26 March, 2021

कोरोना आजारावर नियंत्रण आणण्यासाठी तालुकास्तरीय व ग्रामस्तरीय समन्वय समिती गठीत

 


हिंगोली, (जिमाका) दि. 26 : शहरात तसेच ग्रामीण भागात मागील दोन महिन्यापासून कोविड-19 बाधित रुग्णांची संख्या जलद गतीने वाढत आहे. कोविड-19 या आजाराचा प्रादुर्भाव आटोक्यात आणून त्यावर नियंत्रण आणण्यासाठी हिंगोली शहरात व ग्रामीण भागात विविध उपाययोजना  करणे आवश्यक  आहे. त्यासाठी उपाययोजनेचा एक भाग म्हणून तहसील कार्यालयाकडून दि. 27 फेब्रुवारी, 2021 च्या आदेशान्वये कोविड-19 बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन (contract tress) त्यांचे विलगीकरण करण्यासाठी एकूण 16 पथके नेमली आहेत.

          कोविड-19 आजाराचे गांभीर्य लक्षात घेता तसेच वाढती रुग्णसंख्या पाहता या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी पुढील प्रमाणे प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. यामध्ये प्रत्येक नागरिकाने मास्कचा वापर करणे. सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक गर्दी टाळणे. सामाजिक अंतर राखणे. धार्मिक, प्रार्थना, पर्यटन स्थळांवर प्रवेश बंद करणे. फळभाजी विक्रेते, किराणा दुकान व बाजारपेठेतील इतर दुकाने येथे होणारी आनावश्यक गर्दी यावर देखरेख/नियंत्रण ठेवणे. शहरातील व ग्रामीण भागातील दुकाने, आस्थापना, प्रतिष्ठान इत्यादींना नेमून दिलेल्या वेळेतच चालू ठेवतात याची खबरदारी घेणे. मंगल कार्यालये, लॉन्स इत्यादी ठिकाणी लग्नसमारंभात दिलेल्या परवानगीपेक्षा अधिक नागरिक असणार नाहीत याची देखरेख व नियंत्रण ठेवणे. शाळा, कोचींग क्लासेस, जिमखाने, हॉटेल्स, उपहारगृहे, पानटपऱ्या इत्यादींना नेमून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त चालू न ठेवणे व त्या ठिकाणी आरोग्य विषयक सुविधा (मास्क/सॅनिटायझर) याचा वापर होत आहे का नाही याची पाहणी करणे. कोविड-19 बाधित रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात पाठविणे. कोविड-19 सदृश्य नागरिकांची तपासणी करणे इत्यादी व अनुषंगिक बाबीचा समावेश आहे .

                वरील सर्व बाबींच्या उपाययोजना करणे, त्यांची अंमलबजावणी करणे, नियंत्रण ठेवणे व अनुषंगिक कामांसाठी हिंगोली तहसीलदार तथा तालुका इंन्सिडंट कमांडर पांडुरंग माचेवाड यांनी तालुकास्तरीय व ग्रामस्तरीय समिती गठीत केली आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

           कोविड-19 तालुकास्तरीय समन्वय समिती : या समितीवर अध्यक्ष म्हणून तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांची तर सदस्य सचिव म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एन. व्ही. कारेडे यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये सदस्य म्हणून गटविकास अधिकारी मिलींद पोहरे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय कुरवाडे, हिंगोली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कच्छवे, हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बंदखडके, बासंबा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र मलपिल्लू, नरसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गिरी यांची नेमणूक करण्यात आली आहे.  

          वरील कोविड-19 तालुकास्तरीय समन्वय समिती यांच्या अधिनस्त उपरोक्त नमूद कामे करण्यासाठी ग्रामस्तरीय समिती पुढील प्रमाणे गठीत करण्यात आली असून प्रत्येक विभागाने त्यांच्या अधिनस्त कर्मचारी यांची त्यांच्यास्तरावर स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करुन नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत.

           कोविड-19 ग्रामस्तरीय समन्वय समिती : कोविड-19 संदर्भात गाव पातळीवर सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी संबंधित गावचे तलाठी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्तरीय समन्वय समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये संबंधित गावचे ग्रामसेवक, आरोग्य सेवक, पोलीस कर्मचारी (बिट जमादार व पोलीस कॉन्स्टेबल), कृषि सहाय्यक, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व कोतवाल यांची नेमणूक करण्यात आली आहे.

           वरील प्रमाणे ग्रामस्तरीय समितीमध्ये नियुक्त सर्व संबंधित कर्मचारी यांनी कोविड-19 संदर्भात आदेशात नमूद केल्याप्रमाणे प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. तसेच त्यांनी केलेल्या दैनंदिन कामाचा अहवाल वेळोवेळी त्याच्या कार्यालय प्रमुखांकडे सादर करावयाचा आहे.

           वरील नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांच्यासोबत संबंधित प्रभागाचे नगर परिषद सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य हे सदरील पथकाचे सदस्य असून त्यांनी उक्त कामी पूर्णपणे सहकार्य करावे. वरीलप्रमाणे नियुक्त पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी सुरक्षेच्या दृष्टीने योग्य तो पोलीस बंदोबस्त ठेवावा. या आदेशात नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना सॅनेटायझर, मास्क, ग्लोज व इतर आरोग्य विषयक साहित्य तालुका आरोग्य अधिकारी, हिंगोली व जिल्हा सामान्य रुग्णालय, हिंगोली यांनी उपलब्ध करुन देण्यात यावे. तसेच पथकातील नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांचे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण तात्काळ करावे.

          या आदेशाची अवज्ञा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने, पथकातील सदस्याने भारतीय दड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल तसेच या कामी हयगय, टाळाटाळ अथवा हलगर्जीपणा केल्यास संबंधितावर साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियम 1897, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व महाराष्ट्र कोव्हीड-19 उपाययोजना नियम 2020 मधील तरतूदीनुसार कारवाई करण्यात येईल, असे तहसीलदार हिंगोली यांनी आदेशाद्वारे कळविले आहे.

*****

 

No comments: