01 June, 2017

पिक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करा
                                                                -- जिल्हाधिकारी अनिल भंडारी
      हिंगोली,दि.01: खरीप हंगाम 2017-18 साठी शासनाने जिल्ह्यास 885 कोटी 25 लाख रुपयांचे पीक कर्ज वितरणांचे उद्दिष्ट दिले असून राष्ट्रीयकृत बॅंकांनी पीक कर्ज वितरणांचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावेत अशा सूचना जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिल्या.            
            खरीप हंगाम जवळ आल्याने जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी आज येथील स्टेट बँक ऑफ इंडिया आणि परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेस प्रत्यक्ष भेट देवून पिक कर्ज वितरण बाबत आढावा घेतला. यावेळी हिंगोलीचे तहसीलदार श्री. विजय अवधाने यांची उपस्थिती होती.
            यावेळी जिल्हाधिकारी भंडारी म्हणाले की, सन 2016-17 मध्ये शासनाने जिल्ह्यातील 80 टक्के  शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार 1 हजार कोटी 38 लाख रुपये पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्टापैकी 762 कोटी 90 लाख रुपये पीक कर्जाचे 1 लाख 32 हजार शेतकऱ्यांना वितरण करण्यात आले होते. परंतू यावर्षी म्हणजे सन 2017-18 मध्ये 1 हजार कोटी 41 लाख रुपयांचे पीक कर्ज वितरणांचे उद्दिष्ट आहे. याकरीता सर्व बँकानी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2017-18 करीता पेरणीसाठी कर्ज उपलब्ध होईल याची काळजी घेत कर्ज वितरण करावे.
            शेतकरी हा आपला अन्नदाता असून कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना अडचण निर्माण येता कामा नये. याकरीता सर्व बँकांनी संवेदनशील दृष्टीने शेतकऱ्यांचे हित सांभाळावे. लाभार्थी शेतकऱ्याला सुलभरीत्या कर्ज उपलब्ध करून देणे हे बँकांचे प्रथम कर्तव्य आहे, असेही जिल्हाधिकारी भंडारी यावेळी म्हणाले.
            बँक व्यवस्थापक यांच्याकडून पीक कर्ज वितरणांची सविस्तर माहिती घेत पीक कर्जाचे वितरण वेगाने करण्याच्या सूचना ही जिल्हाधिकारी भंडारी यांनी यावेळी दिल्या. परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत सामाजिक अर्थसहाय्य योजने अंतर्गत श्रावणबाळ योजनेचा निराधार लाभार्थ्यांना सुरु असलेल्या वितरणाची पाहणी ही जिल्हाधिकारी भंडारी यांनी यावेळी केली.
            खरीप हंगाम सन 2017-2018 अंतर्गत जिल्ह्यातील बँकांनी 29 मे, 2017 पर्यंत पुढीलप्रमाणे लाभार्थ्यांना पीक कर्जाचे वितरण केले आहे. यामध्ये अलाहाबाद बँकेने - 55 लाभार्थ्यांना 54 लाख, बँक ऑफ बडोदाने - 82 लाभार्थ्यांना 79 लाख, बँक ऑफ इंडियाने - 333 लाभार्थ्यांना 261 लाख, बँक ऑफ महाराष्ट्रने - 337 लाभार्थ्यांना 390 लाख,  कॅनरा बँकेने 65 लाभार्थ्यांना 62 लाख, सेंट्रल बँक ऑफ इंडियाने - 08 लाभार्थ्यांना 03 लाख, देना बँकेने - 04 लाभार्थ्यांना 11 लाख, आयडीबीआय बँकेने - 65 लाभार्थ्यांना 82 लाख, ओरियंटल बँक ऑफ कॉमर्सने - 01 लाभार्थ्यांना 2 लाख, पंजाब नॅशनल बँकेने - 07 लाभार्थ्यांना 08 लाख, स्टेट बँक ऑफ इंडियाने - 567 लाभार्थ्यांना 729 लाख, सिंडिकेट बँकेने - 22 लाभार्थ्यांना 17 लाख, युको बँकेने - 11 लाभार्थ्यांना 07 लाख, युनियन बँक ऑफ इंडियाने - 26 लाभार्थ्यांना 122 लाख, ॲक्सिस बँकेने - 06 लाभार्थ्यांना 25 लाख, एचडीएफसी बँकेने 51 लाभार्थ्यांना 122 लाख, आयसीआयसीआय बँकेने 611 लाभार्थ्यांना 588 लाख आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेने - 282 लाभार्थ्यांना 239 लाख आणि परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेने 5 हजार 891 लाभार्थ्यांना 1 हजार 15 लाख असे एकूण 8 हजार 424 लाभार्थ्यांना 38 कोटी 16 लाख रुपये बँकांनी पीक कर्ज वितरण केले आहे.
            पीक कृषी योजना ही शासनाची महत्वाची योजना असून, कृषी विम्याचा लाभ शेतकऱ्यांना तातडीने देण्यात यावा असे म्हणत. राष्ट्रीय कृषी विमा योजने अंतर्गत 2015-16 च्या रब्बी हंगामात पीक विमा संरक्षण घेतलेल्या जिल्ह्यातील 31 हजार शेतकऱ्यांपैकी 27 हजार शेतकऱ्यांना 09 कोटी 60 लाख रुपये तर खरीप हंगामात पीक विमा संरक्षण घेतलेल्या जिल्ह्यातील 3 लाख 35 हजार 166 शेतकऱ्यांपैकी 86 हजार 172 शेतकऱ्यांना 16 कोटी 26 लाख रुपये  नुकसानभरपाई (विमा परतावा) मिळणार आहे. याबाबतचा देखील आढावा जिल्हाधिकारी भंडारी यांनी यावेळी घेतला.
            पीक कर्ज वितरण आणि राष्ट्रीय कृषी विमा योजना संबंधी शेतकऱ्यांना अडचण असल्यास त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार नोंदविण्याचे अवाहन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी यावेळी केले

*****

No comments: