04 September, 2016

शेतकऱ्यांना शासनाच्या सर्व योजनेचा लाभ देवून त्यांच्या समस्या सोडवाव्यात
      ---    जलसंपदा,जलसंधारण व संसदीय कार्य राज्यमंत्री विजय शिवतारे

हिंगोली, दि. 4: जिल्ह्यातील मागील कालावधीतील दुष्काळ सदृश्य परिस्थिती लक्षात घेवून शेतकऱ्यांना शासनाच्या संबंधीत विभागानी विविध कल्याणकारी योजनेचा लाभ देवून त्यांच्या समस्या सोडवाव्यात, असे निर्देश राज्याचे जलसंपदा, जलसंधारण व संसदीय कार्य राज्यमंत्री श्री. विजय शिवतारे यांनी दिले.
जिल्ह्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती तसेच पीक पाहणी परिस्थिती आणि केलेल्या उपाययोजनाची पाहणी करण्याकरीता जिल्हा दौऱ्यावर आले असता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती लक्ष्मीबाई यशवंते, मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे,  सर्वश्री आमदार जयप्रकाश मुंदडा, राहूल पाटील, सुभाष भोईर, गोपीकिशन बाजोरिया, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी नईम कुरेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. शिवतारे पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या समस्यांवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी  शासन कटिबध्द आहे. शेतकऱ्यांच्या समस्या जाणुन घेवून त्यांना सर्व योजनेचा लाभ देवून दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, कुकुट पालन, शेळी पालन अशा शेती पुरक  व्यवसाय करण्यासाठी त्यांना संबंधीत विभागांनी प्रवृत्त करावे. दुष्काळमुक्तीसाठी जलयुक्त शिवार अभियानाची अंमलबजावणी  सुरु असून या योजनेचा शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होत आहे. आता यामुळे भुजलस्तर वाढण्यास मदत होणार आहे. यावर्षी पाऊस चांगला झाला असल्याने पाणी टंचाई भासणार नाही, पण यापुढेही पाणी टंचाई भासू नये, यासाठी जास्तीत-जास्त जलसंधारणाची कामे करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी नागरिकांना प्रवृत्त करुन जिल्हा प्रशासनालाही काम करावे लागेल. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी पाणी उपलब्धतेची शाश्वती या योजनेतून निर्माण झाली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, समन्वय आणि लोकसहभागामुळे या योजनेत हिंगोली जिल्ह्यातही प्रभावी काम झाल्याचे दिसून येत आहे. तसेच  मागील वर्षी ज्या गांवाना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला त्या सर्व गावांचा समावेश यावर्षीच्या जलयुक्त शिवार अभियान योजनेत करुन त्या ठिकाणी जलसंधारणाची कामे
करावीत. जलयुक्त शिवारअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या उपाययोजनांपैकी भुजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण महत्त्वाचे आहे. भविष्यात गावांना टॅंकरमुक्त करणे, शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी व इतर सुविधा पुरविण्याच्या दृष्टीकोनातून जलयुक्त शिवार अभियानाची कामे शंभर टक्के पूर्ण करणे आवश्यक आहे. जलयुक्त शिवार अभियानाद्वारे जलसंधारणांच्या कामांना गती देण्यासाठी नागरिकांनी साथ देवून आपल्या शिवारात जास्तीत-जास्त जलसंधारणाची कामे करण्याचे आवाहन श्री. शिवतारे यांनी यावेळी केले.
जलसंधारणाची कामे करताना नवीन पाझर तलाव, ग्रामतलाव किंवा बंधाऱ्यांसाठी आता योग्य जागा उपलब्ध नसल्यास किंवा उपलब्ध झाल्यास त्यासाठी येणारा प्रचंड खर्च करण्यापेक्षा पूर्वी झालेली जलसंधारणाची कामे लक्षात घेऊन त्यांची दुरुस्ती देखभाल केल्यास नवे प्रकल्प उभारण्यापेक्षा जुन्यांच्या दुरुस्तीसाठी केवळ 20 टक्के खर्च येतो. त्याद्वारे उपलब्ध निधीत 5 पट कामे होते. जिल्ह्यातील 11 कोल्हापूरी पध्दीतीचे बंधारे दूरुस्त करण्यात आले असून जलयुक्त शिवार अभियानातंर्गत जास्तीत-जास्त नादूरुस्त बंधाऱ्याची कामे  तात्काळ करावीत. नदी पुर्नजीवन योजनेतंर्गत कयाधु नदीचे खोलीकरण व रुंदीकरणाचे कामे करावीत. राज्यात नुकताच घेण्यात आलेल्या 2 कोटी वृक्ष लागवड उपक्रमातंर्गत लागवड करण्यात आलेल्या वृक्ष जगविण्यासाठी बिहार पॅटर्ननुसार नरेगा अंतर्गत लोकांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा. तसेच नरेगा अंतर्गत शोषखड्डे, फळबागा, गाळ काढणे, नाला खोलीकरण-रुंदीकरण, पाणंद रस्ते अशा विविध प्रकारची जास्तीत-जास्त कामे घेवून लोकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या सूचना ही यावेळी श्री. शिवतारे यांनी संबंधितांना दिल्या.
            यावेळी श्री. शिवतारे यांनी पीक पेरणी, पीक कर्ज व पुर्नगठन, पर्जन्यमान, धरणातील उपलब्ध पाणीसाठा, सावकारी कर्ज माफी, नैसर्गिक आपत्ती, खरीप कापूस पीक निधी मागणी, महिला सक्षमीकरण सप्ताह आदी विषयांचा आढावा घेतला.
            जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील विविध विषयावरील माहिती सादर केली.
यापूर्वी  राज्यमंत्री श्री. शिवतारे यांनी वसमत तालूक्यातील धुळगाव सांगवी येथील अपुर्ण बंधाऱ्याची पाहणी केली तसेच पुढील जूनपर्यंत सदर बंधाऱ्याची कामे पुर्ण करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच हिंगोली तालूक्यातील डिग्रस (कऱ्हाळे) येथील पाझर तलावातील गाळ उपशामुळे साठवण झालेल्या पाण्याची
पाहणी करुन जलपुजन केले. तसेच डिग्रस (कऱ्हाळे) गावास आवश्यकता भासल्यास आणखी काम करण्यासाठी कटिबध्द राहू असे, आश्वासन यावेळी ग्रामस्थांना दिले. हिंगोली तालुक्यातील कोथळज येथील तलावाची पाहणी करुन तलावाचे खोलीकरण व रुंदीकरण करण्याचे काम करण्यासाठी संबंधीतांना सूचना दिल्या. नरसी नामदेव येथील बंधाऱ्याची पाहणी करुन जलपुजन केले. 
यावेळी  बैठकीस विविध विभागाचे विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
****









No comments: