▶️ खासगी आस्थापना, उद्योग व कार्यालयांना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे आवाहन
हिंगोली, दि. १९ (जिमाका) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या ५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी खासगी आस्थापना, उद्योग, संस्था व कार्यालयांमध्ये कार्यरत मतदारांना मतदानाच्या दिवशी चार तासांची विशेष सवलत द्यावी, असे आवाहन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
मतदानाची वेळ सकाळी ८ ते सायंकाळी ४ अशी आहे. लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ मधील कलम १३५ब नुसार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टीची तरतूद आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या २३ जून २०११ रोजीच्या शासन निर्णयानुसार पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदार असलेल्या व्यक्तींना विशेष नैमित्तिक रजा देण्यात आली आहे. मात्र, ही सवलत खासगी आस्थापनांमध्ये कार्यरत मतदारांना लागू होत नाही.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी, यांच्या १६ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या पत्रानुसार खासगी आस्थापनांमध्ये कार्यरत मतदारांना यापूर्वीच्या दोन तासांऐवजी किमान चार तासांची विशेष सवलत देण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.
त्यानुसार जिल्ह्यातील सर्व संबंधित खासगी आस्थापना, उद्योग, संस्था व कार्यालयांनी त्यांच्या आस्थापनांतील पात्र मतदारांना मतदानासाठी आवश्यक वेळ उपलब्ध करून द्यावा. कोणताही मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहणार नाही, यासाठी संबंधितांनी आवश्यक कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी गुप्ता यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment