19 October, 2026

पदवीधर मतदारसंघासाठी शुक्रवारी मतदान-जिल्हाधिकारी राहुल गुप्ता



पसंतीक्रम व्यवस्थित नोंदवून घेण्याचे आवाहन
 जांभळ्या स्केच पेनचाच वापर करा
 चुकीच्या पद्धतीने मतदान केल्यास मतपत्रिका ठरणार अवैध

हिंगोली, दि. १९ (जिमाका) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत मतपत्रिकेवर उमेदवारांच्या नावासमोर पसंतीक्रम नोंदवून मतदान करायचे आहे. नेहमीच्या निवडणुकांपेक्षा या निवडणुकीत मतदान करण्याची वेगळी पद्धत असल्याने मतदारांनी व्यवस्थित नियम समजून घेत मतदान करावे, असे आवाहन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

असे नोंदवा पसंतीक्रम
मतदानासाठी निवडणूक अधिकाऱ्याने दिलेल्या जांभळ्या (व्हायलेट) रंगाच्या स्केच पेनचाच वापर करावा. अन्य पेन, पेन्सिल, बॉलपॉईंट पेन किंवा इतर लेखनसाधनांचा वापर करू नये.
प्रथम पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील पसंतीक्रमाच्या रकान्यात ‘१’ हा अंक लिहावा. हा अंक केवळ एकाच उमेदवाराच्या नावासमोर नोंदवावा. त्यानंतर इच्छेनुसार इतर उमेदवारांना दुसरी, तिसरी व पुढील पसंती देता येते. त्यासाठी संबंधित उमेदवारांच्या नावासमोर ‘२’, ‘३’, ‘४’ असे अंक लिहावेत. सर्व उमेदवारांना पसंतीक्रम देणे बंधनकारक नाही; मात्र पहिली पसंती नोंदविणे आवश्यक आहे.
पसंतीक्रमाचे आकडे भारतीय अंकांच्या आंतरराष्ट्रीय रूपात (1, 2, 3), रोमन रूपात (I, II, III) किंवा देवनागरी रूपात (१, २, ३) नोंदविता येतात. तसेच भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये मान्यता दिलेल्या कोणत्याही एका भारतीय भाषेत वापरल्या जाणाऱ्या अंकांच्या रूपातही पसंतीक्रम चिन्हांकित करता येतात. उमेदवाराच्या नावासमोर ‘√’ किंवा ‘X’ अशी खूण करू नये. मतपत्रिकेवर स्वतःचे नाव, आद्याक्षरे, स्वाक्षरी, अंगठ्याचा ठसा किंवा मतदाराची ओळख पटेल असे कोणतेही लेखन करू नये.

या चुका टाळा
पहिल्या पसंतीचा ‘१’ हा अंक न लिहिणे, तो एकापेक्षा अधिक उमेदवारांच्या नावासमोर लिहिणे किंवा तो कोणत्या उमेदवारासाठी नोंदविला आहे, याबाबत संदिग्धता निर्माण होणे, अशा कारणांमुळे मतपत्रिका अवैध ठरू शकते. एकाच उमेदवाराच्या नावासमोर ‘१’ आणि त्यासोबत इतर पसंतीक्रम नोंदविणे, निर्धारित जांभळ्या स्केच पेनऐवजी अन्य साधन वापरणेही टाळावे. पसंती क्रम केवळ अंकात लिहावे शब्दात लिहू नये. मतदारांनी मतदानापूर्वी पसंतीक्रम नोंदविण्याची पद्धत समजून घ्यावी. मतपत्रिका वैध ठरण्यासाठी सर्व नियमांचे पालन करावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी गुप्ता यांनी केले आहे.

No comments: