हिंगोली, दि. १९ (जिमाका) : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या आदेशान्वये आज १९ ऑक्टोबर २०२६ रोजी वसमत तालुक्यातील माळवटा एमआयडीसी येथे कार्यरत असलेल्या बायोकोल निर्मिती करणाऱ्या कारखान्यांची संयुक्त तपासणी करण्यात आली.
या तपासणी दरम्यान बायोकोल निर्मितीसाठी सोयाबीन व इतर पिकांचे अवशेष (भुसा/कडबा) याचा औद्योगिक वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले. पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करणे आणि शासनाच्या आदेशानुसार पिकांच्या अवशेषांचा योग्य वापर होणे आवश्यक असल्याने, संबंधित पथकाने तेथे कार्यरत असलेल्या एकूण ११ बायोकोल कारखान्यांना बंद करण्याचे आदेश दिले.
पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत सदर कारखाने पुन्हा सुरू करू नयेत, तसेच सोयाबीन व इतर पिकांचे अवशेष औद्योगिक कारणांसाठी वाहतूक करू नयेत, असे स्पष्ट निर्देश कारखानदार व वाहनचालकांना देण्यात आले.
या कारवाईतील पथकात वसमत तहसीलदार सारंग चव्हाण, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसायचे सहाय्यक आयुक्त डॉ. अजय मुस्तरे, मंडळ अधिकारी वसमत श्री. भद्रे व संबंधित महसूल कर्मचारी यांचा समावेश होता.
00000
No comments:
Post a Comment