प्रत्येक ग्रामपंचायतीला किमान १०० जलतारांची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट; दर बुधवारी आढावा बैठकीचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
सेनगाव, दि. १९ (जिमाका) : तालुक्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई व चारा टंचाई उद्भवू नये, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने नियोजन करून आवश्यक उपाययोजनांना गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.
सेनगाव येथे ग्रामपंचायत अधिकारी व तलाठी यांच्या संयुक्त आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी तालुक्यातील ग्रामपंचायतीनिहाय पाणीटंचाई, चारा उपलब्धता आणि दुष्काळी परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी केशव गड्डापोड, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, पाणीपुरवठा व बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल सोळंके, तहसीलदार सखाराम मांडवगडे, गटविकास अधिकारी सुरेश कांबळे, सहाय्यक गटविकास अधिकारी ऋषिकेश होळकर, उपअभियंता शिंदे, तालुका कृषी अधिकारी नित्यानंद काळे, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, विविध विभागांचे प्रमुख, विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, महसूल कर्मचारी व कृषी सहाय्यक उपस्थित होते.
प्रत्येक ग्रामपंचायतीत किमान १०० जलतारांची निर्मिती करा
तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने किमान १०० जलतारांची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे. जलसंवर्धनाच्या कामांना प्राधान्य देऊन पावसाचे पाणी जमिनीत जिरविण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. तसेच कुरण लागवडीला प्रोत्साहन देऊन पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता वाढवावी. जिल्ह्याबाहेर चारा वाहून नेण्यास असलेली बंदी प्रभावीपणे लागू करावी, तसेच स्थानिक तलावांतील पाण्याचा अनधिकृत उपसा रोखण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.
ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणीटंचाई निवारणाचे नियोजन
आगामी ऑगस्ट २०२७ पर्यंत तालुक्यात पाणीटंचाई उद्भवू नये, या दृष्टीने उपलब्ध जलसाठ्यांचे संरक्षण, जलसंवर्धनाची कामे आणि पाणीपुरवठ्याच्या उपाययोजनांचे दीर्घकालीन नियोजन करावे. संभाव्य टंचाईग्रस्त गावांची स्थिती लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजना वेळेत पूर्ण कराव्यात. गावपातळीवर पाण्याच्या उपलब्धतेवर नियमित लक्ष ठेवून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
दर बुधवारी आढावा बैठक; गैरहजरांवर कारवाई
ग्रामस्तरावरील सर्व संबंधित अधिकाऱ्यांची दर बुधवारी बैठक घेऊन गावातील दुष्काळी परिस्थितीचा नियमित आढावा घ्यावा आणि त्याचा अहवाल सादर करावा. या बैठकीस कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी गैरहजर राहिल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिला. पाणीटंचाई व चारा टंचाईसंदर्भातील समस्यांचे तातडीने निराकरण करून उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी सांगितले.
जलसंवर्धनाच्या कामांना प्राधान्य द्या
‘विकसित भारत ग्रामीण रोजगार व उपजीविका मिशन’अंतर्गत जलतारा निर्मिती व जलसंवर्धनाची कामे प्राधान्याने प्रस्तावित करावीत. गावांमध्ये कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होणार नाही, याची सर्व यंत्रणांनी विशेष दक्षता घ्यावी. उपलब्ध पाण्याचा योग्य वापर, जलस्रोतांचे संरक्षण आणि पाणीटंचाई निवारणासाठी विभागांमध्ये समन्वय ठेवून कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दिल्या.
No comments:
Post a Comment