23 March, 2017

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी
अर्ज करण्यास 31 मार्च पर्यंत मुदतवाढ
        हिंगोली,दि.23 :  दिवसेंदिवस वाढत असलेली व्यावसायिक व बिगर व्यावसायिक महाविद्यालयांची संख्या आणि तेथे प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात, राज्यात शासकीय वसतीगृहांची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पुढील शैक्षणिक प्रवेशास मर्यादा येत आहेत. शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ वसतीगृह सुरू करून तेथे प्रवेश देण्यावर, जागेची उपलब्धता व बांधकामासाठी लागणारा कालावधी लक्षात घेता मर्यादा येतात. अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधीत अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केलेली आहे. या योजनेसाठी विद्यार्थ्यांना 10 वी / 12 वी / पदवी / पदवीका परीक्षेमध्ये 60 टक्के पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा 50 टक्के असेल. विहित नमुन्यातील अर्ज व जोडपत्र तसेच शासन निर्णय दिनांक 06 जानेवारी, 2017 या कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आलेली होती परंतु सदर अर्ज स्विकृतीसाठी दिनांक 31 मार्च, 2017 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण हिंगोली यांनी कळविले आहे.

**** 

No comments: