चारा जिल्ह्याबाहेर वाहून नेण्यास बंदी ; ऊसाचा ३० टक्के हिस्सा चाऱ्यासाठी राखीव ठेवण्याचे निर्देश
हिंगोली, दि. 19 (जिमाका) : जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी भविष्यात चारा टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. हिंगोली जिल्ह्यात लहान-मोठे मिळून एकूण ३ लाख ९३ हजार ५६१ पशुधन असून, या पशुधनासाठी दररोज अंदाजे १ हजार ५४५ मेट्रिक टन चाऱ्याची आवश्यकता आहे. सध्या जिल्ह्यातील विविध स्रोतांमधून उपलब्ध असलेला चारा साठा पुढील चार महिने पुरेल, अशी माहिती पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ. एस. टी. बुचाले यांनी दिली. भविष्यातील संभाव्य चारा टंचाई लक्षात घेऊन चारा उत्पादन वाढविणे, उपलब्ध चाऱ्याचे संरक्षण करणे आणि पर्यायी चारा स्रोत विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे.
चारा जिल्ह्याबाहेर वाहून नेण्यास बंदी
जिल्ह्यातील पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध राहावा, यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील चारा जिल्ह्याबाहेर वाहून नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या संचालकांना ऊसतोडणी यंत्राद्वारे न करता मजुरांमार्फत करण्याचे आणि एकूण ऊस उत्पादनापैकी ३० टक्के ऊस चाऱ्यासाठी राखून ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे ऊसाचे वाढे पशुधनासाठी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
धरणांच्या गाळपेर जमिनीवर चारा पिकांच्या लागवडीस प्रोत्साहन
जिल्ह्यातील जलसंपदा, लघुसिंचन व लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारितील पाटबंधारे प्रकल्पांमधील गाळपेर जमिनी चारा पिकांच्या लागवडीसाठी उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित विभागांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. तसेच वन विभागामार्फत उपलब्ध होऊ शकणाऱ्या चाऱ्याबाबतही विभागीय वन अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले आहे. जिल्ह्यातील विविध धरणांमधील उपलब्ध गाळपेर क्षेत्रात चारा पिकांची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे.
चारा बियाणे वाटपासाठी ५० लाख रुपये खर्च
पशुसंवर्धन विभागामार्फत खरीप हंगामात चारा पिकांसाठी ५० लाख रुपये किमतीचे वैरण बियाणे वाटप करण्यात आले आहे. आगामी रब्बी हंगामासाठी चारा बियाण्यांची उपलब्धता वाढविण्याच्या दृष्टीने दोन कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी नोंदविण्यात आली आहे. तसेच विदर्भ-मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत चारा बियाण्यांचे वाटप करण्यात आले आहे. पशुपालकांना आवश्यक चारा बियाणे तसेच अनुदानावर कडबा कुट्टी यंत्र मिळविण्यासाठी vmddp.com या संकेतस्थळावर नोंदणी करण्यास प्रोत्साहित करण्यात येत आहे.
पीक अवशेषांचा चारा म्हणून वापर करण्याचे आवाहन
शेतकऱ्यांनी पिकांचे अवशेष न जाळता त्यांचा पर्यायी चारा म्हणून वापर करावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यात गावोगावी ‘चारा साक्षरता अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पिकांच्या अवशेषांवर योग्य प्रक्रिया करून त्यांचे सकस पशुखाद्यात रूपांतर कसे करावे, याचे प्रशिक्षण पशुपालकांना दिले जात आहे. तसेच दुष्काळी परिस्थितीत उपलब्ध चाऱ्याचे नियोजन, साठवणूक आणि प्रभावी वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.
मुरघास व टीएमआर प्रकल्पांमुळे चारा उपलब्धतेला मदत
राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत हिंगोली जिल्ह्यात दोन मुरघास प्रकल्प आणि एक (टीएमआर) प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. या प्रकल्पांमुळे चाऱ्याची साठवणूक, प्रक्रिया आणि पशुधनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे.
संभाव्य दुष्काळी परिस्थितीत पशुधनाचे संगोपन आणि चारा उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत विविध स्तरांवर नियोजन करण्यात येत आहे. शेतकरी व पशुपालकांनी उपलब्ध चाऱ्याचा काटकसरीने वापर करावा, पीक अवशेषांचा योग्य उपयोग करावा आणि चारा टंचाई निवारणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन विभागामार्फत करण्यात येत आहे.
00000
No comments:
Post a Comment