12 June, 2017

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांना
सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाकरिता अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 12 : जिल्ह्यातील अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील युवक / युवतींना सैन्य पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणाकरिता शासन निर्णय आदेशाचे अधीन राहून खालील अटी शर्तीची पुर्तता करणाऱ्याच उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
याकरिता उमेदवार हा महाराष्ट्रातील अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील असावा, उमेदवार हा 18 ते 25 वयोगटातील असावा, उमेदवाराची उंची पुरुष 165 से.मी. महिला 155 से.मी. असावी, मेदवाराची छाती पुरुष 79 से.मी. फुगवून 84 से.मी. असावी, शैक्षणिक पात्रता इयत्ता 12 वी उत्तीर्ण असावा, जातीचा दाखला, रहिवासी दाखला, सेवा योजन कार्यालयांतर्गत नाव नोंदणी दाखला ओळखपत्राची सत्यप्रत आवश्यक राहिल, उमेदवार शारिरिक दृष्टया निरोगी सक्षम असावा आणि वार्षिक कौंटुंबिक उत्पन्न 1 लाख पर्यंत असावे.
उमेदवारांना माहे जुलै-2017 ते सप्टेंबर-2017 पासून सुरू होणाऱ्या प्रशिक्षणासाठी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अंबादेवी मंदिराजवळ, अमरावती येथे स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहावे लागेल. प्रशिक्षणासाठी निवड झाल्यास सदर प्रशिक्षणाचा कालावधी हा तीन महिन्यांचा असून प्रशिक्षण हे शासनाच्या वतीने होणार आहे. प्रशिक्षणार्थीस जाण्या-येण्याचा कोणताही भत्ता दिला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
वरील अटींची पूर्तता करणाऱ्या इच्छुक पात्र उमेदवारांनी प्रशिक्षणासाठी आवश्यक असणारे अधिकृत पत्र मिळविण्यासाठी दि. 25 जून, 2017 पर्यंत कार्यालयात विहीत नमून्यात अर्ज सादर करावा. सदर अर्जाचा नमुना सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात कार्यालयीन वेळेत नि:शुल्क उपलब्ध असून विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांची दखल घेतली जाणार नाही याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.    

***** 

No comments: