16 November, 2021

 


आजादी का अमृत महोत्सवानिमित्त माळहिवरा येथे

जनजागृती कार्यक्रमात बालकांचे हक्क, अधिकार या विषयावर मार्गदर्शन

 

हिंगोली (जिमाका), दि. 16 : आजादी का अमृत महोत्सवानिमित्त तालुका  विधी सेवा समिती व जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने बालदिनानिमित्त दि. 14 नोव्हेंबर, 2021 रोजी हिंगोली तालुक्यामध्ये प्रत्येक गावात जनजागृती कार्यक्रम व शिबिरे घेण्यात आली होती. या कार्यक्रमाचा समारोप जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हिंगोली तालुक्यातील माळहिवरा या गावामध्ये करण्यात आला. या कार्यक्रमात बालकांचे हक्क, अधिकार, बालकांसाठी काम करणाऱ्या यंत्रणा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त बालदिनाचे औचित्य साधून दि. 14 नोव्हेंबर, 2021 ते दि. 21 नोव्हेंबर, 2021 या कालावधीत बालहक्क सप्ताह राबविण्यात येत आहे. त्यानिमित्त माळहिवरा गावातून प्रभातफेरी काढण्यात आली व नंतर बालकांचे हक्क, अधिकार, बालकांसाठी काम करणाऱ्या यंत्रणा  याबाबतची माहिती गावातील समाज बांधव व बालकांना देण्यात आली.

यामध्ये बालकांना सर्व प्रकारच्या जातीपाती, रंग, लिंग, भाषा, धर्म, राजकीय किंवा इतर मते, राष्ट्रीय पंरपरा किंवा सामजिक मुळ, संपत्ती, व्यंग किंवा इतर दर्जा यांच्या भेदभावापासून संरक्षण आहे. बालकांसंदर्भातील कृतीमध्ये बालकाच्या सर्वोत्तम हिताला सर्वाधिक प्राथमिकता दिली जाईल. बालकाला ओळख, नाव आणि राष्ट्रीयत्वाचा हक्क आहे. प्रत्येक बालकाला जन्मजात जीवन जगण्याचा आणि विकासाचा, शिक्षणाचा अधिकार तसेच सामाजिक सुरक्षेचा अधिकार आहे. बालकाला आराम करण्याचा आणि विश्रांती घेण्याचा तसेच खेळणे आणि मनोरंजक कृती मध्ये रमण्याचा अधिकार आहे. प्रत्येक बालकाचा योग्य त्या प्रमाणात शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक, मनोबल आणि सामाजिक विकास होईल, अशा प्रमाणे जीवनमानाचा अधिकार आहे. बालकाच्या दृष्टीकोनाला योग्य तो सन्मान द्यायला हवा. बालकाला त्याच्या  मनाविरुध्द त्याच्या पालकांपासून विभक्त करु नये. अपवादात्मक परिस्थितीत जेव्हा असे विभक्त करणे बालकाच्या उत्तम हितासाठी आवश्यक असते. आर्थिक शोषणापासून बालक संरक्षित आहेत. मुलांनी अंमली पदार्थ आणि मनावर विपरित परिणाम करणाऱ्या औषधांचे बेकायदेशीर सेवन करता कामा नये. बालकांना सर्व प्रकारच्या शारीरिक किंवा मानसिक हिंसा, इजा किंवा गैरवर्तन, दुर्लक्ष किंवा निष्काळजीत्व,  दुर्वतन किंवा शोषण, लैंगिक गैरवर्तनासकट सर्व बाबींपासून संरक्षणाचा अधिकार आहे. प्रत्येक मुलं सर्व प्रकारच्या लैंगिक शोषण आणि लैंगिक गैरवर्तनापासून संरक्षित आहे. कोणत्याही प्रकारे दुर्लक्ष, शोषण किंवा गैरवर्तणूक, यातना पिडीत मुलांचे शारीरिक आणि मानसिक हानी भरुन येण्यासाठी आणि त्यांचा समाजात समावेश होण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी योग्य प्रकारे केल्या गेल्या पाहिजेत. कायद्याचे उल्लंघन करतांना आढळलेल्या मुलांना योग्य त्या सन्मानाने आणि न्यायाने वर्तणूक मिळण्याचा अधिकार आहे. तसेच चाईल्ड लाईन 1098 या टोल फ्री क्रमांकाबद्द्ल उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी जिल्हा बाल संरक्षण कक्षातील जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे, क्षेत्र कार्यकर्ता अनिरुद्ध घनसावंत, हिंगोली चाईल्ड लाईन 1098 चे जिल्हा समन्वयक संदीप कोल्हे, स्वप्नील दिपके, हिंगोलीच्या सखी वन स्टॉप सेंटर केंद्राच्या समन्वयक अर्चना वानखेडे  , समुपदेशक दिनेश पाटील, कायदेविषयक सल्लागार ॲड.मंगल पाटील , केस वर्कर शिला रणवीर  आदी उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये बालहक्क आणि बाल न्याय अधिनियम व जिल्हा बाल संरक्षण कक्षाची माहिती पुस्तिका वाटप करण्यात आली.

*****

No comments: