17 September, 2016

जलयुक्त अंतर्गत जास्तीत-जास्त दूरुस्तीचे कामे घ्यावीत
     -- पालकमंत्री दिलीप कांबळे
हिंगोली, दि.17: जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातील जलसंधारणाची विविध कामे मोठ्या प्रमाणावर होत असून ही कामे चांगली व दर्जेदार होतील याकडे संबंधीत यंत्रणांनी लक्ष द्यावे. तसेच निवडलेल्या गावांमध्ये शाश्वत पाणी उपलब्धतेसाठी नवीन कामे घेण्याऐवजी जास्तीत-जास्त दुरुस्तीचे कामे घ्यावीत, अशा सूचना सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी केली .
येथील विश्रामगृहात आयोजीत आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. कांबळे  बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नईम कुरेशी, अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी, निवासी उपजिल्हाधिकारी लतीफ पठाण यांची उपस्थिती होती.
पुढे श्री. कांबळे म्हणाले की, कायमस्वरुपी दुष्काळमुक्तीसाठी जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत असून यामुळे पाणी पातळी वाढण्यास मदत होत आहे. यावर्षी पाऊस चांगला होत असल्याने पाणी टंचाई भासणार नाही, पण यापुढेही पाणी टंचाई भासू नये, यासाठी जास्तीत-जास्त जलसंधारणाची दर्जेदार कामे करण्याची आवश्यकता आहे.
जिल्ह्यास सन 2016-2017 करीता 960 कोटी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु, आतापर्यंत सुमारे 35.00 टक्के इतकेच पीक कर्ज शेतकऱ्यांना वितरीत झाले आहे. यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांनी उद्दिष्टापैकी अत्यंत कमी प्रमाणात पीक कर्ज वाटप केले असून याबाबत संबंधीताची तक्रार मा. मुख्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याचे ही श्री. कांबळे यावेळी म्हणाले.
यावेळी श्री. कांबळे यांनी पीक पेरणी, पीक कर्ज व पुर्नगठन, पर्जन्यमान, प्रकल्पातील पाणीसाठा, नरेगा, महावितरण, आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम, सामाजीक न्याय विभाग, पुरवठा विभाग  आदी विभागांचा आढावा घेतला.
प्रारंभी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी पालकमंत्री श्री. कांबळे यांना जिल्ह्यातील विविध विषयावरील माहिती दिली. होत असलेल्या कामाबाबत पालकमंत्री श्री. कांबळे यांनी समाधान व्यक्त करुन यापुढील कामे चांगल्या पद्धतीने करण्याच्या सूचना संबंधीत विभागास दिल्या.
यावेळी बैठकीस उपविभागीय अधिकारी अमित शेंडगे, तहसीलदार विजय अवधाने, यांच्यासह विविध विभागाच्या विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

*****

No comments: