05 December, 2018

सर्व विभागानी टंचाई सदृश्य परिस्थितीत समन्वयाने कामे करावीत -रुचेश जयवंशी







सर्व विभागानी टंचाई सदृश्य परिस्थितीत समन्वयाने कामे करावीत
-रुचेश जयवंशी

        हिंगोली, दि.5: टंचाई सदृश्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व विभागांनी विविध उपाययोजना राबवून समन्वयाने कामे करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिल्या.
            येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात टंचाई आढावा बैठकीत जयवंशी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार, निवासी उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी गोविंद रणवीरकर यांची उपस्थिती होती.    
            यावेळी जयवंशी पुढे म्हणाले की, टंचाई सदृश्य परिस्थितीत जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी आणि सेनगाव या 3  तालूक्यांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यात सुरुवातीस चांगल्या पावसाला सुरुवात झाली होती. या टंचाई परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सर्व विभागानी शेतकरी, ग्रामस्थांना दिलासा देणाऱ्या उपाययोजना राबविण्याचे नियोजन करावे. टंचाईसदृश्य परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत करण्याची जबाबदारी प्रशासनाची असल्याने टंचाईसदृश्य गावांमध्ये संबंधित विभागानी पाहणी करून टंचाईसदृश्य भागातील पीक व पाणी परिस्थिती, चाऱ्याची आवश्यकता, जनावरांची संख्या आदी बाबींची अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहिती तयार करावी. जेणे करून बाधीत शेतकऱ्यांना मदत करणे शक्य होईल. जिल्ह्यातील जलसाठ्यातील उपलब्ध पाणीसाठा तसेच विविध पाण्याचे स्त्रोत अधिगृहीत करण्यात याव्या. संरक्षीत जलसाठ्यावरुन अनाधिकृतपणे पाणी उपसा होत असल्यास योग्य ती कारवाई करावी.    तसेच टंचाईसदृश्य परिस्थितीत पशुधनासाठी पूरेसा पाणीसाठा आणि चारा विनाविलंब उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आतापासून तयारी करावी. टंचाई कालावधीत जिल्ह्यातील पशुधनाला पूरेल एवढा चाऱ्याचे नियोजन करावे. याकरीता धरणांतील ओलीता खालील जमीनीवर पशुधनासाठी चाऱ्याची लागवड करावी. 
            यावेळी जयवंशी यांनी तालुकानिहाय जलसाठ्यातील उपलब्ध पाणीसाठा, टंचाईसदृश्य भाग, पशुधन आणि त्याच्या चारा, पिण्याच्या पाण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजना आदी बाबींचा आढावा घेत संबंधित विभागास सुचना दिल्या.
            यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी यांनी सद्यस्थितीत जिल्ह्यात टँकर सुरु झाले नसुन विहीरीचे अधिग्रहण ही करण्यात आले नाही. तसेच ग्रामीण भागातील टंचाईग्रस्त गावे/वाड्या/तांड्याना टँकरद्वारे पिण्याचे पाणी पूरवठा करण्यासाठी ई-निविदा मागविण्यात आल्याची माहिती दिली.  तसेच जिल्ह्यातील पशुधनास सुमारे 261 दिवस चारा पुरेल एवढा चारा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. पवार यांनी माहिती दिली.
            यावेळी बैठकीस महसूल, जिल्हा परिषद, पंचायत समिती, पाणीपुरवठा, जलसंधारण, कृषि, पशुसंवर्धन, आरोग्य विभाग, पाटबंधारे विभाग व भुजल सर्वेक्षण विभाग यासह  सर्व संबंधित विभाग प्रमुखाची उपस्थिती होती.

****

No comments: