आहे.
तसेच राज्य शासनाने जिल्ह्यातील सर्व नगर पालिका आणि नगर पंचायती हागणदारी मुक्त घोषित केल्या आहे. विशेष रस्ता योजनेंतर्गत वसमत नगर परिषदेस 2 कोटी तर कळमनुरी नगर परिषदेस 1 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. तर सेनगाव नगर पंचायतीस मुख्य रस्त्यासाठी 5 कोटी तर औंढा नगर पंचायतीस विविध विकास कामासाठी 10 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. तसेच वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान म्हणुन नगर परिषद वसमत आणि कळमनुरी यांना प्रत्येकी 5 कोटी रुपये प्राप्त झाले आहे. तसेच हिंगोली जिल्हा रुग्णालयातील वाढीव 100 खाटांचे तर सेनगाव येथील 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय आणि वसमत येथील 60 खाटांच्या स्त्री रुग्णालयाचे काम पूर्ण झाले असून हस्तांरीत करण्यात आली आहे. तसेच हिंगोली येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून, लवकरच ते हस्तांतरीत करण्यात येणार आहे. हिंगोली जिल्हा न्यायालय इमारतीचे बांधकाम ही प्रगतीपथावर आहे असेही पालकमंत्री श्री . कांबळे यावेळी म्हणाले.
आपल्या संरक्षण दलाचे जवान व अधिकारी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अहोरात्र देशाच्या सीमांचे रक्षण करतात.  या सर्व सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी म्हणजे सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन होय. सन-2017 मध्ये जिल्ह्याने सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात उल्लेखनीय कामगिरी करत 140 टक्के ध्वजदिन निधी संकलीत केला आहे.
            यावर्षी जिल्ह्यात पावसाने ओढ घेतल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थितीत निर्माण झाली असून हिंगोली, कळमनुरी आणि सेनगाव या तालूक्यांचा दूष्काळ सदृश्य परिस्थितीत समावेश झाला आहे. या दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत करण्याची जबाबदारी शासन प्रशासनाची असून दुष्काळ सदृश्य भागातील पीक आणि पाणी परिस्थिती, पशुधनाची जपणूक, जनावरांना पुरेसा पाणीसाठा आणि चारा विनाविलंब उपलब्ध होण्याच्या दृष्टीने धरणातील ओलिताखालील जमीनीवर चाऱ्याची लागवड करण्या येत आहे. या दुष्काळ सदृश्य कालावधीत प्रशासनाकडे विविध लोकहिताची कामे करण्याची संधी असून या संकटाला संधी मानून सर्व यंत्रणानी समन्वयाने कामे करत जिल्ह्यातील नागरिकांना धीर देत या नैसर्गिक संकटाचा सामना करावा असे आवाहन करत श्री. कांबळे म्हणाले की जिल्ह्यातील दुष्काळ सदृश्य जो भाग किंवा गावांचा दुष्काळ सदृश्य यादीत समावेश नाही, अशा भागांना किंवा गावांना दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
            श्री छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील 73 हजारहून अधिक शेतकरी बांधवाना रुपये 327 कोटी 28 लाख  कर्जमाफी मंजूर झाली असून, यापैकी 66 हजाराहून अधिक शेतकरी बांधवाना रु. 267 कोटीचे वितरण करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील 2 लाख 64 हजार शेतकरी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी झाल्याने ते संरक्षित झाले आहे. तसेच 13 कोटी वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली असून, जिल्ह्यात 59 लक्ष हून अधिक म्हणजे 202 टक्के वृक्ष लागवड करुन उद्दिष्टपुर्ती केली आहे. या वर्षी 33 कोटी वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत जिल्ह्यात 70 लक्ष वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.
रेशीम शेती उद्योग, प्रधानमंत्री आवास योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, मुद्रा बँक योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजने अंतर्गत देखील जिल्ह्याने भरीव कामगिरी केली आहे. राज्याप्रमाणेच प्रगतीच्या क्षेत्रात अग्रभागी राहण्याचा हिंगोली जिल्ह्याने सतत प्रयत्न केला असे गौरवोदगारही श्री. कांबळे यांनी यावेळी काढले.
केंद्र शासनाकडून देशपातळीवर घेण्यात येणाऱ्या ‘राष्ट्रीय स्वच्छ विद्यालय स्पर्धेत’ कळमनुरी तालुक्यातील गोटेवाडी येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेने राज्यात प्रथम आणि देशात सतरावा क्रमांक मिळविल्याबद्दल माननीय केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत माननीय प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याबद्दल आदिवासी विभागाचे मी हार्दिक अभिनंदन करत असल्याचे सांगुन, आदिवासी विभागाकडून आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थी-विद्यार्थीनींकरीता स्वतंत्र रुग्णवाहिकेची सुविधा सुरु करण्यात येणार असून या रुग्णवाहिकेचे  लवकरच लोकार्पण होणार आहे.
संपूर्ण राज्य तंबाखू मुक्त करण्याच्या उद्देशाने राज्यस्तरावर राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणीकरीता आज शाळा, शासकीय कार्यालयामध्ये तंबाखूच्या दूष्परिणामाबाबत जनजागृती करण्यात येणार असून त्यांना शपथ देण्यात येणार आहे. तसेच येणाऱ्या 10 फेब्रूवारी रोजी विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांवर विनामुल्य उपचार करण्यासाठी हिंगोली येथे अटल महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात येणार असून, या महाआरोग्य शिबीराचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन ही पालकमंत्री श्री. कांबळे यांनी यावेळी केले.
आपण साजरा करीत असलेल्या प्रजासत्ताक दिन हा लोकशाहीचा उत्सव असून विविध प्रयत्नांमुळे आपली लोकशाही अधिकाधिक मजबूत होत आहे. लोकशाही विकेंद्रीकरणाची कास धरणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधींचे 150 वे जयंती वर्ष आहे. तर त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करणाऱ्या 73 व 74 व्या घटना दुरुस्तीचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. हे लक्षात घेता या वर्षांमध्ये व त्यामुळे होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये सर्व मतदारांनी राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून सहभागी व्हावे. तसेच स्वत:बरोबर इतर सहकार्यानाही मतदानाच्या कर्तव्यासाठी प्रोत्साहीत करणे आवश्यक आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आजपासून 10 फेब्रुवारी पर्यंत ‘लोकशाही पंधरवाडा’ साजरा करण्यात येणार आहे.
माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी तसेच समाजसेवक नानाजी देशमुख आणि संगीतकार भूपेन हजारिका यांना ‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार काल जाहिर झाला आहे. यातील नानाजी देशमुख हे आपल्या हिंगोली जिल्ह्यातील असल्याने याचा आपणांस सार्थ अभिमान असल्याचे ही कांबळे यावेळी म्हणाले.
            प्रारंभी पालकमंत्री श्री. कांबळे यांनी पोलिस, गृहरक्षक दल तसेच अन्य जवानांच्या संचलनाची मानवंदना स्वीकारली. यामध्ये पोलीस विभागाचे गृहरक्षक दल, अग्निशमन दल, नॅशनल कॅडेट कोर, श्वान पथक, वज्र वाहन, दहशतवाद विरोधी वाहन, आपत्ती व्यवस्थापन चित्ररथ, सामाजीक वनीकरणाचा हरीत चित्ररथ, आरोग्य विभागाचे आरोग्य पथक यांच्यासह विविध शालेय विद्यार्थी-विद्यार्थींनी देखील या संचलनात सहभागी झाले होते. यावेळी पालकमंत्री श्री. कांबळे यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थींनी आणि मान्यवरांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
            कार्यक्रमांचे सुत्र संचलन मदन मार्डीकर यांनी केले. यावेळी पत्रकार, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थींनी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
******

No comments: