25 November, 2021

 

मंगल कार्यालये, लॉन्समध्ये कार्यक्रम घेण्यापूर्वी

कोरोना लसीकरण घेतल्याचे प्रमाणपत्र तपासून घ्यावे

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आदेश

हिंगोली, (जिमाका) दि. 25 : शासन व जिल्हास्तरावरुन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच सर्व नागरिकांनी तात्काळ कोरोना लसीकरण करुन घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, परंतु आजतागायत जिल्ह्यातील नागरिकांचे लसीकरण झाल्याचे प्रमाण फार कमी आहे. यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालये, लॉन्स मध्ये कार्यक्रम, लग्न समारंभासाठी येणाऱ्या नागरिकांनी कोरोना लसीकरणाचे डोस घेतले असणे गरजेचे आहे. यासाठी जिल्ह्यातील मंगल कार्यालये, लॉन्स चालकांनी आपल्या मंगल कार्यालयात, लॉन्स मध्ये नागरिकांच्या कार्यक्रमाचे, समारंभाचे आयोजन करण्यापूर्वी (बुकिंग घेण्यापूर्वी) कार्यक्रमास हजर राहणाऱ्या सर्व नागरिकांनी कोरोना लस घेतल्याबाबतचे (किमान एक डोस) प्रमाणपत्र तपासून घेण्याची कार्यवाही करावी. तसेच लसीकरण न झालेल्या नागरिकांना तात्काळ जवळच्या लसीकरण केंद्रात जाऊन लसीकरण करुन घेण्याबाबत सूचित करावे. याप्रमाणे खात्री करुनच सदर कार्यक्रमाची, समारंभाची बुकींग घ्यावी. तसेच जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालये, लॉन्स चालकांनी आपल्या मंगल कार्यालय, लॉन्स ठिकाणी या आदेशानुसार लसीकरण बाबत सूचना फलक लावण्यात यावा, असे आदेश निर्गमित केले आहेत.

या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.हिंगोली, पोलीस अधीक्षक हिंगोली, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी न.प.-न.पं, सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी, सर्व मंगल कार्यालये, लॉन्स चालक यांची असेल.

आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा समूह हे भारतीय दंड संहिता 1860, साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहतील.

                                                            *******

No comments: