19 October, 2026

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जास्त पाणी लागणाऱ्या पिकांची लागवड टाळा

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाचे आवाहन ; कमी पाण्यात येणाऱ्या पिकांना प्राधान्य द्या
हिंगोली, दि. 19 (जिमाका) : जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थिती, पावसाचे अनिश्चित प्रमाण आणि भूजल पातळीत होणारी संभाव्य घट लक्षात घेता, शेतकऱ्यांनी आगामी हंगामात पीक निवडताना उपलब्ध पाण्याचा विचार करून नियोजन करावे. पाण्याची उपलब्धता मर्यादित असलेल्या भागांत ऊस, केळी, उन्हाळी भुईमूग यांसह जास्त पाणी लागणाऱ्या पिकांची लागवड टाळावी आणि कमी पाण्यात येणाऱ्या पर्यायी पिकांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. 

कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची निवड करा

जिल्ह्यात संभाव्य दुष्काळी परिस्थितीमुळे उपलब्ध जलसाठ्यांचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. जास्त पाणी लागणाऱ्या पिकांना पुरेसे पाणी उपलब्ध न झाल्यास त्यांच्या वाढीवर आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्थानिक हवामान, जमिनीचा प्रकार, जमिनीतील ओलावा आणि उपलब्ध सिंचन सुविधा यांचा विचार करूनच पेरणी व लागवडीचे नियोजन करावे.

परिस्थितीनुसार रब्बी ज्वारी, मका, सुदान गवत, सुगरग्रेझ, हरभरा, तीळ तसेच योग्य कडधान्ये व तेलबिया या कमी पाण्यात येणाऱ्या पर्यायी पिकांचा विचार करावा. पीक निवड करताना कृषी विद्यापीठांच्या स्थानिक शिफारशींचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पाणी बचत करणाऱ्या सिंचन पद्धतींचा वापर करा

शेतकऱ्यांनी उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने व नियोजनबद्ध वापर करावा. पाण्याची बचत करण्यासाठी ठिबक व तुषार सिंचनासारख्या आधुनिक सिंचन पद्धतींचा अवलंब करावा. पेरणीपूर्वी स्थानिक पर्जन्यमानाचा अंदाज, जमिनीतील ओलावा आणि उपलब्ध सिंचन सुविधांचा विचार करावा. पिकांच्या पाण्याच्या गरजेनुसार कृषी विद्यापीठांच्या शिफारशींनुसार पीक नियोजन करावे.

दुष्काळी परिस्थितीचा संभाव्य परिणाम कमी करणे, उपलब्ध जलसाठ्यांचे संरक्षण करणे आणि शेतीतील आर्थिक जोखीम कमी करणे यासाठी शेतकऱ्यांनी योग्य पीक नियोजन करावे. पाणीटंचाईची शक्यता असलेल्या भागांमध्ये पर्यायी पिकांचा विचार करून संभाव्य नुकसान टाळण्याचा प्रयत्न करावा. परिस्थितीनुसार आवश्यक पुढील सूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
00000

No comments: