31 July, 2023

 युरिया खत उपलब्ध असतांना विक्री करण्यास मनाई केल्यास

शेतकऱ्यांनी तालुकास्तरीय गुण नियंत्रण निरीक्षकाशी त्वरीत संपर्क साधावा

  • सोयाबीन पिकासाठी युरिया खताचा वापर टाळावा

 

हिंगोली (जिमाका), दि. 31 : खरीप हंगाम 2023 मध्ये हिंगोली जिल्ह्यात सर्वदूर पेरणीयोग्य पाऊस झाल्याने पीक पेरणी जवळपास पूर्ण झाली आहे. सद्यस्थितीत पिकांची कायीक वाढ जोमाने होत असून पाऊस उघडल्यामुळे वापसा होताच अंतरमशागतीच्या कामांना वेग आला आहे. तसेच शेतकरी पिकांना खतांची मात्रा देखील देत आहेत. त्यामुळे बाजारात युरिया खताची मागणी वाढली आहे. सद्यस्थितीत बाजारात विविध ग्रेडच्या खतांची आवश्यकतेनुसार उपलब्धता असून शेतकऱ्यांनी सोयाबीन, मूग, उडीद इत्यादी पिकांसाठी पेरणीपश्चात युरिया खताचा वापर टाळावा, अशी शिफारस कृषि विद्यापीठाने केलेली आहे. युरियाचा वापर केल्याने पिकांची कायीक वाढ आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात होते. पाने लुसलुशीत होतात. त्यामुळे पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. पर्यायाने किटकनाशकांची फवारणी करणे अनिवार्य होते. त्यामुळे उत्पादनावरील खर्च वाढतो, पर्यायाने उत्पादन व नफा या दोन्हीमध्ये घट होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकासाठी युरिया खताचा वापर टाळावा, असे आवाहन केले आहे.

मागील 2-3 दिवसांत IFFCO कंपनीचा 415 मेट्रिक टन व RCF कंपनीचा 432.765 मेट्रिक टन युरियाचा पुरवठा हिंगोली जिल्ह्यात झाला आहे. या व्यतिरिक्त युरियाचा संरक्षित केलेला 600.16 मे.टन साठा विक्रीसाठी खुला केलेला आहे. तसेच येत्या 2-3 दिवसांत हिंगोली जिल्ह्यामध्ये RCF कंपनीची पूर्ण रैंक 2600 मे.टन व चंबल फर्टीलायझर्स कंपनीचे 415 मे.टन असे एकूण 2900 मे.टन युरियाचा हिंगोली जिल्ह्यामध्ये पुरवठा होणार आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी सद्यस्थितीत जेवढा युरिया आवश्यक आहे. तेवढाच युरिया खरेदी करावा. जेणेकरुन उपलब्ध युरिया सर्व शेतकऱ्यांना पुरेसा होईल, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.

खरीप हंगाम 2023 मध्ये हिंगोली जिल्ह्याची युरिया खताची मागणी, मंजुर आवंटन, आजपर्यंत झालेला पुरवठा, विक्री व शिल्लक (मे.टन) दर्शविणारा तपशील खालील प्रमाणे आहे.

हिंगोली जिल्ह्यासाठी खरीप 2023 मध्ये 22057 मेट्रिक टन युरिया खताची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी 16151 मेट्रिक टन आवंटन मंजूर झाले आहे. आतापर्यंत 14620.17 मेट्रिक टनचा पुरवठा करण्यात आला आहे. यापैकी 11625 मेट्रिक टन युरिया खताची विक्री करण्यात आली असून 2995 मेट्रिक टन युरिया शिल्लक आहे. शिल्लक युरिया सर्व शेतकऱ्यांना आवश्यक त्या प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी किरकोळ खत विक्रेत्यांनी सद्यस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यकतेपेक्षा जास्त युरियाची विक्री करु नये. तसेच MRP पेक्षा जादा दराने आणि युरिया सोबत इतर अनावश्यक कृषि निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करु नये. तसे निदर्शनास आल्यास संबंधित कृषि निविष्ठा विक्रेत्याविरुध्द परवाना निलंबन / रद्द अशा स्वरुपाची कठोर कारवाई करण्यात येईल.

किरकोळ विक्रेत्याकडे युरिया खत उपलब्ध असतांना शेतकऱ्यांना विक्री करण्यास मनाई केल्यास अथवा जादा दर आकारत असल्यास किंवा इतर कृषि निविष्ठांची सक्ती करीत असल्यास शेतकऱ्यांनी खाली नमूद तालुकास्तरीय गुण नियंत्रण निरीक्षकाशी त्वरीत संपर्क साधावा.

औंढा नागनाथ तालुक्यासाठी गुण नियंत्रण निरीक्षक एस. के. शिवणकर असून त्यांचा भ्रमणध्वनी क्र. 8087889299 असा आहे. वसमत तालुक्यासाठी आर. एम. गवळी असून त्यांचा भ्रमणध्वनी क्र. 7038473903 असा आहे. हिंगोली तालुक्यासाठी आर. एन. पुंडगे हे असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9405323058 असा आहे. कळमनुरी तालुक्यासाठी एस. ए. ताडेवाड हे असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9028905357 असा आहे. सेनगाव तालुक्यासाठी पी. पी. गाडे असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9158121718 असा आहे. 

***** 

No comments: