21 June, 2025

हिंगोली येथे अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

• योग हा प्रत्येक घरापर्यंत पोहोचला पाहिजे-जिल्हाधिकारी हिंगोली (जिमाका), दि.21 : येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर आयोजित अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, क्रीडा विभाग, शिक्षण विभाग, योग विद्याधाम, पतंजली योग समिती, हरिओम योगा ग्रुप, विविध सामाजिक संस्था, मंडळे यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार तानाजी मुटकुळे, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, योग शिक्षक रत्नाकर महाजन, विठ्ठल सोळंके, ज्योती शेळके आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता म्हणाले, आज दि. 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. माणसाला निरोगी राहण्यासाठी योग हा प्रत्येक घरापर्यंत पोहोचला पाहिजे, असे सांगून सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आज संपूर्ण जगभर हा दिन साजरा केला जात आहे. याचे सर्व श्रेय भारत देशाला, देशाच्या प्रधानमंत्र्यांना आहे. योग हा आपल्या जीवनातला अविभाज्य भाग आहे. त्यामुळे सर्वांनी दररोज योग करुन निरोगी रहावे, असे सांगून आमदार तानाजी मुटकुळे यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी माजी खासदार शिवाजीराव माने, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनीही दररोज योग करणे आवश्यक असल्याचे सांगून योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. योगगुरु रत्नाकर महाजन व विठ्ठल सोळंके यांनी योग दिनामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाने आपले मित्र व कुटुंबीयांना योगाचे महत्त्व समजावून सांगावे. तसेच योगाचा प्रसार करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन केले. तसेच योग दिनानिमित्त त्यांनी उपस्थितांकडून योगविद्येची विविध आसने करुन घेतली. योगाची शपथ तसेच प्रार्थना आणि संकल्प करत, शांती पठनाने योग दिनाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन योग शिबिराचा प्रारंभ करण्यात आला. या शिबिरास विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, योगाभ्यासी मंडळाचे सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ****

No comments: