05 March, 2021

जागतिक महिला दिन साजरा करण्याचे आवाहन

 


            हिंगोली, दि. 05 (जिमाका) : शासकीय, निमशासकीय कार्यालये, मंडळे, महामंडळे, संस्था प्राधिकरण व त्यांच्या अखत्यारित असलेल्या सर्व संस्था व इतर कार्यालय (उदा. शाळा, विद्यालय, महाविद्यालये, आरोग्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामसभा इ. ) मध्ये दि. 8 मार्च, 2021 रोजी जागतिक महिला दिन साजरा करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

महिलांचे मनोधैर्य व स्त्रीत्वाच्या सन्मानार्थ जगभरात 08 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. महिलांप्रती जिव्हाळा, आदर व्यक्त करण्याबरोबरच सामाजिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रात दाद मिळावी यासाठी महिला दिन साजरा करण्याचा उद्देश आहे .

या महिला दिन कार्यक्रमास महिलांविषयी तळमळीने काम करणाऱ्या व्यक्तींना निमंत्रित करण्यात यावे. तसेच कार्यक्रमाच्या सुरुवातीस पुढीलप्रमाणे घेण्यात यावी.  ‘‘मी घरात, कार्यालयात, समाजात आपल्या आजूबाजूच्या परिसरात मुलांमुलींमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही. मुली व महिलांवर कोणत्याही प्रकारचा शारीरिक व मानसिक अत्याचार होत असल्यास त्याचा विरोध करीन. मुली व महिलांच्या प्रतिष्ठेस हानी पोहचेल असे कोणतेही कृत्य करणार नाही. त्यांच्या हक्कांचा व प्रतिष्ठेचा आदर ठेवीन.’’  

या कार्यक्रमात मुली व महिलांच्या विविध प्रश्नांच्या अनुषंगाने उदा. लिंगभेद संवेदनशिलता , कौंटुबिंक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण, मुलींची  छेडछाड व कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळास प्रतिबंध, मुलींचे घटते प्रमाण, हुंडा प्रतिबंध कायद्यासंदर्भात अंमलबजावणी या बाबीवर प्रबोधन करण्यात यावे. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.  

****

No comments: