07 December, 2018

ध्वज दिन निधी संकलनाचे उद्दीष्ट पूर्ण करा -जगदीश मिणियार







ध्वज दिन निधी संकलनाचे उद्दीष्ट पूर्ण करा
                                                                                                        -जगदीश मिणियार

            हिंगोली,दि.7: जिह्याला ध्वज दिन निधी संकलनाचे 2018 साठीचे 20 लाख रूपयांचे उद्दीष्ट असून सर्व विभागांनी आपले उद्दीष्ट पूर्ण करावे असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार यांनी  केले.
            येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील डि.पी.सी सभागृहात आज सशस्त्र सेना ध्वजदिन 2018 निधी संकलन शुभारंभाच्या कार्यक्रमात मिणियार बोलत होते. यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, निवासी उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी, समादेशक रशीद तडवी, समाज कल्याण आयुक्त भाऊराव चव्हाण, माजी कर्नल कातनेश्वरकर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी फ्लाईट लेफ्टनंट रत्नाकर चरडे यांची उपस्थिती होती.
            जिल्हाधिकारी मिणियार यावेळी म्हणाले की, संरक्षण दलाचे जवान व अधिकारी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अहोरात्र देशाच्या सीमांचे रक्षण करतात. त्यामुळेचे आपण सुखी जीवन जगत असतो, या सर्व सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी म्हणजे सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन होय. ‘माजी सैनिक, शहीद जवान अधिकारी यांचे कुटुंबिय यांच्या कल्याणाच्या योजना राबवण्यासाठी सशस्त्र सेना ध्वज दिन निधीचे संकलन केले जाते. लष्करी अधिकरी जवान आपल्या कुटुंबियांची पर्वा न करता देश आणि आपल्या सर्वांच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात असतात. देशाच्या रक्षणाची भूमिका बजावत असताना आपले जवान सैनिक सण, समारंभ, कार्यक्रम यांचा ही विचार न करता ते सतत देशसेवा करत असतात. अशा लष्करी अधिकारी जवानांची आणि त्यांच्या कुटूंबियाची काळजी घेणे ही आपणां सर्वांची नैतीक जबाबदारी आहे. या जबाबदारीच्या भावनेतून सशस्त्र सेना ध्वज निधी संकलन करण्याच्या सत्कार्याला मदत करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. सशस्त्र ध्वजदिन संकलनाचे स्वरुप हे व्यापक होण्याची आवश्यता असल्याचे ही मिणियार यावेळी म्हणाले.
            यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, कर्नल कातनेश्वरकर, भातलवंडे यांनी समयोचित मार्गर्शन केले. फ्लाईट लेफ्टनंट रत्नाकर चरडे हे प्रास्ताविकात म्हणाले की सन 2017 चे 140 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले असून, सन 2018 करीता 19 लाख 92 हजाराचे उद्दिष्ट आहे. यापैकी नगर परिषद हिंगोली यांनी 1 लाख 26 हजाराचे निधी संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ध्वजदिन निधीचे संकलन करण्यास सुरूवात करण्यात आले.
            पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुलासाठी माजी सैनिकांनी नगर परिषद हिंगोली यांच्याकडे संपर्क साधवा. त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करुन या योजनेचा लाभ देण्यात येईल असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी यावेळी केले.
            यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मिणियार यांच्या हस्ते माजी सैनिकांच्या गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्तीचे धनादेश वितरीत करण्यात आले. तसेच ज्या विभागानी निधी संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण केले त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. प्रारंभी येथील गंगाराम देवडा अंध विद्यालयातील विद्यार्थीनींनी स्वागत आणि देशभक्तीपर गीतं सादर केली. कार्यक्रमात माजी सैनिक आणि त्यांच्या कुटूंबिय यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. शिवाजी इंगोले यांनी केले तर सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी  संजय कवडे यांनी आभार मानले.

****



No comments: