30 June, 2017

नागरिकांना वेळेत जन्म मृत्युची नोंदणी करण्याचे आवाहन

हिंगोली,दि.30: जन्म मृत्यु नोंदणी अधिनियम 1969 , 1976 व सुधारित नियम 2000 नुसार प्रत्येक जन्म व मृत्यूची नोंद ग्रामपंचायत, नगरपंचायत किंवा नगरपालिकेमध्ये करणे बंधनकारक आहे. जन्म किंवा मृत्यूचा दाखल्याशिवाय शालेय प्रवेशापासून, पासपोर्ट, वारस नोंदी केल्या जात नाही. प्रत्येक जन्म व मृत्यूची नोंद एक वर्षाच्या आत करणे बंधनकारक आहे. हा कालावधी उलटल्यानंतर न्यायालयामार्फत तसा आदेश मिळवावा लागतो. त्यामुळे प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये जन्म-मृत्यू विभाग कार्यरत असतो. तरी नागरिकांनी वेळेतच जन्म मृत्यूची नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित जन्म मृत्यू नोंदणी विषयक आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. धनवे, महिला व बालकल्याण उपमुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती ढेरे आदींची उपस्थिती होती.
दि. 15 डिसेंबर, 2000 च्या शासन निर्णयनुसार अंमलबजावणी व सनियंत्रणाकरीता ग्रामपातळीवर ग्रामसेवक हे जन्म-मृत्यु नोंदणी निबंधक आहेत. तर नागरी भागात मुख्याधिकारी नगरपरिषद हे निंबधक आहेत. त्यांनी त्यांचे कार्यक्षेत्रातील सर्व जन्म-मृत्युची नोंद करणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात  आरोग्य कर्मचारी, सहाय्यक परिचारिका व आरोग्य कर्मचारी (पुरुष), अंगणवाडी सेविका  हे नोटीफायर आहेत. जन्म मृत्यु नोदंणी विहीत मुदतीत न केल्यास नोंदणी शुल्क  दंड म्हणुन जास्त प्रमाणात आकारले  जाते. तेव्हा ग्रामपंचायती अंतर्गत जन्म मृत्यु नोंदणी विहीत मुदतीत करणे, खाजगी रुग्णालय मधील जन्म-मृत्यु नोंदणी विहीत वेळेत घेणेबाबत खाजगी रुग्णालयांना आवाहन केले. तसेच भारतीय जीवन विमा योजना, विविध इन्शुरंस कंपनी  व डाक कार्यालय (पोस्ट ऑफिस) यांचे मार्फत देण्यात येणारे लाभ जन्म मृत्युचे प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय देण्यात येवु नये जेणेकरुन मृत्यु नोंदणी वेळेत होण्यास मदत होईल अशीही चर्चा बैठकीत झाली.
जन्म मृत्युची नोदं कोठे करावी : ग्रामीण भागात - ग्रामपंचायत तर शहरी भागात 1) नगरपरिषद - हिंगोली, कळमनुरी व वसमत 2) उपनिबंधक - सामान्य रुग्णालय, हिंगोली आणि नगरपंचायत सेनगाव व औंढा येथे करावे.

जन्म मृत्युची उशिरा करावयाची नोदंणी

1 ते 21 दिवस
21 ते 30 दिवस
30 दिवसानंतर ते 1 वर्षाचे आत
1 वर्षानंतर
मोफत नोंदणी
21 दिवसानंतर परंतु 30 दिवसाचे आत विलंब शुल्क देवुन  करुन घेता येईल
गट विकास अधिकारी  (ग्रामिण भाग) मुख्याधिकारी  (शहरी भाग) यांचे लेखी परवानगीने व विलंब शुल्क 5/-
प्रथम न्यायीक दंडाधिकारी यांचे लेखी आदेशान्वये व विलंब शुल्क रु 10/-
तसेच ग्रामीण व शहरी भागातील विवाह नोंदणीचे प्रमाण वाढविणेसाठी ग्रामपातळीवर ग्रामसेवक यांनी तर शहरी भागात मुख्याधिकारी नगरपरिषद यांनी त्यांचे कार्यक्षेत्रात उपलब्ध असलेले समाज मंदीर, मंगल कार्यालय यांच्या व्यवस्थापक कडुन दरमहा विवाहची माहिती घेवुन त्याची नोंद घ्यावी. जेणेकरुन विवाह नोंदणी करण्यास मदत होईल. तसेच संबधित मंगल कार्यालयाचे व्यवस्थापक यांनी जन्म दाखल्याची प्रत घेवुनच विवाह करीता मंगल कार्यालय उपलब्ध करुन द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी भंडारी यांनी यावेळी केले.
विवाह नोंदणी विवाहाचे तारखेपासुन 90 दिवासाचे आत करणे आवश्यक आहे.विवाह नोंदणीकरीता खालील प्रमाणे शुल्क आकारले जातात. 1. विवाह शास्त्रोक्त पध्दतीने झाल्याचे दिनांकापासुन 90 दिवसाचे आत विवाह नोंदणी ज्ञापन सादर केल्यास रु.50/- विवाह नोंदणी शुल्कआकारण्यात येते. तर  विवाह शास्त्रोक्त पध्दतीने झाल्यानंतर 90 दिवसानंतर परंतु 1 वर्ष पुर्ण होण्यापुर्वी विवाह नोंदणी ज्ञापन सादर केल्यास रु.100/- विवाह नोंदणी शुल्कआकारण्यात येते. आणि विवाह शास्त्रोक्त पध्दतीने झाल्यानंतर 1 वर्षाहुन वा त्याहुन अधिक कालावधीने विवाह नोंदणी ज्ञापन सादर केल्यास रु.200/- विवाह नोंदणी शुल्कआकारण्यात येते. अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (म.बा.क) तृप्ती ढेरे यांनी यावेळी दिली.

*****

No comments: