27 December, 2018

थंडीच्या लाटेवरील उपाययोजना


थंडीच्या लाटेवरील उपाययोजना
                                                                           
            हिंगोली,दि.27: सध्या कडाकीची थंडी पडत आहे, त्यामुळे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाकडून  थंडीपासून बचाव होण्यासाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना सूचविल्या आहेत-अतिशय आवश्यकता असल्यास घराबाहेर जावे अन्यथा घरीच थांबावे, थंडीपासून संरक्षण  करण्यासाठी उबदार कपडे आहेत याची खात्री करावी, प्रसार माध्यमाद्वारे वेळोवेळी थंडीचा प्रतिकार करण्यासाठी दिलेली माहिती किंवा सूचनांचा अभ्यास करावा व अंमलात आणाव्यात, एकटे राहणाऱ्या वयोवृध्द शेजारच्या व्यक्तींकडे लक्ष द्यावे, गरम राहणाऱ्या किंवा इमारतीमधील जास्त हवा न येणाऱ्या  खोलीमध्ये वास्तव्य करावे. रुम हिटरचा वापर करावा, गरम पेय घ्यावे व शरीर उष्ण  राहण्यासाठी व थंडीच्या लाटेचा प्रतिकार करण्यासाठी शरीराला तयार करावे, विद्युत प्रवाह खंडीत झाल्यास फ्रीज मधील खाण्याचे पदार्थ 48 तास व्यवस्थित राहू शकतात फक्त  त्याचा दरवाजा  व्यवस्थित लागतो का ते पहावे व जास्त वेळा उघडू नये, थंडीपासून बचाव करण्यासाठी  टोपी  किंवा मफलरचा वापर करावा, रॉकेलचे स्टोव्ह किंवा कोळश्याची शेगडी वापरत असाल तर त्याचा धूर जाण्यासाठी खिडकी उघडी  असावी अन्यथा दुषित धुरामुळे बाधा होऊ शकते, ताजे पदार्थ खावेत ज्यामुळे शरीरामध्ये उर्जा निर्माण होईल, मादक पदार्थ किंवा अल्कोहोल  मिश्रित नसलेले पेय घ्यावेत.
            हिमबाधा झाल्याचे लक्षणे दिसताच डॉक्टरांना भेटावे, स्पर्श केल्यानंतर जाणीव होत नसल्यास किंवा हाताची बोटे , कानाची पाळी, नाकाचा शेंडा यांचा रंग पांढरा किंवा फिक्कट झाल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. शरीर थंड पडणे, थंडी वाजणे, स्मृतीभृंश होणे, बोलताना विसंगती किंवा अडखळणे, उच्चार स्पष्ट न करता येणे, अंधारी येणे , थकवा जाणवणे इत्यादी  लक्षणे आढळल्यास तात्काळ डॉक्टरांना दाखवावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी , हिंगोली यांनी केले आहे.
000000


No comments: