09 December, 2017

शेतमाल तारण कर्ज योजना प्रभाविपणे राबवा

                - सहकार मंत्री सुभाष देशमुख

        हिंगोली,दि.9: शासनाच्या शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ जास्तीत-जास्त शेतकऱ्यांना व्हावा यासाठी शेतमाल तारण कर्ज योजना आहे. सदरील योजना ज्या शेतकऱ्यांना माहिती नाही त्या शेतकऱ्यांपर्यंत शेतमाल तारण कर्ज योजना कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी प्रभाविपणे राबवावी असे निर्देश सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी दिले.
            येथील रामकृष्ण पॅलेस सभागृहात सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत आयोजित ‘सहकार चळवळीची वाटचाल, संधी व आव्हाने’ या चर्चासत्रात सहकार मंत्री श्री. देशमुख बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, आमदार तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, औरंगाबादचे सहकारी संस्थेचे विभागीय सहनिबंधक राजेश सुरवसे, माजी खासदार शिवाजी माने, माजी आमदार गजानन घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
            पुढे श्री. देशमुख म्हणाले की, सहकाराच्या माध्यमातून महाराष्ट्र समृद्ध व्हावा हेच शासनाचे धोरण आहे. त्यासाठी शासन विविध स्तरावर प्रयत्न करत आहे. राज्यातील सहकारी चळवळीला चालना मिळण्यासाठी गावातील महिलांनी स्थानिक पातळीवर कौशल्याच्या आधारावर खाद्यपदार्थ, टिकविण्याचे पदार्थ तयार करून खरेदी विक्री संघामार्फत विक्री करण्याची आज गरज आहे. सहकारी संस्थांनी नाविन्यपूर्ण उपक्रमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची गरज आहे. तसेच प्रत्येक बाजारपेठेमध्ये ज्या काही अडचणी असतील त्या तात्काळ सोडविल्या जातील ज्यामध्ये निधी स्वरुपाची असो वा गोदामाची या अडचणी तात्काळ सोडवून याची काळजी घेतील जाईल. महाराष्ट्र राज्य सहकारी संघाने 100 वर्षाची वाटचाल यशस्वीपणे पूर्ण केली आहे. निस्वार्थपणे काम केलेल्या नेतृत्वाचा मोठा त्याग यामागे आहे. राज्य सहकारी संघासारख्या शिखर संस्थेला शासन सकारात्मक भुमिका घेऊन निश्चित मदत करेल.
            ग्रामीण भागातील विविध कार्यकारी सहकारी संस्था या गावातील विकासाचा केंद्रबिंदू आहेत. त्यामुळे गावातील प्रत्येक घटकाला या सहकारी सोसायट्यांशी जोडून घ्या, महसूली गावात सभासद वाढवा, ठेवी संकलन वाढवा व सेवक म्हणून सामाजिक बांधिलकी जोपासत या सहकारी सोसायट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करा. सहकारी संस्था राजकारण विरहीत चालविल्यास सभासदांना निश्चितपणे लाभ मिळण्यास मदत होते. तसेच शासनही अशा संस्थांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील. शेतकऱ्यांनी कर्जमाफी योजनेत 77 लाख ऑनलाईन अर्ज भरले. सदरील कर्जमाफी योजना पारदर्शक स्वरुपाची असल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. जलयुक्त शिवार अभियानामुळे पावसाचा प्रत्येक थेंब जमीनीत साठवला जात असल्यामुळे मुबलक प्रमाणात पाण्याची उपलब्धता झाली आहे. तसेच मुबलक वीज, मुबलक खत शेतकऱ्यांना मिळत आहे. शेतकऱ्यांनी शेतीचे व्यवस्थापन करून जमिनीचा पोत कशाप्रकारे सुधारणा करता येईल यासाठी माती परीक्षण करून घ्यावी. बोगस बियाणे कंपनीवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. नाफेड केंद्रामार्फत तुर खरेदी करण्यात आलेल्या रास्त भाव दुकानात 55 रुपये किलो दराने उपलब्ध आहे. त्यासाठी विविध कार्यकारी संस्थानी गावात माल उत्पादीत केल्यास बेरोजगारीचा प्रश्न सुटून त्यांना आर्थिक लाभ होण्यास देखील मदत होईल. राज्यातील अडचणीत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकांना सुस्थितीत असलेल्या इतर बँकांनी सहकार्य करण्याची गरज आहे. राज्यातील सहकार टिकविण्यासाठी  शासन सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे ही सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी यावेळी सांगितले.
            यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांची समयोचित भाषणे झाली.
            यापूर्वी सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी कळमनुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील  किमान आधारभूत किंमत खरेदी केंद्रात शेती माल विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
            सदर चर्चासत्राचे प्रास्ताविक जिल्हा उपनिबंधक एस. पी. मेत्रेवार यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील पणन, प्रक्रिया सहकारी संस्थां बँकाचे प्रतिनिधी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती,  सदस्य आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

*****

No comments: