04 July, 2023

 

महिला व बालविकास विभागामार्फत

राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमास सुरुवात

 


 

                हिंगोली (जिमाका), दि. 04 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यात 3 लाख 50 हजार शाळकरी, महाविद्यालयीन युवतींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महिला व बालविकास विभाग आणि राज्यातील सर्व विद्यापीठे व स्वयंसेवी संस्थेच्या सहाय्याने गुरु पोर्णिमेचे औचित्य साधून दि. 3 जुलै ते दि. 15 जुलै, 2023 दरम्यान दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करण्यात येणार असल्याची माहिती  महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. त्याअनुषंगाने महिला व मुलींवर होणारे क्रूर हिंसाचार, अत्याचार, हत्या यावर आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून महिला व बालविकास विभागामार्फत राज्यात राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण कार्यक्रम राबविण्यास सुरुवात झाली आहे.

            येथील महिला व बालविकास विभागामार्फत सरजूदेवी भिकूलाल भारुका आर्य कन्या विद्यालयात शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थिंनीसाठी राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सी. के. देशपांडे हे होते. या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून सायबर सेलचे पोलीस अंमलदार दत्तात्रय नागरे, थोरात तसेच ॲड. वैशाली देशमुख यांची उपस्थिती होती.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. आर. मगर यांनी केले. सायबर सेलचे पोलीस अमलदार दत्तात्रय नागरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सोशल मिडियाचा गैरवापर व सायबर क्राईम याविषयी मार्गदर्शन करताना फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरवर आपली व्यक्तीगत माहिती व फोटो अपलोड करु नये. कारण एखादी व्यक्ती या माहितीच्या आधारे आपले अकाऊंट हॅक करुन आपल्याला ब्लॅकमेल करु शकते, आपला गैरफायदा घेऊ शकते. त्याअनुषंगाने आपण आपली काळजी घेतली पाहिजे, अशी माहिती दिली. वैशाली देशमुख यांनी महिला व मुलींवरील हिंसाचार-संकल्पना व सद्यस्थिती या विषयावर उपस्थित विद्यार्थीनींना सखोल मार्गदर्शन केले.

            कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडित यांनी केले. शेवटी शाळेचे मुख्याध्यापक सी. के. देशंपाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, तालुका संरक्षण अधिकारी नितीन मकासरे, समुपदेशक सचिन पठाडे, सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे, शाळेतील शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.  

*****

No comments: