20 December, 2018

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट-ब चाळणी परिक्षा 23 डिसेंबर रोजी
              * जिल्ह्यातील 7 उपकेंद्रावर होणार परीक्षा.
* परिक्षा उपकेंद्रावर फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 लागू.
                                                                                  
           हिंगोली,दि.20: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था/रचना गट-ब चाळणी परीक्षा-2018, 23 डिसेंबर, 2018 रोजी सकाळी 10.00 ते 12.00 या वेळेत हिंगोली मुख्यालयातील 07 उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेसाठी एकूण 07 उपकेंद्रावर एकूण 1 हजार 656 परीक्षार्थी  परीक्षा देणार आहेत.
            सदर परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून परीक्षेत बसणा-या उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर डीजीटल डायरी, कॅलक्युलेटर, पुस्तके, पेपर्स, पेजर मायक्रोफोन, मोबाईल फोन कॅमेरा अंतर्भुत असलेली कोणत्याही प्रकारची साधने, सिमकार्ड, दुरसंचार साधने म्हणून वापरण्या योग्य कोणतीही वस्तु, बॅग्ज अथवा शासनाने बंदी घातलेल्या इतर कोणत्याही साहित्यासह परीक्षा केंद्राच्या परिसरात तसेच परीक्षा कक्षात आणण्यास अथवा स्वत:जवळ बाळगण्यात सक्त मनाई करण्यात आलेली आहे. तसेच सदर परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून परीक्षा केंद्रावर कायदा व सुव्यवस्थेची परीस्थिती हाताळण्यासाठी परीक्षा केंद्रावर फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात येणार आहे. सदर परीक्षा केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून परीक्षा केंद्रावर मुख्य प्रवेशद्वारावर पोलीस यंत्रणे मार्फत तपासणी करण्यात येणार आहे.
            सदर परीक्षेच्या दरम्यान परीक्षा कक्षात उमेदवारांकडे मोबाईल फोन/दुरसंचार साधनासह आयोगाने बंदी घातलेले इतर कोणतेही साहित्य आढळून आल्यास तसेच कॉपीचा/गैरप्रकारचा प्रयत्न करत असल्याचे निर्देशनास आल्यास त्या उमेदवाराविरुध्द फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात येईल. याची संबंधित परीक्षार्थ्यांनी नोंद घ्यावी. सर्व परीक्षार्थ्यींची बायोमेट्रीक पध्दतीने ओळख पडताळणी करण्यात सकाळी 9.30 वाजता सुरुवात होणार आहे. तरी सर्व उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर 9.00 वाजत हजर रहावे.
            तसेच सदर परीक्षेची पुर्व तयारी बाबतचे पहिले प्रशिक्षण दिनांक 15 डिसेंबर 2018 रोजी घेण्यात आले आहे. सदर प्रशिक्षणास उपकेंद्र प्रमुख 02, पर्यवेक्षक 05, समवेक्षक 21 हे गैरहजर असल्यामुळे गैरहजर अधिकारी/कर्मचारी, उपकेंद्र प्रमुख/ पर्यवेक्षक/समवेक्षक दुसऱ्या प्रशिक्षणास हजर न झाल्यास त्यांच्या विरुध्द प्रशासकीय कार्यवाही करण्यात येणार असल्याची ही माहिती प्रसिध्दी पत्रकान्वये निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.


****

No comments: