17 September, 2016

मराठवाडा मुक्ती संग्रामात स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या लढ्याचे मोल अमूल्य
-- पालकमंत्री दिलीप कांबळे
हिंगोली, दि.17: मराठवाडा मुक्ती संग्रामात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता अखंड लढा दिला. मराठवाडा मुक्ती संग्रामात अनेक हुतात्म्यांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या लढ्याचे मोल अमूल्य असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी केले.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 68 व्या वर्धापन दिनानिमित्त देवडा नगर येथील हुतात्मा स्मारक स्मृतिस्तंभ येथे आयोजित करण्यात आलेल्या मुख्य ध्वजारोहण समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार रामराव वडकुते, नगराध्यक्षा अनिता सुर्यतळ, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा पोलीस अधिक्षक अशोक मोराळे, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नईम कुरेशी, अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी यांची उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री श्री. कांबळे म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. परंतू त्यानंतरही मराठवाडा निजाम संस्थानाच्या राजवटीखाली होता. निजामांच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी हा मुक्तीसंग्राम लढा स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ यांच्यासह इतर थोर नेत्यांच्या नेतृत्वाखाली लढला गेला. या संग्रामात हिंगोली जिल्ह्यातील बहिर्जी शिंदे वापटीकर, चंद्रकांत पाटील गोरेगावकर, दीपाजी पाटील दातीकर, बापुराव शिंदे वापटीकर, भीमराव ऊर्फ बाबासाहेब शेषराव नायक सवनेकर, वासुदेवराव बसोले, बाबुलाल माणिकचंद राठौर यांच्यासह अन्य स्वातंत्र सेनानी महत्वपूर्ण योगदान दिले असल्याचे ते म्हणाले.
मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे हे आंदोलन सतत 13 महिने सुरु होते. या आंदोलनात अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता आहुती दिल्याने अखेर दि. 17 सप्टेंबर, 1948 रोजी निजामाच्या जोखंडातून मराठवाडा मुक्त झाला. मराठवाडा मुक्ती संग्रामाकरीता अनेक हुतात्म्यांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या लढ्याचे मोल फार मोठे आहे.
यापुर्वी श्री. कांबळे यांनी देवडा नगर येथील उद्यानातील हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी पोलीस पथकाने हुतात्म्यांना मानवंदना देवून शोक धून वाजवून हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी दिली. तसेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहन केले. यावेळी पालकमंत्री श्री. कांबळे यांनी उपस्थित ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, पदाधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
            यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी लतीफ पठाण, तहसीलदार विजय अवधाने, लोकप्रतिनिधी, पत्रकार, अधिकारी-कर्मचारी व नागरिकांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. भंडारी यांच्या हस्ते ध्वजारोहण
हिंगोली, दि.17: मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 68 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी, निवासी उपजिल्हाधिकारी लतीफ पठाण, उपजिल्हाधिकारी (रोहयो) खुदाबक्ष तडवी, उपविभागीय अधिकारी अमित शेंडगे, जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी, तहसिलदार श्री. अवधाने, प्रशासन अधिकारी अशोक अग्रवाल यांच्यासह विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी  उपस्थित होते.

















 

No comments: