19 April, 2017

स्कुल बस सुरक्षेसाठी वेबसाईट
हिंगोली, दि.19: जिल्ह्यातील सर्व शाळांमधून परिवहन समित्या स्थापन करून त्याची माहिती वेबसाईटवर भरण्यात यावी. वेळोवेळी शासनास माहिती पाठविणे सोपे व्हावे व तसेच शाळा, शिक्षण विभाग व  परिवहन विभाग यामध्ये समन्वय राहावा व माहिती लवकर प्राप्त व्हावी यासाठी वेबसाईट (संकेतस्थळ) schoolbussafetyhingoli.org तयार करण्यात आली आहे. सदर वेबसाईट सर्वसामान्य नागरिक व जिल्ह्यातील सर्व शाळांना पाहता येईल. वेबसाईटवर जिल्ह्यातील सर्व शाळांनी रजिस्ट्रेशन करून समिती स्थापन करण्याबाबत माहिती भरण्यात यावी, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार यांनी आवाहन केले.
येथील जिल्हा परिषद, सभागृहात जिल्हा स्कुल बस समितीच्या बैठकीत श्री. पवार बोलत होते. यावेळी बैठकीस पोलीस अधिक्षक अशोक मोराळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री. चवणे, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. पवार, उपशिक्षणाधिकारी श्री. इंगोले, एस. टी. महामंडळचे श्री. पाटील व नगर पालिकेचे अधिकारी व जिल्ह्यातील मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांची उपस्थिती होती.
पोलीस अधिक्षक अशोक मोराळे यांनी शाळांच्या अडचणी विचारुन घेतल्या व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कमीटीतील प्रत्येक घटकाने काम केले पाहीजे. तसेच शाळांमध्ये परिवहन समित्या स्थापन करून त्या मार्फत विद्यार्थी सुरक्षेबाबतच्या बाबीसाठी प्रयत्न केले पाहीजे. पालकामध्ये तसेच शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकामध्ये विद्यार्थी सुरक्षेबाबत जागृती निर्माण केली पाहीजे याबाबत मार्गदर्शन केले. शिक्षक, पालक, वाहनचालक, प्रशासन या सर्व घटकांनी मिळून विद्यार्थी सुरक्षेसाठी प्रयत्न केले पाहीजे असे आवाहन श्री. मोराळे यांनी केले.
वेबसाईटमध्ये माहिती कशी भरावी याबाबत मोटार वाहन निरीक्षक अशोक जाधव यांनी मार्गदर्शन केले.  प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. पवार यांनी देखील मुख्याध्यापकांना जून 2017 पर्यंत वेबसाईटवर माहिती भरण्याबाबत सुचना केल्यात तसेच त्यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

*****

No comments: