19 June, 2017

सिकलसेल आजारासंदर्भात नागरिकांनी घ्यावयाची काळजी
जागतिक सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम 19 जून रोजी राबविण्यात येतो. त्यानुसार हिंगोली जिल्हयामध्ये नोव्हेंबर 2012 मध्ये सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम सुरू झाला. या कार्यक्रमाअंतर्गत 1 ते 30 वयोगटातील व्यक्तीची सोल्युबिलिटी चाचणी करण्यात येते.  नोव्हेबर 2012 पासून मे 2017 पर्यंत अद्याप 3 लाख 97 हजार 91 सिकसेल सोल्युबिलिटी तपासणी करण्यात आल्या. यामध्ये एकुण 75 सिकलसेल रुग्ण आढळून आले आहेत. तर 813 सिकलसेल वाहक आढळून आले आहेत. जिल्हा रुग्णालय हिंगोली येथे सिकलसेल रुग्णासाठी डे-केअर सेंटरची ची व्यवस्था केलेली आहे. यामध्ये रुग्णांना मोफत उपचार, वैद्यकीय सल्ला व समुपदेशन करण्यात येते.
सिकलसेल हा लाल रक्त पेशींमध्ये  होणारा आजार आहे. सर्वसाधारण व्यक्तीच्या शरीरातील लाल रक्त पेशींचा आकार हा गोल असतो. पण सिकलसेल आजारामध्ये  या पेशींचा आकार ऑक्सीजन न मिळाल्या मुळे विळ्यासारखा होतो. सिकल म्हणजे विळा व सेल म्हणजे पेशी त्यामुळे या आजाराला सिकलसेल असे म्हणतात.
सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमाचे उद्दिष्टे : सिकलसेल आजार हा अनुवंशिक आहे. यात आई आणि वडील दोघेही ग्रस्त किंवा वाहक असल्यास यांच्या अपत्यांना हा आजार होऊ शकतो. त्यामुळे समाजातील सिकलसेल  वाहक व ग्रस्त व्यक्ती शोधून व त्यांची आपापसात विवाह टाळावा यासाठी समुपदेशन करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. 1) या आजारचे जनतेमधील प्रमाण शोधून काढणे. 2) जास्तीत-जास्त लोकांनी सिकलसेल आजाराची तपासणी करावी यासाठी त्यांना प्रवृत करणे. 3) सिकलसेल वाहक व पीडित व्यक्तींनी दुसर्‍या वाहक व पीडित व्यक्तीशी विवाह टाळावा यासाठी समुपदेशन करणे. 4) यापूर्वी विवाह झालेल्या सिकलसेल वाहक वाहक, पिडीत-पिडीत, वाहक-पिडीत अशा जोडप्यांना ओळखून त्यांना यापुढे सिकलसेल आजार ग्रस्त बालक जन्माला येऊ नये यासाठी गरोदरपणी गर्भ जल चाचणी व गर्भपातासाठी समुपदेशन या सेवा उपलब्ध करून देणे. 5) सिकलसेल रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण/उपजिल्हा/जिल्हा रुग्णालय स्तरावर परिणामकारक व नियमित उपचार करून देणे.   
सिकलसेल आजाराचे मुख्य दोन प्रकार आहेत. 1) आजारी व्यक्ति ( सिकलसेल सफरर किंवा पीडित व्यक्ती ) पीडित व्यक्तीला वारंवार जंतु संसर्ग होते व लवकर बरा होत नाही. रक्त पेशी लवकर नष्ट होतात. पिडीत व्यक्तीला खूप वेदना होतात. त्या व्यक्तीचे हातपाय खूप दुखत असतात. सर्व सांधे सुजू लागतात, दुखू लागतात, भुख लागत नाही पोटात डाव्या बाजूला दुखते. 2) सिकलसेल वाहक व्यक्ति (सिकलसेल करियर किंवा वाहक व्यक्ति ) :- ज्या व्यक्तिला सिकलसेल आजारचा त्रास होत नाही पण ती व्यक्ति पुढच्या पिढीला सिकलसेल आजार देऊ शकते. अशा व्यक्तीस सिकलसेल वाहक म्हणतात.
सिकलसेल आजाराची सर्वसाधारण लक्षणे रक्तक्षय, हातापायवर सूज येणे, कावीळ, असह्य वेदना, पक्षाघात, पित्ताशय, मूत्रपिंड, न भरून येणार्‍या जखमा, डोळ्यावर परिणाम होणे शारीरिक त्रास, मानसिक त्रास, जंतुसंसर्ग इत्यादी आहे.
सिकलसेल आजाराचे उपचार : 1) सर्व सिकलसेल आजारी रुग्णांनां फालिक असिड गोळ्या देणे. 2) रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्याने वेदनांनाशक औषधे देणे. 3) जंतुसंसर्ग झाल्यास अॅंटीबायोटिक देऊन उपचार करणे. 4) गुंतागुंतीच्या रुग्णांना वैद्यकीय महविद्यालयात हलविणे. 5) रक्त संक्रमणाची गरज असणार्‍या रुग्णांना रक्त संक्रमणाची सोय करणे.
सिकलसेल आजाराविषयी घ्यावयाची दक्षता : सिकलसेल आजार हा अनुवांशिक आहे. त्यामुळे लग्न ठरवण्यापूर्वी मुलगा व मुलगी दोघांचीही रक्ताची चाचणी करून घ्यावी. तसेच 1) दोघेही वाहक असतील तर... 2) एक वाहक व एक ग्रस्त असेल तर... 3) दोघेही ग्रस्त असतील तर... विवाह टाळण्यात यावे.
 
           संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली

*****                                                    

No comments: