27 May, 2020

जिल्ह्याकरीता प्रतिबंधीत व प्रतिबंध मुक्तचे नवीन आदेश


जिल्ह्याकरीता प्रतिबंधीत व प्रतिबंध मुक्तचे नवीन आदेश

हिंगोली,दि.27:  राज्‍य शासनाने कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍यात साथीचा रोग प्रतिबंधात्‍मक कायदा 1897 दि. 13 मार्च, 2020 रोजीपासून लागू करुन खंड 2, 3 व 4 मधील तरतूदी नुसार अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना कोविड-19 नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करण्यासाठी सक्षम अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. कोरोना विषाणूच्या अनुषंगाने लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या आदेशानुसार जिल्ह्यात करावयाच्या उपाययोजनाबाबत यापूर्वीच सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता यापूर्वीचे दुकान व उद्योग सुरु ठेवण्याचे सर्व आदेश रद्द करुन खालीलप्रमाणे प्रतिबंधीत व प्रतिबंध मुक्त करावयाचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे.
या आदेशान्वये  जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक, प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्लासेस (खाजगी शिकवणी वर्ग), बंद राहणार असून ऑनलाईन शिकवणीसाठी परवानगी देण्यात आली आहे. तसेच हॉटेल, रेस्टारंट आणि आदीरातीथ्य सेवा बंद राहणार आहेत. परंतू या सेवा आरोग्य, पोलीस, शासकीय अधिकारी/ कर्मचारी , वैद्यकीय कर्मचारी, अडकून पडलेले व्यक्ती व पर्यटक आणि अलगीकरण केंद्रात सुरु असलेल्या सेवा व बस स्थानक व रेल्वे स्थानकावरील चालू असलेल्या हॉटेल सेवा (सुरु राहतील) यांना लागू राहणार नाहीत. हॉटेल, रेस्टारंट व खानावळ यांच्या सेवा फक्त घरपोच वितरणासाठी सुरु ठेवता येणार आहेत. सर्व सिनेमा गृह, केश कर्तनालय, स्पा, शॉपींग मॉल, व्यायामशाळा, जलतरण पूल, करमणुकीचे ठिकाणे, थिएटर, बार, सभागृहे, मंगल कार्यालये इत्यादी बंद राहणार आहेत. सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा विषयक, करमणूक विषयक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक व मोठ्या प्रमाणात नागरिक एकत्र येऊन साजरे होणारे कार्यक्रम घेण्यावर बंदी राहणार आहेत. तसेच सर्व धार्मिक व प्रार्थना स्थळे सर्व नागरिकांसाठी व धार्मिक कार्यक्रमासाठी बंद राहणार आहेत.
तर क्रीडा संकुल, क्रीडा मैदाने व इतर सार्वजनिक खुली मैदाने वैयक्तिक व्यायामाकरिता चालू राहणार आहेत. परंतू प्रेक्षक व सामुहिक कार्यक्रमासाठी अशा ठिकाणी बंदी करण्यात आली आहे. सर्व शारिरीक व्यायाम व इतर हालचाली सामाजिक व सुरक्षित अंतर ठेवून करता येणार आहे.  सर्व खाजगी व सार्वजनिक वाहतुक करतांना दूचाकी वाहन केवळ एक व्यक्तीसाठी, तीन चाकी वाहन एक + दोन व्यक्तींसाठी व चार चाकी वाहन एक + दोन व्यक्तींसाठी वापरता येणार आहेत.
जिल्हातंर्गत बस वाहतुक सेवा प्रती बस वाहन क्षमतेच्या 50 टक्के पर्यंतच्या मर्यादेत शारिरीक व सामाजिक अंतराचे पालन करुन व सॅनिटायझेशन मेझर्सचे पालन करुन सुरु करता येणार आहे. कंटेनमेंट झोन मधील गावे व भागातील प्रतिबंधीत क्षेत्र वगळून जिल्ह्यातंर्गत सर्व दुकाने, उद्योग, व्यवसाय, आस्थापना दररोज सकाळी 9.00 ते 5.00 यावेळेत  खालील अटींच्या  अधिन राहून सुरु ठेवता येणार आहे. तर रात्री 7.00 ते सकाळी 7.00 यावेळेत जिल्ह्यात संपूर्ण संचार बंदी लागू असणार आहे.
याकरीता पुढील नियमाचे पालन करणे आवश्यक असणार आहे. दुकानातील मालक, कर्मचारी, ग्राहक व इत्यादी यांच्या चेहऱ्यावर मास्क घालणे बंधनकारक आहे. सार्वजनिक ठिकाणी दुकानाच्या व आस्थापनाच्या परिसरात व इतर ठिकाणी थुंकल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणे तसेच दुकानच्या परिसरात  सामाजिक अंतर राखणे बंधनकारक असेल. सार्वजनिक ठिकाणी तसेच दुकानाच्या परिसरात मद्यपान, तंबाकू, गुटखा, पान इत्यादींचे सेवनास प्रतिबंध असेल. एका वेळेस दुकानात पाच पेक्षा जास्त ग्राहकास प्रवेश राहणार नाही. तसेच सामाजिक अंतर राखण्यासाठी दुकानाबाहेर एक मीटर अंतरावर ग्राहकांना उभे राहण्यासाठी गोल, चौकोन आखून लागेल. कामाच्या ठिकाणी, दुकानात प्रवेशापूर्वी हॅन्डवॉश, सॅनिटायझरचा वापर करणे दुकानातील मालक, कर्मचारी, ग्राहक व इत्यादींना बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच दुकान, आस्थापना, उद्योग इत्यादी ठिकाणी मानवी संपर्कात येणाऱ्या सर्व वस्तू ठिकाणाचे वेळोवेळी नियमित निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक असणार आहे. ग्राहकाकडून खरेदीनंतर पैशाची देवाण-घेवाण आरबीआयच्या सूचनेनुसार ई-वॉलेट्स व स्वाईप मशिनद्वारे करण्यावर भर द्यावा असे आदेशात नमूद केले आहे.
वरील सर्व आदेशाची अवज्ञा करणाऱ्या संबंधिताने भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे मानण्यात येईल. तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 साथरोग प्रतिबंध कायदा 1897, महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 अंतर्गत संबंधितांवर कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल असे  रुचेश जयवंशी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारण, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहेत.

****




No comments: