09 May, 2020

नियमाची अमंलबजावणी करुन जिल्हा ग्रीन झोनमध्ये येण्यासाठी प्रयत्न करा - पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड



हिंगोली,दि.9: कोरोना विषाणूमुळे बाधित रुग्णांच्या संख्येत राज्यात सातत्याने वाढ होत आहे. परंतू जिल्हा  प्रशासनाने केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे जिल्ह्यातील कोरोनासंदर्भातील प्रमाण सद्यस्थितीत नियंत्रणात आहे. पंरतू आपला जिल्हा लवकरात-लवकर ग्रीन झोनमध्ये येण्यासाठी प्रयत्न करा असे शालेय शिक्षण मंत्री  तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील डी.पी.सी. सभागृहात आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री प्रा. गायकवाड या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधा विनोद शर्मा, अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांची उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री प्रा. गायकवाड म्हणाल्या की, कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी कोरोनाची लक्षणे दिसणाऱ्या नागरिकांची तात्काळ चाचणी करावी. सर्वेक्षण करतांना माहिती न देणाऱ्या किंवा माहिती लपवणाऱ्या नागरिकांवर गरज पडल्यास योग्य ती कारवाई करावी. तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये. प्रशासनाने प्रतिबंधीत क्षेत्रात अत्यावश्यक सेवा घरपोच मिळतील यासाठी नियोजन करावे. कोरोना बाधितांबरोबरच इतर रोगांने आजारी असणाऱ्या नागरिकांवर योग्य उपचार करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
डॉक्टर रुग्णालयात येतात का? याची माहिती घेवून त्या म्हणाल्या की, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, विविध विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काम करीत असुन त्यांनी आपली काळजी घ्यायला हवी. सर्वेक्षण करणारे कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना पीपीई किट, मास्क आदी साहित्य देण्यात यावे, असे त्यांनी यावेळी  सांगितले.
जिल्ह्यात विद्युत पुरवठ्याबाबतच्या अनेक तक्रारी प्राप्त होत असून, त्यामुळे शेतकऱ्यांना शेती विषयक कामात अडचण येत असुन, अनेक ठिकाणचा पाणी पुरवठा बंद झाला आहे. महावितरणने याकरीता अखंडीत वीज पुरवठा सुरु राहील याबाबत तात्काळ कार्यवाही करावी. तसेच खरीप हंगाम जवळ आल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी पंपाचा तात्काळ लाभ द्यावा. तसेच महावितरणने त्यांची प्रलंबीत असलेली कामे तात्काळ पूर्ण करावीत, अशा सूचना ही त्यांनी यावेळी दिल्या.
केशरी कार्ड धारकांना धान्य वाटप सुरू करा. त्याचबरोबर  अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना, एपीएल शेतकरी योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंत्योदय आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना प्राधान्य कुटूंब योजनेतील लाभार्थ्यांना मंजूर नियतन्वाये अन्न-धान्यांचे वितरण करा. कोणीही अन्न-धान्यापासून वंचित राहता कामा नये अशा त्यांनी यावेळी सूचना दिल्या. मात्र धान्य वितरण करतांना दुकानांत सामाजिक अंतर राखले जाईल याची ही काळजी घ्यावी. प्रतिबंधित क्षेत्रात घरपोच धान्य पोहचविण्याचा प्रयत्न करण्याचे ही त्यांनी यावेळी निर्देश दिले.
खरीप हंगामात खत व बियाणांचा पुरवठा करतांना ती गुणवत्तापूर्ण व दर्जेदार असल्याची खातरजमा करावी. तसेच खतांच्या व बियाणांच्या बाबतीत कोणत्याही शेतकऱ्यांची तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही त्या यावेळी म्हणाल्या.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला असुन, अनेक मजूर जिल्ह्यात परतले आहेत.  महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता जिल्ह्यातील जास्तीत-जास्त मजूरांना कामे उपलब्ध करुन द्यावीत. परंतू कोरोनाचा प्रादूर्भाव लक्षात घेता वयैक्तीक स्वरुपाची कामे उपलब्ध करुन देण्याच्या त्यांनी यावेळी सूचना दिल्या.
मे महिना सुरु झाला असुन, जिल्ह्यात पाणी टंचाई निवारणासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. तसेच राज्य शासनाच्या सूचनेनुसार पाणी टंचाई कृती आराखडा तयार करावा. तसेच ज्या गावातून मागणी येईल त्यांना तात्काळ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी विंधन विहिरीचे अधिग्रहण करुन पाणी पुरवठा करण्यात यावा.
यावेळी पालकमंत्री प्रा. गायकवाड म्हणाल्या की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणीही घाबरून जाता कामा नये. राज्यावर अथवा देशावर ज्यावेळेस कुठलेही संकट येते, त्यावेळेस आपण सर्वांनी एकजुटीनं त्या संकटाचा सामना करणे आपणां सर्वांची जबाबदारी आहे. या परिस्थितीत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा न करता, दक्षता घेवून सर्वांनी आपली जबाबदारी पार पाडावी.
या संकटाच्या कालावधीत प्रशासनातील सर्व अधिकारी-कर्मचारी हे आपल्या कुटूंबापासून दूर राहून आपले कार्य करत आहेत त्यांचे यावेळी पालकमंत्री प्रा. गायकवाड यांनी आभार मानले. तसेच प्रशासन अतिशय जागरुकपणे सर्व परिस्थिती हाताळत असुन नागरिकांनी त्यांना सहकार्य करुन कोरोनाला हद्दपार करण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी केवळ सुरक्षित अंतर व दक्षता यामुळेच हे शक्य होणार आहे. कोरोना प्रादूर्भावावर मात करण्यासाठी शासन-प्रशासन प्रयत्न करीत असून, विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. याकरीता नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे ही पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यावेळी म्हणाल्या.
यावेळी पालकमंत्री श्रीमती प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी कोरोना, पाणी टंचाई, मनरेगा, शासकीय धान्यवाटप योजना, महावितरण याबाबतचा आढावा घेतला. यावेळी विविध विभागाच्या विभागप्रमुखांची उपस्थिती होती.
****



No comments: