31 July, 2023

 

महसूल सप्ताहानिमित्त विविध लोकाभिमूख उपक्रमांचे आयोजन

नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 31 : महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती नागरिकांना व्हावी व यात लाभधारकांचा सकारात्मक सहभाग वाढावा. तसेच नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी, शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दींगत व्हावा, यासाठी विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने यावर्षी 1 ऑगस्ट महसूल दिनापासून ते दि. 7 ऑगस्ट पर्यंत महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय, हिंगोली येथे मंगळवार, दि. 1 ऑगस्ट 2023 रोजी दरवर्षीप्रमाणे महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताहाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. महसूल दिनाचे औचित्य साधून दि. 1 ऑगस्ट रोजी  कार्यक्रमाचा शुभारंभ, 2 ऑगस्ट रोजी युवा संवाद, 3 ऑगस्ट रोजी एक हात मदतीचा, 4 ऑगस्ट रोजी जनसंवाद, 5 ऑगस्ट रोजी सैनिक हो तुमच्यासाठी, 6 ऑगस्ट रोजी महसुली अधिकारी कर्मचारी  संवाद तसेच दि. 7 ऑगस्ट रोजी महसूल सप्ताहाच्या सांगता समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विशेष मोहिम, कार्यक्रम, उपक्रम, शिबीरे, महसूल अदालत यांचे आयोजन करण्यात येणार आहे.          

याच धरतीवर हिंगोली उपविभागात दि. 2 ऑगस्ट, 2023 रोजी हिंगोली तहसील कार्यालयात महसूल विभागामार्फत देण्यात येणारे विविध दाखले आणि प्रमाणपत्रे, सेवाबाबत तसेच पुढीलप्रमाणे नागरिकांच्या अडचणी व तक्रारीचा निपटारा करण्यासाठी समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी या शिबिरास उपस्थित राहून खालील योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

तहसीलदार व नगर भूमापन अधिकारी यांच्याकडील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 155 खाली दुरुस्तीचे अहवाल 1 मध्ये असणारे सातबारा बाबत प्रकरणांचा निपटारा, महाराजस्व अभियानातील गाव तिथे स्मशानभूमी/दफनभूमी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष मोहिम, दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी विविध संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, वय, वर्ष व अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र इत्यादी शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक असणारे दाखले/प्रमाणपत्राचे वितरण, अनाथ मुले-मुली म्हणजे आई-वडील मृत्युमुखी पडल्यामुळे अनाथ झालेली व कोणत्याही शासकीय, निमशासकीय , शासन अनुदानित अनाथ आश्रमात न राहणारे मुले-मुली यांना लाभ देण्याच्या अनुषंगाने अनाथ असल्याचे तलाठी व ग्रामसेवक यांचे व संबंधित महिला व बाल विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने विशेष मोहिम, पूर्व मान्सून व मान्सून कालावधीत अवकाळी पाऊस/अतिवृष्टी/पूर यामुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या घराचे , शेतीचे , फळबागाचे, जनावरांचे झालेल्या नुकसानीबाबत आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार बाधित नागरिकांना देय असलेल्या सोयीसुविधा, नुकसान भरपाई पात्र नागरिकांना लाभ देणे, तसेच खरीप हंगामामध्ये घेण्यात येणाऱ्या पिकांचा विमा उतरविण्यासाठी अर्जदारांच्या मागणीनुसार सातबारा, आठ अ असे तलाठी स्तरावरुन देय असलेले विविध दाखले, नैसर्गिक आपत्ती अंतर्गत पुनर्वसनाच्या अनुषंगाने महसूल कार्यालयाशी संबंधित अडचणीचे निराकरण, महसूल अदालत, प्रलंबित फेरफार, पाणंद रस्ते मोकळे करणे, रस्त्याच्या तक्रारीचे निराकरण करणे, सलोखा योजना, गावा-गावातील व शेतातील रस्त्याबाबत तलाठी, मंडळ अधिकारी स्तरावर प्रलंबित असलेले अर्ज निकाली काढण्यासाठी शिबिराचे आयोजन, जमिनीविषयक आवश्यक असणाऱ्या नोंदी अद्यावत करण्याबाबत प्राप्त अर्जावर तात्काळ कार्यवाही करुन अर्ज निकाली काढणे, राष्ट्रीय सुरक्षिततेच्या कामी सीमावर्ती भागामध्ये व सुरक्षिततेच्या दृष्टीने अन्य संवेदनशील भागामध्ये तैनात असणारे संरक्षण दलातील अधिकारी, सैनिक यांना व त्यांच्या कुटुंबियांना आवश्यक असणारे , महसूल कार्यालयाकडून निर्गमित होणारे विविध दाखले, प्रमाणपत्रे निर्गमित करणे, संरक्षण दलात कार्यरत असताना शहीद झालेल्या कर्मचाऱ्यांना प्रलंबित असलेल्या अर्जावर कार्यवाही घरासाठी, शेतीसाठी जमीन वाटपाबाबत प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा निपटारा, महसूल संवर्गातील जिल्ह्यात कार्यरत असलेल्या, सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी, कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित सेवाविषयक बाबी निकाली काढणे, ज्येष्ठ नागरिक प्रकरणे, पुरवठा विषयक विविध लाभ व तक्रारींचे निराकरण, विविध अर्थसहाय्य योजनांचा पात्र लाभार्थी यांना लाभ देणे (संगायो/इंगायो/श्रावणबाळ योजना). मतदार नोंदणी विशेष उपक्रम, भूसंपादन विषयक प्रकरणे, तक्रारी निकाली काढणे, वन हक्क प्रकरणांच्या तक्रारी निकाली काढणे याप्रमाणे महसूल विभागामार्फत देण्यात येणारे विविध दाखले आणि प्रमाणपत्रे, सेवाबाबत तसेच नागरिकांच्या अडीअडचणी व तक्रारीचा निपटारा करण्यासाठी दि. 2 ऑगस्ट, 2023 रोजी सकाळी 10.30 पासून समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हिंगोली तालुक्यातील या शिबीरास नागरिकांनी उपस्थित राहून त्यांची कामे, लाभ, तक्रारीचे निराकरण करुन घेण्याचे आवाहन उमाकांत पारधी, उपविभागीय अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

******

No comments: