01 March, 2021

संचारबंदी कालावधीत परिवहन महामंडळाच्या जिल्हांतर्गत होणाऱ्या वाहतुकीस व हिंगोली येथून इतर जिल्ह्यात सुटणाऱ्या बसेसवर बंदी

 


 

हिंगोली, (जिमाका) दि. 01 : राज्यात तसेच जिल्ह्यात कोविड-19 बाधित रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात 7 दिवससंचारबंदी लागू करण्यात आली आहे.  या संचारबंदीच्या कालावधीत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या हिंगोली जिल्हा अंतर्गत होणारी वाहतूक व हिंगोली येथून इतर जिल्ह्यात सुटणाऱ्या गाड्यांवर बंदी घालण्यात आली आहे. परंतु आंतर जिल्हा वाहतुकीसाठी या जिल्ह्यातून वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या (इतर जिल्ह्याच्या आगारातून येणाऱ्या वाहनांच्या) व्यवस्थापनासाठी जिल्ह्यातील सर्व बस स्थानक कार्यरत ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी संचारबंदीच्या काळात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या हिंगोली जिल्हा अंतर्गत होणारी वाहतूक व हिंगोली येथून इतर जिल्ह्यात सुटणाऱ्या गाड्यांवर बंदी घातली आहे. परंतु आंतरजिल्हा वाहतुकीसाठी या जिल्ह्यातून वाहतूक करणाऱ्या इतर जिल्ह्यांच्या वाहनांचे (इतर जिल्ह्यांच्या आगारातून येणाऱ्या वाहनांचे) व्यवस्थापन करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व बस स्थानक कार्यरत ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे. तसेच इतर जिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांमधील सर्व प्रवाशांच्या ॲंटिजेन (Antigen) तपासण्या अनिवार्य करण्यात आल्या आहेत. यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक हिंगोली तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. यांच्याशी समन्वय साधण्यात येणार आहे. या दरम्यान शासनस्तरावरुन कोरोनाच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या नियमांचे पालन करणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, प्रवाशांनी मास्कचा वापर करणे इत्यादी खबरदारी घेण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. बस स्थानक परिसराचे व वाहनांचे वेळोवेळी सॅनिटायझेशन करण्यात यावे, असेही आदेशात सूचित केले आहे.

या आदेशाची आवज्ञा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे मानण्यात येणार असून व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग प्रतिबंध कायदा 1897, महाराष्ट्र कोविड-19 उपाय योजना नियम 2020 अंतर्गत संबंधितावर कार्यवाही करण्यात येणार आहे.

वरीलप्रमाणे आदेशाची सक्तीने अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही पोलीस अधीक्षक हिंगोली, विभाग नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ, परभणी, आगार प्रमुख हिंगोली, वसमत, कळमनुरी व इतर संबंधित अधिकारी, कर्मचारी  यांची असणार असल्याचेही  आदेशात नमूद केले आहे.

*****

No comments: