19 July, 2023

 

विशेष वृत्त  

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेतून जिल्ह्यातील 16 सिंचन तलावातील

8 लाख 57 हजार घन मीटर गाळ काढला

 

* जवळपास 900 हेक्टर क्षेत्रात गाळ पसरविला, 850 टीसीएम एवढ्या पाणीसाठ्यात होणार वाढ

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 19 : देशात महाराष्ट्र राज्य हे जास्त धरणे व जलसाठे असलेले राज्य असून या धरणांमध्ये दरवर्षी साठत चाललेल्या गाळामुळे धरणांच्या साठवण क्षमतेत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. या धरणांमध्ये साचलेला गाळ उपसा करुन शेतात पसरविल्यास धरणांची मुळ साठवण क्षमता पुनर्स्थापित होण्याबरोबरच शेतीच्या उत्पन्नात भरीव वाढ होणार आहे. ही बाब विचारात घेऊन राज्यातील धरणांमधील गाळ काढणे व तो शेतामध्ये वापरणे यासाठी राज्यातील धरणांमधील गाळ काढून तो शेतात पसरविण्यासाठी 'गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार' ही योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

यावर्षी अल निनोमुळे पाऊस सरासरीपेक्षा कमी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संपूर्ण राज्यात आणि विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण जिल्हे आणि महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविली जात आहे. या आधीच्या योजनेत शासनाकडून फक्त इंधन खर्च देण्यात येत होता. मशीन खर्च स्वयंसेवी संस्था तर गाळ पसरविण्यासाठीचा वाहतूक तसेच पसरविण्याचा खर्च शेतकरी स्वतः करीत होते. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजनेचे महत्व पाहता ती जोमाने राबविणे आवश्यक आहे. त्यामुळे यावेळेस शासनाकडून यंत्रसामुग्री आणि इंधन दोन्हीचा खर्च देण्यात येतो आहे.

यावर्षी हिंगोली जिल्ह्यात गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवारांतर्गत  लोकसहभागातून गाळ काढण्याची मोहिम राबविण्यात आली. यामध्ये हिंगोली तालुक्यातील वडद सिंचत तलाव, हदगाव सिंचन तलाव, हिरडी सिंचन तलाव, चोरजवळा सिंचन तलाव, पारोळा सिंचन तलाव, औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी सिंचन तलाव, शेंदूरसना सिंचन तलाव, पूरजळ सिंचन तलाव, सुरेगाव सिंचन तलाव, काकडधाबा सिंचन तलाव, वाळकी सिंचन तलाव, कळमनुरी तालुक्यातील देवधरी सिंचन तलाव, सुकळीवीर सिंचन तलाव व सेनगाव तालुक्यातील बाभुळगाव सिंचन तलाव, सवना सिंचन तलाव, पिंपरी सिंचन तलाव अशा एकूण 16 सिंचन तलावातून 8 लाख 57 हजार घनमीटर गाळ काढण्यात आलेला आहे. हा काढलेला गाळ जवळपास 900 हेक्टर क्षेत्रात पसरविण्यात आला आहे. यामुळे 850 स.घ.मी. (टीसीएम) एवढ्या पाणीसाठ्यात वाढ होणार आहे. 

हा उपक्रम शेतीसाठी आणि पाणीसाठ्यासाठी अत्यंत उपयोगाचा ठरणार असल्यामुळे शेतकऱ्यांचा या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

****

No comments: