15 July, 2023

 *भूकंप आपत्तीत जिवित व वित्तहानी रोखण्यासाठी खबरदारी घ्यावी* 

                 *जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन*    


*इच्छुक स्वयंसेवकांनी भूकंप मित्र प्रशिक्षणासाठी तहसील कार्यालयात नोंदणी करावी*       


*हिंगोली (जिमाका), दि. १५ :* जिल्ह्यातील वसमत, औंढा ना., कळमनुरी, हिंगोली तालुक्यातील काही गावांमध्ये मागील कालावधी पासून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत. तसेच भूगर्भातून आवाज येत आहे. सन १९९३ ला किल्लारी, लातूर येथे झालेल्या भूकंपाचा विचार करता घराच्या पत्र्याच्या छतावरील दगडामुळे मोठ्या प्रमाणात जिवितहानी झाली होती. याचा विचार करता खबरदारी म्हणून हिंगोली जिल्ह्यातील सर्व गावातील नागरिकांनी ज्यांच्या घराची छते ही पत्र्याची आहेत व त्यावर दगड आहेत अशा नागरिकांनी पत्र्यावर असलेले दगड तात्काळ काढून घेणे व तेथे तारेच्या सहायाने पत्र्याला आधार देणे आवश्यक आहे.

तसेच उपाययोजना म्हणून भूकंपाचे धक्के जाणवत असलेल्या प्रत्येक गावातील १० स्वयंसेवकांना (वय १७ ते ४०) “भूकंप मित्र” म्हणून प्रशिक्षण दिले जाणार आहे. करिता सामाजिक कामाच्या भावनेतून इच्छुक असलेल्या स्वयंसेवकांनी आपल्या संबंधित तहसील कार्यालयात जाऊन आपली नावनोंदणी करुन घ्यावी. तसेच नागरिकांनी खालीलप्रमाणे खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र

 पापळकर यांनी

 केले आहे.

*भूकंप आपत्तीत जिवित व वित्तहानी रोखण्यासाठी घ्यावयाची दक्षता.*


*भूकंपापूर्वी घ्यावयाची दक्षता :*

इमारतीचे बांधकाम हे भूकंप रोधक निकषाप्रमाणे असावे/करावे. घराच्या छताला अथवा घराच्या पायाला भेगा पडल्या असल्यास त्वरित दुरुस्त करुन घ्याव्यात. सामान ठेवण्यासाठी केलेली फळी भिंतीला घट्ट/जखडून बांधावीत. मोठ्या आणि जड वस्तू खालच्या बाजूस/खालच्या फळीवर अथवा कप्प्यात ठेवाव्यात.कंदील, चिमणी, दिवा यांसारख्या वस्तूंमुळे भूकंपानंतर आग लागण्याची शक्यता असते. त्यामुळे त्या वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात.पंखा, बल्ब व इतर विद्युत उपकरणे भुकंपादरम्यान इजा होणार नाही अशा जागी सुरक्षितरित्या बसवलेले असावेत.आपल्या घरात सदोष विद्युत तारा व गळणारा स्वयंपाक गॅस असल्यास त्वरित दुरुस्त करुन घ्यावे, तसेच झोपतेवेळी गॅस सिलिंडर बंद करुन ठेवावा. घरामधील व घराबाहेरील सुरक्षित ठिकाणे हुडकून ठेवावेत. उदा.मजबूत टेबल/पलंग, मजबूत खांब, दाराची चौकट-मोकळे मैदान.

अत्यावश्यक सेवांचे दूरध्वनी क्रमांक सदैव जवळ बाळगावेत. 

(उदा.तहसील, दवाखाना, पोलीस स्टेशन, अग्निशामक दल इत्यादी). महत्वाची कागदपत्रे, मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवावेत. कुटुंबातील प्रत्येक सदस्याने स्वतःच्या आरोग्य विषयक माहितीपत्रक जसे आजार, व्याधी, औषधाची अलर्जी, रक्तगट इत्यादी सदैव सोबत बाळगावीत.

आपत्ती दरम्यान घराबाहेर पडण्यासाठीच्या मार्गात अडथळे असू नयेत.  

(उदा. पोते, कुंडी, दुचाकी वाहन व इतर मोठ्या वस्तू.)


*भूकंपादरम्यान काय कराल ?* 

१) जर तुम्ही भूकंपाचा धक्का बसत असताना इमारतीच्या/ घराच्या आत असाल तर शक्य असल्यास मोकळ्या जागेकडे जावे अथवा घरातील सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. (उदा.टेबलाखाली, बिमखाली, दरवाजाच्या चौकटीखाली, कॉलमजवळ).

लिफ्टचा वापर करु नका, दाराजवळ अथवा प्रवेशद्वाराजवळ गर्दी करु नका.

स्वतः शांत राहा व इतरांना शांत राहण्यास सांगा.


२) जर तुम्ही रस्त्यावर असाल तर पटकन मोकळ्या जागेत जा, घाई-गडबड, दंगा करु नका व अफवा पसरवू नका. 

उंच, जुन्या आणि सलग असणाऱ्या इमारतीपासून, भिंती, विजेच्या तारांपासून लांब थांबा.


३) जर तुम्ही गाडी चालवत असाल तर जुन्या इमारती, भिंती, इलेक्ट्रिक वायर, केबल वायर, उंचवटा यापासून आपले वाहन लांब नेऊन थांबवा.


*भूकंपानंतर काय कराल ?*

१) रेडीओ/टी.व्ही.वरुन मिळणाऱ्या आपत्ती विषयक सूचनांचे पालन करा .

२) मुख्य धक्यानंतर छोटे धक्के बसू शकतात. अशावेळी घरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा.

३) पाणी, गॅस, वीज कनेक्शन सुरु असल्यास बंद ठेवा.

४) धुम्रपान करु नका. काही ओढू नका आणि वीज बटन लगेचच चालू करु नका कारण अशावेळी गॅस गळती अथवा शॉटसर्किट होण्याची शक्यता असते.

५) विजेच्या तारांना हाथ लावू नका.

६) दूषित उघड्यावरचे पाणी पिणे टाळा, जेणे करुन रोगांना प्रतिबंध होईल. उपलब्ध स्वच्छ पाणी प्या.

७) नुकसान झालेल्या इमारतीजवळ जाऊ नका अथवा परत राहण्यासाठी त्याचा वापर करु नका.

८) रस्ते मोकळे ठेवा, जेणे करुन मदत कार्यातील वाहनांना ये-जा करता येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

 ******



No comments: