06 May, 2020

कोरोनाचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपाययोजना


हिंगोली,दि.06: कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि पोलीस विभागाने, नगर पालिका, नगर पंचायत आदी यंत्रणामार्फत कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी जिल्ह्यात 21 आणि 22 मार्च रोजी जनता कर्फ्यू पाळण्यात आला. तसेच दि. 23 मार्च पासून  जिल्ह्यात आजपर्यंत संचारबंदी लागू करुन जिल्ह्यातील  सिमा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच आपत्तीजनक परिस्थिती उद्भवू नये यासाठी पूर्वतयारी करण्यासाठी सनियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली. तसेच बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या व्यक्तींची तपासणी करुन त्यांना विलगीकरणांत ठेवण्यासाठी व्हीआरटी पथकाची स्थापना करण्यात आली. सोशल डिस्टंसींगचे पालन व्हावे याकरीता जिल्ह्यात एक दिवसा आड किराणा माल आणि भाजीपाला दूकाने सुरु ठेवण्यात आली. औषधी दूकान व इतर अत्यावश्यक सेवेसाठी नियोजन करण्यात आले. बाहेरील जिल्ह्यातील किंवा राज्यातील 2 हजार 292 नागरिकांकरीता जिल्ह्यात 18 ठिकाणी निवारागृह सुरु करुन त्यांची राहण्याची व जेवणांची सोय करण्यात आली. तसेच लॉकडाऊनच्या कालावधीत जिल्ह्यातील नागरिक उपाशी राहू नयेत याकरीता अन्न-धान्य पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात असून, आतापर्यंत जिल्ह्यातील 31 हजार 012 शिधापत्रिकाधारकांना सोशल डिस्टसिंगचे पालन करुन 7 हजार 204 मेट्रीक टन अन्न-धान्याचे वितरण करण्यात आले आहे. तसेच कोरोनाचा प्रार्दूभाव वाढू नये यासाठी मास्कचे वितरण करुन नगर परिषदेमार्फत जागोजागी हात धुण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील विविध भाग आणि शहरातील रस्त्यांवर फवारणी करण्यात आली. गरीब व  गरजू लोकांना मदत करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था आणि दानशुर व्यक्तीना आवाहन करण्यात आले. कोरोनाच्या प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातील सर्व यंत्रणा कार्यरत असून त्यांच्या मार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात 90 कोरोना बाधीत रुग्ण असुन, यामध्ये हिंगोली येथील राज्य राखीव पोलीस दलातील 84 जवान तर इतर 6 जण आहेत. राज्य राखीव पोलिस दलातील 194 अधिकारी व जवान हे कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून पुढे आलेल्या मुंबई व मालेगाव येथे संचार बंदीच्या बंदोबस्तासाठी गेले होते. सदर अधिकारी व जवान मालेगाव व मुंबई येथून हिंगोलीत परत येणार असल्याची  माहिती जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांना मिळताच त्यांनी राज्य राखीव पोलिस दलाचे समादेशक मंचक इप्पर यांच्याकडून मालेगाव व मुंबईहून येणाऱ्या अधिकारी आणि जवानाची माहिती घेतली. तसेच बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या व्यक्तींचे थ्रोट स्वॅब घेण्याबाबत कोणतेही मार्गदर्शक तत्वे नसतांना या सर्व अधिकारी-जवानाची हिंगोलीत दाखल होताच सर्वप्रथम त्यांचे थ्रोट स्वॅब घेवून त्यांना विलीगीकरण कक्षात ठेवण्याच्या सुचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी  दिल्या. राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी याबाबत योग्य नियोजन करुन अंमलबजावणी केली. तपासणी बाबत कोणतेही मार्गदर्शक तत्वे नसतांनाही बाहेरील कोरोना हॉटस्पॉट जिल्ह्यातून हिंगोली जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी दिले असून, त्यानुसार दि. 10 एप्रिलपासून तपासणी करण्यात येत आहे. सदर अधिकारी आणि जवान घरी राहिले असते तर किराणा भाजीपाला अथवा अन्य जीवनावश्यक वस्तूंनिमित्त शहरात फिरले असते तर त्यातून व्यक्ती अथवा समूह संसर्ग होण्याचा मोठा धोका देखील निर्माण झाला असता. तो धोका जिल्हाधिकारी यांच्या पूर्वनियोजनाने टळला.
तसेच इतर निगेटीव्ह असलेल्या जवांनाची विशेष काळजी म्हणुन स्वतंत्र विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. तसेच त्यांना लागण होवू नये याची काळजी घेवून त्यांच्यावर औषधोपचार सुरु आहेत. तसेच त्यांना दैनंदिन लागणाऱ्या वस्तुंची किट देण्यात आली असून, जेवणाची विशेष काळजी घेण्यात येत आहे. परंतू सदर जवान हे कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून पुढे आलेल्या मुंबई व मालेगाव येथे अनेक दिवस बंदोबस्तासाठी गेले असल्याने त्यातील अनेक जवानांना कोरानाची लागण झाली. परंतू या सर्व रुग्णांवर तज्ज्ञ डॉक्टरामार्फत औषधोपचार सुरु असून सर्वांची प्रकृती स्थीर असुन प्रशासनामार्फत त्यांची सर्वोतोपरी काळजी घेतली जात आहे.
कोरोना विरुध्द लढ्यात हिंगोलीकरांनी संचार बंदीच्या नियमाचे पालन करावे. तसेच सर्व नागरिकांनी अत्यंत महत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. घरी थांबून आपले आणि आपल्या कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेवून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. 
****



No comments: